– विजय जोशी मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याला मूर्त स्वरुप देण्यासाठी ५० वर्ष लागली. हा दिवस साजरा करण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि तत्कालीन मंत्री दिवाकर रावते यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे. १७ सप्टेंबर १९९८ पासून खर्याअर्थाने हा मुक्तीसंग्राम दिन साजरा होऊ लागला. नव्या पिढीला मराठवाडा मुक्तीसंग्रामाची गाथा व या दिनाचे महत्व बर्याचअंशी माहित नाही. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. मात्र मराठवाडा पारतंत्र्यातच होता. १७ सप्टेंबर १९४८ या दिवशी मराठवाडा स्वतंत्र झाला आणि विनाअट संयुक्त महाराष्ट्रात तो सामील झाला. या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ आदी नेत्यांनी केले आणि रजाकाराच्या वाढत्या हुकूमशाहीतून मराठवाडा मुक्त झाला. विशेष म्हणजे १९७२ पर्यंत भारत सरकारने मराठवाड्याच्या स्वातंत्र्य संग्रामाला केंद्र सरकारने मान्यता दिली नव्हती. २५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुध्दा ही मान्यता मिळत नसल्याने स्वातंत्र्यसैनिकांनी सन्मानाचा तांम्रपट नाकारला होता. अखेर १९७२ साली या लढ्याला स्वातंत्र्य संग्राम म्हणून मान्यता देण्यात आली. शासकीय पातळीवर त्यावेळी झेंडावंदनही होत नव्हते. १९९५ ला राज्यात शिवशाहीचे सरकार आले. मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांनी शपथ घेतली. मुक्तीसंग्रामाचा लढा त्यात, अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले बलिदान, उमरी बँक अॅक्शन, उमरखेड कॅम्पवरील झालेला लढा या सर्व नोंदी शासन दरबारीही होत्या. या लढ्याला मुर्त स्वरुप यावे आणि मुक्तीसंग्राम दिन मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा अशी भावना तत्कालीन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व उध्दव ठाकरे यांच्याशी त्यांनी याबाबत सविस्तर चर्चा केली आणि मराठवाड्यातील जनतेच्या भावना शिवसेनाप्रमुखांच्या कानावर टाकण्यात आल्या. या दिवशी झेंडावंदन झाले पाहिजे, असा अट्टाहास त्यांनी धरला. त्याचवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना सूचना दिल्या. मराठवाड्याच्या स्वातंत्र्य दिन शासकीय पातळीवर साजरा झाला पाहिजे, असे आदेशच त्यांनी दिले. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात हुतात्म्यांचे स्मृतीस्तंभ उभे करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. शिवशाही सरकारने मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली आदेशच काढून टाकला. स्मृतीस्तंभ उभारणेबाबतच्या हालचालींना सुरुवात झाली. मंत्री दिवाकर रावते यांनी त्याबाबत पुढाकार घेतला. त्याची रचना, उभारणी कशी असावी, याबाबत आराखडाही तयार केला. वैधानिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्याला निधीही मंजूर झाला आणि १७ सप्टेंबर १९९८ रोजी नांदेडच्या माता गुजरीजी विसावा उद्यानात मुक्तीसंग्रामाच्या स्मारकाचे अनावरण तसेच प्रख्यात कवी साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी यांचे मराठवाडा गीतही कोरण्यात आले. या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू, जोवर वाहे गोदामाई, तोवर गाणे गाऊ हे गीत त्यांनी लिहिले. मराठवाड्यातील सर्वच जिल्हा, तालुका व ग्रामपातळीवर १७ सप्टेंबर १९९८ रोजी ध्वजारोहणाचे व मुक्तीसंग्राम दिनाचे कार्यक्रम सुरु झाले. लढ्याला मुर्त स्वरुप देण्यासाठी तब्बल पन्नास वर्षाचा कालावधी उलटून गेला. तत्पूर्वी याच दिवशी स्वातंत्र्यसैनिक एकत्र येवून हा कार्यक्रम साजरा करायचे. मात्र शासकीय पातळीवर हा कार्यक्रम आला त्याचे श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि मराठवाड्याच्या स्वातंत्र्य संग्रामाशी प्रत्यक्ष सबंध नसलेल्या मात्र मराठवाड्याची तळमळ असलेल्या तत्कालीन मंत्री शिवसेना नेते दिवाकर रावते यांनाच जाते. जिल्हा पातळीवर ही स्मारके आता दिमाखाने उभी आहेत. हे विसरुन चालता येणार नाही. याबाबत मराठवाड्याच्या विविध विषयांचा अभ्यास असणारे चिकित्सक, अभ्यासक आणि मराठवाड्यात व राज्यात विविध वक्ते निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देणारे अंबाजोगाईचे विकास कुलकर्णी म्हणाले की, हैदराबाद संस्थान हे भौगोलिक दृष्टीने भारताच्या मध्यभागी असलेले भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. हैदराबाद संस्थानाची व्याप्ती १६ जिल्ह्यांची होती. हे १६ जिल्हे चार सुभ्यांमध्ये विभागले गेले होते. तेलगू भाषिकांचे दोन सुभे, कानडी भाषिकांचा एक सुभा व मराठी भाषिकांचा एक सुभा होता. मराठी भाषिकांच्या सुभ्याला मराठवाडा हे नाव होते. हैदराबादच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी व त्यांच्या सहकार्याच्या मदतीने केले व या संग्रामात सर्वात जास्त हुतात्मे मराठवाड्यातील होते. भाषावार प्रांतरचनेचा आग्रही पुरस्कार करणारा मराठवाडा नेहमीच अखंड महाराष्ट्रवादी राहिला. पण मराठवाड्याच्या वाट्याला नेहमीच उपेक्षा आली. १९९५ साली महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या शिवसेना -भाजप सरकारने शासकीय पातळीवर झेंडावंदनाचा निर्णय घेतला ! दिवाकरजी रावते मराठवाड्यात त्यापूर्वी बरीच वर्षे काम करत असल्यामुळे त्यांनी याबाबत अट्टाहास धरला. आणि मराठवाड्यात उभारलेले स्मृतीस्तंभ रावते साहेबांच्या कल्पकतेतून साकार झाले, असेही विकास कुलकर्णी यांनी सांगितले. १७ सप्टेंबर १९९८ रोजी नांदेडच्या माता गुजरीजी विसावा उद्यानात मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या स्मारकाचे अनावरण झाले. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री स्व.शंकरराव चव्हाण, तत्कालीन मंत्री दिवाकर रावते, स्व.साहेबराव बारडकर आणि अन्य ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनानी यावेळी उपस्थित होते. या दिवसापासूनच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन १७ सप्टेंबर रोजी शासन पातळीवर साजरा होऊ लागला. मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर आता ७५ वर्ष होऊ लागली आहेत. अर्थात मुक्तीसंग्रामाचा लढा शासन दरबारी पूर्णत्वास आणण्याचे काम हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, मंत्री दिवाकर रावते यांनी केले. हे विसरुन चालता येणार नाही. Kanthak Suryatal Post Views: 14 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हळदीचे पाणी अन् जळकी पोळी पिणाऱ्या मुलांकडून पंतप्रधानांच्या वाढदिवशी १,२५,००० दिव्यांचे प्रदर्शन? नांदेडचा वैद्यकीय उद्योग: रुग्णांचे हाल अन् डॉक्टरांची सोन्याची खाण; PCD सिंडिकेटचा खोचक पंचनामा!