चिखली ता.किनवट येथे संयुक्त धाडसत्र; दगडफेक; 5 लाखांपेक्षा जास्तचे सागवान पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-आज सुर्योदयापुर्वी वनविभाग , पोलीस, परिवहन विभाग यांच्या संयुक्त कार्यवाहीत किनवट तालुक्यातील चिखली खुर्द गावात चोरीच्या सागवानाचा शोध करण्यात आला. त्यात पथकावर झालेल्या दगडफेकीत एक वनपरिक्षेत्र अधिकारी आणि काही पोलीस अंमलदार जखमी झाले आहेत.
आज सकाळी 4.30 वाजेच्यासुमारास पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, वनविभाग यांच्यासह 100 पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच वनविभागाचे 120 अधिकारी आणि कर्मचारी हे चिखली खुर्द ता.किनवट या गावात पोहचले. वर्दीला पाहताच काही समाजकंटकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. त्यात एक वनपरिक्षेत्र अधिकारी,वन कर्मचारी, काही पोलीस, जखमी झाले आहेत. तरीपण सर्व वर्दीधाऱ्यांनी आपली मोहिम राबवली आणि 20 ते 25 जणांना ताब्यात घेतले. तसेच चोरी साठा केलेले 200 घनफुट अवैध सागवान लाकडू जप्त करण्यात आले आहे. या सागवानाची किंमत जवळपास 5 लाखांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले. ही कार्यवाही झाली तेंव्हा अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, पोलीस विभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे, सहाय्यक वनसंरक्षक गणेश गिरी, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड, रोहित जाधव, सचिन धनगे, उमेश ढगे, तापकिर, पोलीस निरिक्षक सुनिल बिर्ला, चोपडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रकाश मुळे, जाधवर, पोलीस उपनिरिक्षक झाडे यांच्यासह पोलीस विभाग, वनविभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे जवळपास 250 पोलीस अंमलदार व कर्मचारी यांनी ही मोहिम पुर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!