नांदेड(प्रतिनिधी)-कामगार आयुक्त कार्यालयात वर्ग-1 चा अधिकारी असणाऱ्यणा व्यक्तीने आपल्या इतर सहा साथीदारांच्यासह मिळून मुखेड तालुक्यातील अनेकांना नोकरी लावतो म्हणून 1 कोटी 14 लाख रुपयांची फसवणूक केल्याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक व्यवहाराची सर्वात जास्त कणखर माहिती असणाऱ्या आर्थिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक नागोराव कुंडगिर यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला आहे.
गोविंदराव गुणागिर गिरी रा.शिरुर (दबडे) ता.मुखेड जि.नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कामगार आयुक्त कार्यालय मुंबई येथील वर्ग-1 चे अधिकारी पवनकुमार धर्मा चव्हाण, जावेद रजाक तांबोळी रा.हडोळती ता.अहमदपुर जि.लातूर, कल्पेश रविकांत जाधव रा.अंबुलगा ता.देवणी जि.लातूर, रामदास गोपिनाथ शिंदे, संगमेश्र्वर राठोड, संभाजी हरडे, विवेक दत्तू पवार सर्व रा.धनेगाव तांडा हेळंब ता.देवणी जि.लातूर या सर्वांनी मिळून गोविंदराव गिरी यांचे मित्र नातेवाईक आणि त्यांना विश्र्वासात घेवून तलाठी पदाची नोकरी लावतो म्हणून खोटी व बनावट गुणवता यादीतील गुण वाढल्याची बनावट यादी तयार करून दाखवली. तसेच उमेदवार निवडीची बनावट यादी तयार करून त्यावर सरकारी कामगार अधिकार मुंबई असा शिक्का मारुन या फिर्यादी व इतरांकडून रोखीच्या स्वरुपात आणि फोन पे वर 1 कोटी 14 लाख रुपये घेतले. हा सर्व प्रकार 30 ऑगस्ट 2023 ते आजपर्यंत घडला आहे. सोबतच बनावट तयार केलेल्या यादीतील नियुक्ती पत्र तयार करून ते अनेकांच्या व्हाटसऍपवर पाठविले. फिर्यादी व इतरांना हा बनावट प्रकार असल्याचे कळल्यानंतर त्यांनी विचारणा केली असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
मुखेड पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406, 465, 466, 467, 468, 471, 473, 294, 507, 120(ब) नुसार गुन्हा क्रमांक 369/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्यात फसवणूक झालेली रक्कम ही मोठी असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आर्थिक प्रकरणांबाबत अत्यंत बारकाईची आणि अभ्यासपूर्ण माहिती असणारे तथा आर्थिक व्यवहार चोखपणे पाहणारे, आर्थिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक नागोराव कुंडगिर यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला आहे.