सलग ४५ तासांहून अधिक काळ मतमोजणी ; अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून प्रक्रिया पूर्ण छत्रपती संभाजीनगर- विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील हे १८ हजार १२४ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना ८५ हजार ८७६ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते मिळाली. पसंतीक्रमानुसार ३९ उमेदवारांची वगळणी व मतहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतमोजणीत डॉ. पाटील यांनी सर्वाधिक मते मिळवली. भारत निवडणूक आयोगाकडून निकालासंदर्भातील पुढील प्रक्रियेस मान्यता प्राप्त झाल्यानंतर गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी डॉ. पाटील यांना विजयी घोषित केले. निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते डॉ. प्रतापसिंह पाटील यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक श्रीमती माधवी खोडे-चवरे, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत व निवडणूक निरीक्षक श्रीमती माधवी खोडे – चवरे यांच्या देखरेखीखाली मतमोजणी पार पडली. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव या आठ जिल्ह्यांतील ८४२ मतदान केंद्रांवर झालेल्या या निवडणुकीत ४१ उमेदवार रिंगणात होते. मतमोजणीसाठी ७० टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती. वैध मतांच्या आधारे ८८ हजार ५५८ मतांचा कोटा निश्चित मतमोजणीच्या प्रारंभी मतपत्रिकांची पडताळणी व वर्गीकरण करण्यात आले. त्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी तीन फेऱ्यांत पूर्ण करण्यात आली. पहिल्या फेरीत ७० हजार ५१९, तर दुसऱ्या फेरीअखेर एकत्रित १ लाख ४० हजार ५४३ मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. मतमोजणीच्या आकडेवारीनुसार एकूण १ लाख ७७ हजार ११५ मते वैध, तर १६ हजार ५४० मते अवैध ठरली. वैध मतांच्या आधारे विजयासाठी ८८ हजार ५५८ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीअखेर डॉ. प्रतापसिंह पाटील यांना ७३ हजार ९३१, सतीश चव्हाण यांना ६० हजार ७६८, अपक्ष उमेदवार रविराज उर्फ अण्णासाहेब सावळे-पाटील यांना १९ हजार ८३५, तर दिलीप घुगे यांना ८ हजार ४३९ मते मिळाली. कोणत्याही उमेदवाराने विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण केला नसल्याने निवडणूक नियमांनुसार कमी मते मिळालेल्या उमेदवारांची टप्प्याटप्प्याने वगळणी करून त्यांच्या मतपत्रिकांवरील पुढील उपलब्ध पसंतीक्रमानुसार मतहस्तांतरणाची प्रक्रिया राबविण्यात आली. ३९ उमेदवारांच्या वगळणीनंतर अंतिम निकाल मतहस्तांतरण प्रक्रियेत वगळण्यात आलेल्या उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील पुढील उपलब्ध पसंतीक्रमानुसार उर्वरित उमेदवारांना मते देण्यात आली. दिलीप घुगे यांच्या मतपत्रिकांमधून २ हजार २८५ मते डॉ. पाटील यांना, तर १ हजार ८८१ मते सतीश चव्हाण यांना हस्तांतरित झाली. त्यानंतर ३९व्या वगळणीत रविराज सावळे-पाटील यांच्या मतपत्रिकांमधून ६ हजार ४६९ मते डॉ. पाटील यांना, तर ३ हजार २४१ मते सतीश चव्हाण यांना हस्तांतरित झाली. एकूण ४१ उमेदवारांपैकी ३९ उमेदवारांच्या वगळणीनंतर डॉ. प्रतापसिंह पाटील व सतीश चव्हाण हे दोन उमेदवार शिल्लक राहिले. या टप्प्यावरही कोणत्याही उमेदवाराने निश्चित कोटा पूर्ण केला नव्हता. अंतिम मतमोजणीत डॉ. पाटील यांना ८५ हजार ८७६, तर सतीश चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते मिळाली. डॉ. पाटील यांना १८ हजार १२४ मतांचे मताधिक्य मिळाले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी अधिकृत निकाल जाहीर करून डॉ. पाटील यांना विजयी घोषित केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सलग ४५ तासांहून अधिक काळ कामकाज मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणी गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी पहाटे अंतिम निकाल घोषित होईपर्यंत सलग ४५ तासांहून अधिक काळ सुरू होती. मतपत्रिकांची पडताळणी, वर्गीकरण, पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी, उमेदवारांची वगळणी, पुढील पसंतीक्रमानुसार मतहस्तांतरण, अंतिम आकडेवारीची तपासणी व निकाल निश्चिती या प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक निरीक्षक यांच्या देखरेखीखाली पार पाडण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कामकाज केले. मतमोजणी पथक, मतपत्रिका वर्गीकरणासाठी नियुक्त पथक व त्यांच्या सहकाऱ्यांनीही महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. मतमोजणी केंद्र व परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक बंदोबस्त ठेवला होता. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतमोजणी कालावधीत सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली. याशिवाय मतमोजणी केंद्रावरील सुविधा, साहित्य, स्वच्छता व अन्य आवश्यक व्यवस्थांसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, सेवक तसेच कंत्राटी मनुष्यबळाचेही सहकार्य लाभले. मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी विविध यंत्रणांनी जबाबदारीने काम केले. निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी निवडणूक निरीक्षक, मतमोजणी प्रक्रियेत सहभागी सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन तसेच सहाय्यक यंत्रणांचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. Kanthak Suryatal Post Views: 131 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दिवाळीच्या नावाखाली वाहतूक शाखेतील खाकी वर्दीचा नेमस्त वसुली उत्सव!