नांदेड (प्रतिनिधी) – स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड आणि नांदेड एज्युकेशन सोसायटी नांदेडच्या सायन्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्ञानतीर्थ- २०२६ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवातील रंगमंचावर कलाकारांनी केवळ अभिनय न सादर करता समाजातील विदारक वास्तवाचा आरसाच उभा केला. ‘नाना पाटेकर मंच’ वर पार पडलेल्या विडंबन अभिनय स्पर्धेत आजच्या ज्वलंत सामाजिक आणि राजकीय गोंधळावर कलाकारांनी जोरदार ताशेरे ओढले. विविध सामाजिक समस्या, आंदोलने आणि प्रशासकीय अनास्थेवर उपरोधिक शैलीत सादर केलेल्या कलाकृतींनी उपस्थितांची मने जिंकली. ‘इनकी सुरत को पहचानो भाई’ने उडवली झोप कार्यक्रमात हिंदी विडंबन सादरीकरणादरम्यान ‘इनकी सुरत को पहचानो भाई’ या शीर्षकाखाली सादर झालेल्या अंकाने प्रेक्षकांना अंतर्मुख केले. देशात फोफावलेला भ्रष्टाचार, अशिक्षित मंत्र्यांची वक्तव्ये, मणिपूरमधील हिंसाचार, देशभरात पेटलेली शेतकरी व विविध जनआंदोलने आणि वाढती अंधश्रद्धा यांसारख्या गंभीर मुद्यांवर भेदक विडंबन सादर करण्यात आले. राजकीय स्वार्थापोटी सर्वसामान्यांचे होणारे हाल कलाकारांनी आपल्या धारदार संवादांतून समोर आणले. पेपरफुटीपासून ते शेतकरी आत्महत्येपर्यंतचा आक्रोश ‘सामाजिक गोंधळ’ या थीमवर आधारित सादरीकरणात विद्यार्थ्यांच्या व्यथा प्रकर्षाने मांडण्यात आल्या. ‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटी, स्पर्धा परीक्षांमधील घोटाळे, विद्यार्थ्यांचा खडतर संघर्ष आणि त्यातून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे विदारक दृश्य पाहून सभागृह सुन्न झाले. यासोबतच बळीराजाची सतत होणारी उपेक्षा व शेतकरी आत्महत्या, हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचे राजकारण, मतचोरीचे आरोप आणि तथाकथित भोंदूबाबांच्या ढोंगावर कलाकारांनी आपल्या विनोदी पण टोकदार शैलीत ताशेरे ओढले. उपेक्षित लोककलावंतांची व्यथाही या नाट्यात तितक्याच ताकदीने मांडली गेली. मंचाचे नेटके नियोजन व व्यवस्थापन या संपूर्ण सत्रादरम्यान नाना पाटेकर मंचाच्या व्यवस्थापनाची धुरा सायन्स कॉलेज, नांदेडचे प्राध्यापक व समन्वयक अत्यंत चोखपणे सांभाळत आहेत. मंचाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. विशाल मराठे, डॉ. प्रमोद कुलकर्णी, डॉ. वर्षा बोरगावकर यांच्यासह श्यामसुंदर गोरे, डॉ. श्रीकांत दुलेवाड आणि आशिष भारती यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सुयोग्य नियोजनामुळे स्पर्धा सुरळीत आणि उत्साहात पार पडली. कलाकारांच्या प्रभावी देहबोली, संवादफेक आणि ज्वलंत विषयांवरील मांडणीला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. केवळ मनोरंजन न करता व्यवस्थेवर अचूक बोट ठेवणारा हा विडंबन अभिनय या महोत्सवातील मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. Kanthak Suryatal Post Views: 30 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सामाजिक कार्यकर्ते विशाल कोकरे यांना धम्मरत्न समाजगौरव पुरस्कार जाहीर