संतोष देशमुख यांची झालेली हत्या दुर्मिळातील दुर्मिळ ,अमानवी आणि निषेधार्ह घटना आहे. निर्घृण खुनाच्या घटना पोलीस नोकरीत माझ्या पाहण्यात आहेत. तरीपण हे कृत्य भारतीय राज्यघटना, राजकीय मॉडेल, समाज व्यवस्था, धर्म,….. यासह अनेक बाबीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड हा मा. गोपीनाथजी मुंडे यांचे कडे असलेला एक घरगडी. जो प्रति पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्या काळात वावरत होता. धनंजय मुंडे यांचे विरुद्ध खंडणी ,अनैतिक वर्तन, आर्थिक भ्रष्टाचार, राजकीय स्वैराचार ,घटनेची पायमल्ली,…., यासारखे अनेक आरोप ऐकायला मिळतात. धनंजय मुंडे यांना ही शक्ती आमदार असल्याने प्राप्त झाली. ते आमदार व मंत्री कसे बनले? परळी मध्ये असंख्य तरुण असताना धनंजयजी यांना संधी मिळाली कारण ते गोपीनाथजींचे पुतणे होते. गोपीनाथची हे नेते कसे बनले?
राज्य शास्त्रानुसार ते करिष्मायुक्त charismatic व्यक्ती असल्याने स्वकर्तुत्वावर नेते बनले. त्यांचा कार्यकाळ जवळून पाहिला कारण त्याच काळात मी पोलीस अधिकारी म्हणून महाराष्ट्रात काम करीत होतो. आमच्या काळात असे अनेक करिष्मायुक्त नेते निर्माण झाले. त्यांनी स्वकर्तृत्वावर सत्ता मिळविली.त्यापैकी मा. शरद पवार, मा. बाळ ठाकरे, मा. नारायण राणे, मा. अभय सिंह राजे, मा. शंकररावजी चव्हाण, मा. शंकरराव मोहिते, मा. प्रमिलाताई चव्हाण, सुशील कुमार शिंदे, माननीय प्रकाश जी आंबेडकर , …. हे नेते होत. मानव वंश शास्त्रानुसार हे सर्व इथले मूळनिवासी. सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी स्वतःला ब्राह्मण म्हणविणारे करिमायुक्त नेते मा. गंगाधरपंत फडणवीस, माननीय प्रमोद महाजन ,….,यांचे पूर्वज भारतात आले त्यांनी या मूळ निवासींच्या पूर्वजांना हरवून मानसिक दृष्ट्या गुलाम बनविले. स्वतः व पुढे त्यांचे वंशज मालक जमात म्हणून श्रेष्ठत्व गाजवून सर्व भोग भोगीत राहिले.
गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य मिळविले गेले. मालक जमातीची मनुस्मृती जाऊन राज्यघटना अस्तित्वात आली. पुढे मानसिक दृष्ट्या गुलाम असलेल्या करिष्मा युक्त नेत्यानी आपल्या घराण्यातील तरुण/तरुणी निवडून सत्ताधीश बनविले. पण ही निवड खरोखर राज्यघटनेत नमूद केलेल्या लोकशाही तत्त्वानुसार झाली का? मुळीच नाही. यांनी टोळी संस्कृतीचे पुनर्जीवन केले. पूर्वीच्या काळी माणूस टोळ्या टोळ्यांनी राहत होता. एखादा करिष्मायुक्त तरुण पूर्वीच्या नेत्याला हरवून किंवा खल्लास करून टोळीचे नेतृत्व मिळवत असे. आणि पुढे टोळीचे नेतृत्व आपल्याच घरात राहील अशी व्यवस्था करीत असे. पूर्वी गाव पाटलाचा मुलगा पोलीस पाटील बनत असे कुलकर्णीचा मुलगा कुलकर्णी तर कोतवालाचा मुलगा कोतवाल बनत असे. राज्यशास्त्रात तिला परंपरा वादी सत्ता traditional authority असे म्हणतात. खरे तर हे नष्ट करण्यासाठी लोकशाहीची निर्मिती मानवी इतिहासामध्ये झाली व तीच आपण भारतामध्ये राबविली. पण या करिष्मायुक्त नेत्यांनी राज्यघटनेचा फायदा घेत आपल्याच घराण्यातील तरुणांना सत्तेत आनत पुन्हा टोळी संस्कृती या देशांमध्ये निर्माण केली. मस्सा जोग घटनेमागे हीच टोळी संस्कृती आहे
