अल्पवयीनांच्या हातात शस्त्रे, समाजाच्या विवेकाला कुलूप!

आरोपीही अल्पवयीन असल्याची माहिती, मग पालकांच्या जबाबदारीचे काय?

नांदेड (प्रतिनिधी) – महाशिवरात्रीच्या दिवशी झालेल्या वादात एका १ ६वर्षीय अल्पवयीन बालकांचा खून झाला आहे.  एकीकडे देवाच्या दर्शनासाठी रांगा, हातात बेलपत्र आणि मुखात हर हर महादेवचा जयघोष; तर दुसरीकडे किरकोळ कारणावरून एका १६ वर्षीय बालकाचा धारदार शस्त्रांनी जीव घेण्याचा संतापजनक प्रकार! भक्तीच्या वातावरणात माणुसकीचा गळा घोटला जात असेल, तर प्रश्न केवळ कायदा-सुव्यवस्थेचा नाही, तर आपल्या सामाजिक संस्कारांचाही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री आठ ते दहा वाजण्याच्या सुमारास नल्ला नल्ला गुट्टा चाळ परिसरात राहणारा धीरज थोरात हा १६ वर्षीय मुलगा आपल्या घराजवळ असताना काही जणांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात धीरजचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यातील बहुतांश जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील नेमके कारण आणि इतर तपशील तपासातून स्पष्ट होतील.पण खरी शोकांतिका इथेच आहे. वय खेळण्याचे, शिकण्याचे आणि भविष्य घडवण्याचे; मात्र हातात पुस्तकांऐवजी शस्त्रे आणि डोक्यात भविष्याऐवजी हिंसेचा विचार!

अल्पवयीन म्हणून सवलत हवी, की जबाबदारीची जाणीव?

आजकाल काही तरुणांच्या वागण्यातून असा प्रश्न पडतो की, कायद्याची भीती संपली आहे की गुन्ह्याचे गांभीर्यच हरवले आहे? एखाद्याचा जीव घेणे म्हणजे गल्लीतील भांडण जिंकणे नव्हे. रक्त सांडल्यानंतर ‘काय झाले?’ असा निर्विकार चेहरा ठेवणे ही मर्दुमकी नाही; ती समाजाच्या संवेदनशीलतेची शोकांतिका आहे. अल्पवयीन असणे म्हणजे गुन्हा छोटा होणे नव्हे. वयाचा विचार कायद्याने केला जाईल; मात्र एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला, एका आई-वडिलांच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला, याचे काय?

मुलांच्या हातात शस्त्रे येतात कुठून? पालकांच्या नजरेतून काय निसटते?

पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर तपास करणे, आरोपींचा शोध घेणे आणि कायद्यानुसार कारवाई करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. पण प्रत्येक मुलाच्या मागे चोवीस तास पोलीस उभे राहू शकत नाहीत. मुलगा कुठे जातो, कोणाच्या संगतीत राहतो, त्याच्या मित्रमंडळींचे वर्तन कसे आहे, त्याच्या हातात धारदार शस्त्रे येतात कुठून या प्रश्नांची उत्तरे घरातूनही शोधावी लागतील. मोबाईल हातात देताना पालक आधुनिक होतात; पण मुलाच्या संगतीवर लक्ष ठेवताना वेळ नसतो, ही विसंगती किती दिवस चालणार? मुलगा उशिरा घरी आला तर विचारायचे नाही, त्याच्या वागण्यात बदल दिसला तर दुर्लक्ष करायचे, आणि एखादी दुर्घटना घडली की समाज, पोलीस व व्यवस्थेला दोष द्यायचा—ही सोयीस्कर भूमिका आता बदलली पाहिजे. मुलांच्या हातात महागडा मोबाईल आहे म्हणून त्यांचे भविष्य सुरक्षित होत नाही; त्यांच्या मनात योग्य-अयोग्याची जाणीव आहे का, हे तपासणे अधिक महत्त्वाचे आहे.

आज धीरज गेला; उद्या कोणाचा नंबर?

आज एका १६ वर्षीय मुलाचा जीव गेला. उद्या दुसऱ्या घरातील मुलगा अशाच हिंसेचा बळी ठरू शकतो. गुन्हेगारीचे हे लोण वेळेत रोखले नाही, तर त्याची किंमत संपूर्ण समाजाला मोजावी लागेल. पोलिसांनी या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. त्याचबरोबर पालकांनी, शाळांनी आणि समाजानेही मुलांमधील वाढती आक्रमकता, चुकीची संगत आणि शस्त्र बाळगण्याच्या प्रवृत्तीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. कारण प्रश्न फक्त धीरज थोरातच्या हत्येचा नाही; प्रश्न आपल्या पुढच्या पिढीला आपण नेमके कोणत्या दिशेने घेऊन चाललो आहोत, हा आहे. देवळात घंटा वाजवून समाजातील धोक्यांचे आवाज ऐकू येत नसतील, तर दोष घंटांचा नाही आपल्या बहिऱ्या झालेल्या विवेकाचा आहे!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!