59 व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचे 11 ते 13 जानेवारी दरम्यान ग्रामीण टेक्निकल कॅम्पसमध्ये आयोजन

जेष्ठ शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षकांनी घ्यावा -संचालक डॉ. विजय पवार यांचे आवाहन

नांदेड :- 59 व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचे 11 ते 13 जानेवारी, 2025 कालावधीत ग्रामीण टेक्निकल कॅम्पसमध्ये आयोजन करण्यात आले आहे. आयुका पुणेचे निवृत्त संचालक डॉ. अजित केंभावी हे या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष, तर महाराष्ट्राचे शिक्षण (योजना) संचालक डॉ. महेश पालकर हे या उदघाटक असतील.

तंत्रशिक्षण सह-संचालक अक्षय जोशी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ इंद्रमणी, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची उपस्थिती उदघाटन प्रसंगी राहणार आहे. विशेषतः नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे अधिवेशनास भेट देऊन उपस्थितांना प्रोत्साहित करणार आहेत. तसेच शारदा कन्स्ट्रक्शन प्रा. लीचे संचालक सुमित गणपतराव मोरगे, मविप नवीन नांदेडचे अध्यक्ष सुरेश जोंधळे देखील उपस्थित असतील.

दोन दिवसीय अधिवेशनात इसरोच्या चंद्रयान-२ मध्ये सहभागी संशोधिका डॉ. तनुजा पत्की, नॅशनल सेंटर फॉर (कँसर) सेल सायन्सच्या संचालिका डॉ. शर्मिला बापट, मानसिक स्वास्थ्य तज्ञ डॉ. राजेंद्र आगरकर, अनुवंश शास्त्रतज्ञ डॉ. स्नेहल महाजन, नॅशनल केमिकल लॅबचे संचालक डॉ. आशिष लेले व संबंध ऑस्ट्रेलियाला खड्डेमुक्त करणारा मराठी माणूस म्हणून सुप्रसिद्ध डॉ. विजय जोशी यांचे मार्गदर्शन असेल. विज्ञान शिक्षक मुख्याध्यापकांनी नाविन्यपूर्ण प्रकल्प कसे करावेत यावर (कट्टा मॉडेल) पुणे येथील विचारवंत डॉ. मिलिंद वाटवे, विनोदराय इंडस्ट्रीजचे संचालक सुनील रायठट्टा तर मॅजिक इनोव्हेशन सेंटर छत्रपती संभाजीनगरचे प्रसाद कोकीळ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. शिवाय विविध परिसंवादातून संशोधन कृषी विज्ञापीठ परभणीचे संचालक डॉ बी. पी. वासकर, राहुरीचे डॉ सचिन नलावडे, ठाणे येथील अविनाश हरड, डॉ बाळकृष्ण जमदग्नी यांचे देखील मार्गदर्शन होणार आहे.

ही विज्ञान शिक्षकांसाठी वैज्ञानिक पर्वणीच असणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने जगविख्यात शास्त्रज्ञ नांदेडला प्रथमच भेट देत असल्याने यांचा लाभ मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक व विज्ञान प्रेमींनी नक्की घ्यावा असे आवाहन मराठी विज्ञान परिषद – मध्यवर्ती चे अध्यक्ष तथा इंडियन केमिकल इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉ. जेष्ठराज जोशी व ग्रामीण टेक्निकल कॅम्पसचे संकुल संचालक डॉ. विजय पवार यांनी केले आहे.

मराठी भाषेतून वैज्ञानीक संकल्पनांना, कुतुहलांना उजाळा देत मानवी बुद्धिमतेच्या जोरावर वैज्ञानिक प्रगती साधण्याच्या उदात्त हेतूने प्रेरित झालेल्या मराठी विज्ञान परिषद – मध्यवर्तीच्या वाटचालीस 58 वर्षे पूर्ण होत आहेत. निमित्ताने अखिल भारतीय अधिवेशनाचे आयोजन मराठी विज्ञान परिषद – मध्यवर्ती, मराठी विज्ञान परिषद, नवीन नांदेड यांच्यातर्फे अधिवेशनाचे संयोजन करण्यात येत असून आयोजन ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी, नांदेड यांच्या तर्फे करण्यात येत आहेत.

याच अधिवेशनातून मविप जीवन गौरव पुरस्कार, प्रा. मनमोहन शर्मा पुरस्कारांचे वितरण, सन्मानकार्यांचा गौरव, तसेच स्मरणिका, विविध ई-पुस्तकांचे प्रकाशन संपन्न होईल तर १३ जानेवारी रोजी संस्कृती संवर्धन केंद्र, सगरोळी येथे तंत्रशिक्षण सहलीचे आयोजन संयोजकांमार्फत करण्यात येत आहे. सहभाग व नोंदणीसाठी प्रा. डॉ. धोत्रे पाटील यांचेशी संपर्क 8668537398 साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी मविपची संकेतस्थळास भेट द्यावी https://mavipa.org/59-adhiveshan-2024/ असेही कळविले आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!