या करिष्मायुक्त नेत्यांच्या पुढच्या पिढीने लोकशाही बळकट होण्यासाठी व राज्यघटना राबविण्यासाठी काहीच केले नाही. उलट त्यांनी सत्ता मिळविल्यानंतर कांहीं अपवाद वगळता ती संपत्ती, प्रतिष्ठा, अहंकार, विलासी जीवन यासाठी वापरली. या पिढीने जनतेच्या भल्याची एकही मूलभूत सुधारणा शोधून राबवलेली नाही. जनतेचा विकास या नावाखाली सरकारी तिजोरीचा वापर आपले कमिशन मिळविण्यासाठी व विलाशी जीवन जगण्यासाठी केलेला दिसला. आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी त्यांनी मतदार संघातील प्रत्येक गावात, जातीत आपले दलाल नेमले. यांनी सरकारी तिजोरीतून येणारा पैसा गावात, वार्डात, मोहल्ल्यात वापरताना आपलाही स्वार्थ साधला व गावातील एक गठ्ठा मते आपल्या नेत्याला मिळवून देण्याचे काम केले. संतोष देशमुख हत्येतील कराड हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. कराडांच्या पक्षाचे प्रमुख अजित दादा हे ही घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहे. ते तर स्वतःला टग्या म्हणवून घेतात. अजितदादांनी आपली टगेगिरी मालक जमातीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या चरणी अर्पण केलेली आहे. मग अपेक्षा काय करणार?
धनंजय मुंडे यांचे विरुद्ध एवढे आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मंत्रिपद चौकशी होईपर्यंत काढून घ्यायला हवे होते व तथ्य नसल्यास पुन्हा सन्मानपूर्वक त्यांना मंत्रिपद द्यावे असे मत आहे. भाजप म्हणजे ‘पार्टी वुईथ डिफरन्स ‘असे म्हणणारे व ब्राह्मण म्हणजे सत्वगुणी साक्षात भूतलावरील देव असे गुण असलेले देवेंद्रजी ही अशी भूमिका का घेत नाहीत? जनतेला न्याय देणे हे देवेंद्रजी यांचे राजकारणातील मूळ उद्दिष्ट नाही. त्यांना खरे तर मानसिक दृष्ट्या गुलाम मूळनिवासींना एकमेका विरुद्ध लढत ठेवून ब्राह्मण श्रेष्ठत्व कायम राखायचे आहे. व त्यातून राज्य सत्तेवर ब्राह्मणी सत्तेचे वर्चस्व ठेवायचे आहे.
त्यामुळे मसाजोग येथे संतोष देशमुख यांची मुले, कुटुंब महाराष्ट्रभर आक्रोश करीत फिरले तरी गृहमंत्री असलेल्या मालक जमातीच्या देवेंद्र फडणवीस यांना काही पाझर फुटणार नाही.समता ,बंधुता ,सर्वधर्म समभाव देणारी राज्यघटना त्यांना बदलावयाची आहे. कसे ते बोलूया यथावकाश.
जंगलात लांडगे एकत्रितपणे मोठी शिकार करतात पण नंतर यथाशक्ती प्रत्येक जण शिकारीतील आपला वाटा लचके तोडून घेवून बाजूला सरकतात. आणि यथावकाश त्याचा फडशा पाडतात. याच पद्धतीने भारतीय राज्यघटनेचे लचके तोडणारे अनेक वेगवेगळे घटक आहेत. त्यापैकी करिष्मायुक्त नेत्यांनी तयार केलेली घराणी हा ही एक महत्त्वाचा घटक आहे. या घटकावर अंकुश फक्त घटनेच्या आधारेच ठेवता येऊ शकेल.तो आता का ठेवता येत नाही? व असा अंकुश निर्माण करण्यासाठी काय करावे लागेल ? याबद्दल यथावकाश बोलू. घराणे शाही निर्माण करणाऱ्या करिश्मायुक्त नेत्यांनी केलेल्या विकास कामांचे कौतुक होईलच पण त्याच वेळी टोळी संस्कृती वाढवून राज्यघटना व लोकशाहीचे अवमूल्यन केल्या बद्दल त्यांना भविष्यात जाब द्यावा लागेल.इतिहास त्यांना माफ करणार नाही!
-सुरेश खोपडे