पावती न देता कर्जदारांकडून वसूल केलेली रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली; दोन प्रकरणांत ५ लाख ७४ हजार ७०४ रुपयांची फसवणूक नांदेड (प्रतिनिधी) – भारत फायनान्स लिमिटेडच्या इस्लापूर आणि बिलोली शाखांमध्ये कर्जदारांची आर्थिक फसवणूक झाल्याचे दोन प्रकार उघडकीस आले आहेत. कर्जदारांकडून वसूल केलेली रक्कम बँकेच्या कार्यालयात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप असून, या प्रकरणी इस्लापूर आणि बिलोली पोलीस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इस्लापूर शाखेतील २६ कर्जदारांची फसवणूक पहिल्या प्रकरणात ३१ जानेवारी २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत भारत फायनान्स लिमिटेडच्या इस्लापूर शाखेत कार्यरत असताना आरोपी वैभव व्यंकट पांचाळ आणि रा. भोकर यांनी २६ कर्जदारांकडून कर्जाच्या हप्त्यापोटी एकूण ४ लाख ३६ हजार २०४ रुपये वसूल केले. मात्र, संबंधित कर्जदारांना पावत्या न देता ही रक्कम बँक कार्यालयात जमा केली नाही. उलट ती रक्कम स्वतःजवळ ठेवून बँकेची व कर्जदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी हदगाव येथील भारत फायनान्स लिमिटेडमध्ये नोकरी करणारे ४४ वर्षीय उमेश देवराव बळकुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे इस्लापूर येथे गुन्हा क्रमांक १४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(४), ३१६(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस कर्मचारी मपोउपनि/कागणे करीत आहेत. बिलोलीत हार्डवेअर मालाच्या नावाखाली फसवणूक दुसऱ्या प्रकरणात १२ सप्टेंबर २०२६ ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत बिलोली येथील मौजे सगरोळी येथील फिर्यादीच्या हार्डवेअर दुकानातून दोन अज्ञात मोबाईलधारक इसमांनी संगनमत करून आरटीजीएस व फोन-पेद्वारे एकूण १ लाख ३८ हजार ५०० रुपये स्वीकारले. मात्र, त्याबदल्यात हार्डवेअरचा माल पाठविला नाही. अशा प्रकारे फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी सगरोळी येथील ४२ वर्षीय व्यापारी प्रवीण मारुती बागे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस कर्मचारी मपोउपनि/जाधव करीत आहेत. आर्थिक व्यवहार करताना सावधानता आवश्यक! दोन्ही प्रकरणांत मिळून ५ लाख ७४ हजार ७०४ रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. कर्जाचे हप्ते भरताना अधिकृत पावती घेणे, तसेच ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना संबंधित व्यक्ती व खात्याची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे या घटनांमधून स्पष्ट होत आहे. पोलिसांकडून दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 180 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तलवारीने वार करून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न; दोघांविरुद्ध विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल नांदेडमध्ये दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मोबाईल हिसकावला