विधानसभेसाठी निवडणूक खर्च निरीक्षक ए. गोविंदराज, मयंक पांडे नांदेडमध्ये दाखल

 

नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून तामिळनाडू कॅडरचे ए. गोविंदराज (आयआरएस) तसेच गुजरात कॅडरचे वरिष्ठ अधिकारी मयंक पांडे (आयआरएस) यांचे काल दि. 22 ऑक्टोबरला आगमन झाले असून त्यांनी आपल्या कार्याला प्रारंभ केला आहे.

निवडणुकीमध्ये भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. 40 लक्ष रुपये विधानसभेसाठी तर 95 लक्ष लोकसभेसाठी खर्च मर्यादा आहे. निवडणुकीमध्ये पैशांचा गैरवापर होऊ नये यासाठी आयोगामार्फत अनेक प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले आहेत. निवडणुकीतील सभा, संमेलन, जेवनावळी, जाहिरातीवरील खर्च नियंत्रीत केल्या जाते. याशिवाय पैशाचे अमिष व अन्य बाबींबाबत कडक निगरानी केली जाते. निवडणूक निरीक्षकांमार्फत याबाबींची तपासणी केली जात असून ते नांदेड जिल्ह्यामध्ये याकाळात कायम रहिवाशी असतात.

ए. गोविंद राज नायगाव, देगलूर, मुखेड व लोहासाठी निरीक्षक

तामिळनाडू कॅडरचे चेन्नई येथील गोविंद राज यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नांदेड मध्ये आल्यानंतर चर्चा केली. ए गोविंदराज यांच्याकडे भारत निवडणूक आयोगाने नायगाव, देगलूर, मुखेड, लोहा या विधानसभा क्षेत्राच्या खर्च निरीक्षणाची जबाबदारी सोपविली आहे. कार्यालयीन वेळेमध्ये त्यांच्याशी नागरिकांना संपर्क साधता येईल.

ए. गोविंद राज यांचा स्थानिक संपर्क क्रमांक 7249048040 आहे. त्यांचे संपर्क अधिकारी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गंगथडे (मोबाईल क्रमांक 9850485332) आहेत. कार्यालयीन कालावधीत त्यांना नागरिकांना भेटता येईल. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे लेंडी कक्ष येथे ते निवडणूक काळात निवासी आहेत.

मयंक पांडे किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिणसाठी निरीक्षक

गुजरात कॅडरचे 2009 बॅचचे आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी मयंक पांडे हे सुरत येथे आयकर विभागात अतिरिक्त आयुक्त आहेत. त्यांच्याकडे भारत निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण या विधानसभा क्षेत्राचे खर्च निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. मयंक पांडे यांचा संपर्क क्र. 08483845220 आहे. तर त्यांचे संपर्क अधिकारी जिल्हा परिषदचे मुख्य लेखापाल शिवप्रकाश चन्ना (मो.नं. 9011000921 ) आहेत. शासकीय विश्रामगृह नांदेड येथील आसना कक्षात ते निवडणूक काळात निवासी आहेत.

नागरिकांना आपापल्या विधानसभा क्षेत्राच्या संदर्भातील काही माहिती द्यायची असेल तक्रार असेल तर कार्यालयीन वेळेमध्ये या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!