50 वर्ष सत्ता भोगून काँग्रेसमधून गेलेल्या अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाला उतरती कळा लागली काय?- खा.रविंद्र चव्हाण

नांदेड(प्रतिनिधी)-कॉंग्रेसच्यावतीने 50 वर्ष सत्ता भोगुन भारतीय जनता पार्टीत गेलेले खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाचा प्रभाव तेथे कमी झाला आहे म्हणूनच त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना शंखनाद या कार्यक्रमासाठी बोलावले आहे असे प्रतिउत्तर खा.रविंद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिले.
कॉंगे्रस कमिटी कार्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत खा.रविंद्र चव्हाण, माजी आ. हनमंत पाटील बेटमोगरेकर, आनंद चव्हाण, आनंदराव गुंडले, एकनाथ मोरे, अब्दुल सत्तार, पप्पु कोंडेकर, सुरेंद्र घोडजकर, विठ्ठल पावडे, शेख मुन्तजिबोद्दीन यांची उपस्थिती होती.
काल खा.अशोक चव्हाण यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कॉंगे्रस पक्षाच्यावतीने होणाऱ्या जय जवान जय किसान रॅलीसाठी जिल्ह्यात पक्षाकडे नेतृत्व नसल्याचे सांगितले होते आणि म्हणूनच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सपकाळ यांना बोलावल्याचे पत्रकारांसमोर सांगितले होते. त्याचे प्रतिउत्तर देतांना खा.रविंद्र चव्हाण म्हणाले की, 50 वर्ष चव्हाण कुटूंबियांनी कॉंगे्रसच्यावतीनेच सत्ता उपभोगली. भारतीय जनता पार्टीत गेल्यानंतर त्यांच्या नेतृत्वातील प्रभाव कमी झाला असेल म्हणूनच त्यांना सुध्दा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या सुरूवाती अगोदर केंद्रीय मंत्री अमित शाह यांना बोलवावे लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही कॉंग्रेसची ताकत दाखवून देवून. सोबतच खा.चव्हाण म्हणाले आज भारतीय जनता पार्टीचे कोणत्याही कार्यक्रमाचे व्यासपीठ पाहिले असता कॉंगे्रसमधून भाजपमध्ये गेलेल्या लोकांनीच ते भरलेले असते. याचा अर्थ भारतीय जनता पार्टीचा मुळ कार्यकर्ता आता कोठे गायब झाला आहे असा प्रश्न उपस्थित केला.
भारताचे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता. त्या संदर्भानेच 28 मे 2025 रोजी भारतीय जनता पार्टीच्यावतीने जय जवान जय किसान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात भारतीय सैनिकांचा गौरव करायचा आहे आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भाने मुद्दे मांडायचे आहेत. 28 मे रोजी सकाळी 11 वाजता कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयात सर्व लोक जमतील. येथूनच रॅलीचे सुरूवात होईल आणि रॅलीची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होईल अशी माहिती खा.चव्हाण यांनी दिली. केंद्रीय मंत्री अमित शाह यांना तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करण्याची सवय आहे. नांदेड जिल्ह्यात सभा घेत असतांना तरी त्यांनी कोणतीही तेढ समाजात निर्माण होईल असे वक्तव्य करून नये अशी अपेक्षा खा.चव्हाण यांनी व्यक्त केली.
वसंतराव नाईक पुतळ्याच्या अनावरणाचे निमंत्रण नाही
नांदेड जिल्ह्यातील खासदार असतांना महानगरपालिकेच्यावतीने उद्या केंद्रीय गृृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. हा कार्यक्रम महानगरपालिकेचा आहे. याची घोषणा सुध्दा खा.अशोक चव्हाण यांनी काल केली होती. या संदर्भाने प्रश्न विचारला असता खा.रविंद्र चव्हाण म्हणाले आता मी तुमच्या समोर बोलत असेपर्यंत सुध्दा मला या कार्यक्रमाचे निमंत्रण आलेले नाही. एक खासदार म्हणून निमंत्रण न आल्यामुळे शिष्टाचाराप्रमाणेे मी त्या बद्दलचे पुढील पाऊल उचलणार असल्याचेही सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!