नांदेड(प्रतिनिधी)-संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेवून केलेले वक्तव्य माझ्या व्यक्तीगत मतातून निषेधार्य असल्याचे अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ऍड.गोरक्ष लोखंडे यांनी व्यक्त केले.
शिंदे सरकारच्या काळात ऍड.गोरक्ष लोखंडे यांची अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या सदस्य पदावर नियुक्ती झाली. सध्या ते महाराष्ट्रभर जिल्हानिहाय दौरा करत आहेत. फक्त कार्यालयात बसून काम चालविण्यापेक्षा अत्यंत शेवटच्या स्थरावर समाजाची काय परिस्थिती आहे, काय अडचणी आहेत, त्या अडचणी कशा सोडवाव्यात यासाठी मी हा दौरा आयोजित केल्याचे ऍड.गोरक्ष लोखंडे यांनी सांगितले. आजपर्यंत त्यांनी महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांचा दौरा केला आहे.
संसदेमध्ये अमित शाह यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासह केलेले वक्तव्य माझ्या व्यक्तीगत मतातून निषेधार्य असल्याचे ऍड.गोरक्ष लोखंडे यांनी सांगितले. अमेरिकेच्या एका राष्ट्रपती निवडणुकीचा उल्लेख करून ऍड.गोरक्ष लोखंडे यांनी त्या ठिकाणी सम-समान मते पडल्यानंतर राष्ट्रपती कोणता निवडावा यासाठी जगभरातील देशांच्या संविधानाची चाचपणी झाली. त्यात भारतीय संविधानामध्ये सभागृह अध्यक्षाला मतदान करता येते हा उल्लेख आहे आणि त्याचा उपयोग करून त्या ठिकाणी मतदान झाले आणि ते मत जॉर्ज बुश द्वितीय यांच्या मतात पडले आणि ते अमेरिकेचे राष्ट्रपती झाले. जगभरात भारतीय संविधानामधील मानवी हक्कांच्या संदर्भाचा परिछेद जशाला तसा वापरला आहे. यावरून भारताचे संविधान किती मोठे आहे हे दिसते. समाजाच्या पायात हजारो वर्षापासून बांधण्यात आलेले साखळदंड महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुटले असे सांगितले. या संदर्भाने त्यांनी एका छोट्याशा कवितेचा संदर्भ दिला. ‘सुटा बुटातील रुबाबदार फोटोकडे हात दाखवून माझा बाप मला म्हणाला पायातील पायतान काढ आणि हात जोड हा तुझ्या बापाचा ही बाप आहे..’
जिल्ह्यांचा दौरा करतांना माझ्या लक्षात असे आले की, अनुकंपाच्या नोकऱ्या देतांना अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांमध्ये होणारा उशीर हा अत्यंत छोट्या-छोट्या कारणामुळे होत आहे. त्यामुळे त्यातील परिस्थितीचे आकलन करून त्या नियुक्त्या लवकरात लवकर कशा देता येतील यासाठी प्रयत्न केले. प्रशासनातील अनास्था, समाज कल्याण विभागाची हाराकिरी या संदर्भाने बोलतांना ऍड.गोरक्ष लोखंडे म्हणाले परभणी जिल्ह्यात एकाच दिवसात 27 नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. यात जमीनीची प्रकरणे आहेत. बदलतील राजकीय परिस्थिती सुध्दा जबाबदार आहे. त्या सर्वातून मार्ग काढण्यासाठी मी आयोगाच्यावतीने प्रयत्न करत असल्याचे ऍड.गोरक्ष लोखंडे म्हणाले.
लोकशाहीचा समग्र अर्थ माध्यमांच्याद्वारे जनतेपर्यंत पोहचतो. लेखणीचा वाटा लोकशाहीला समृध्द करण्यासाठी महत्वाचा आहे. आणि त्यामुळेच आज लोकशाही अत्यंत सुदृढपणे आपली वाटचाल करत आहे. राज कसा असावा याचे वर्णन करतांना ऍड.गोरक्ष लोखंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. त्यांनी आपल्या राज्याला कशीच भोसलेचे राजे म्हणले नाही तर रयतेचे राज्य म्हटले आणि हीच कल्पना भारतीय संविधानाचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानात सुध्दा नमुद केली आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म पाळण्याची मुभा भारतीय संविधानाने दिली आहे. परंतू देशाला धर्म नसावा म्हणून संविधान सुधारणेमध्ये त्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला. संविधानाची मुल्य सुध्दा धम्माने पेरीत आहेत धर्माने नाही.
नांदेड जिल्ह्यातील काही वस्तीगृहांना भेट दिल्यानंतरच्या बाबी सांगतांना त्या ठिकाणी कधी सुरक्षा रक्षक नसतात, स्वयंपाक गृहातील अस्वच्छता मी अनुभवली. परंतू सर्वांना उत्कृष्टपणे काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत. दलित हा शब्द कोणत्याही प्रकारच्या लिखाणात वापरा जावू नये असा शासन निर्णय असतांना आजही शासनाच्या कागदपत्रांमध्ये दलित शब्दाचा उल्लेख होतो. याबद्दल विचारले असता ऍड.गोरक्ष लोखंडे म्हणाले असे व्हायला तर नको आहे आणि पुढे झाले तर त्याविरुध्द आम्ही पोलीस प्राथमिकीचा आधार घेवू म्हणाले.
परभणी येथील दंगली संदर्भाने बोलतांना संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि त्यानंतर झालेली प्रतिक्रिया उद्रेकात आली. या घटनेमध्ये प्रथम क्रमांकाचा दोषी पोलीस विभाग आहे. कारण त्यांनी ज्या पध्दतीने मारहाण केली, शब्द बोलले हे अत्यंत घातक आहेत. या प्रकरणात दुसरा दोषी जेल प्रशासन आहे. त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीला योग्य वैद्यकीय मदत दिली असती तर दुर्देवी प्रकार घडला नसता. तिसरा दोषी प्राथमिक वेळेत ज्या दवाखान्यात सोमनाथ सूर्यवंशीला नेण्यात आले ते आहेत. त्यांनी सुध्दा त्याला योग्य वैद्यकीय मदत न दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. या सर्वांवर न्यायीक समिती चौकशी करत आहे असे ऍड.गोरक्ष लोखंडे म्हणाले.
