नांदेड (प्रतिनिधी) – रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हा जुना मंत्र आता नांदेडमध्ये बदलून रुग्णसेवा हीच सोन्याची खाण असा नवा मंत्र उदयास आला आहे. मराठवाड्यातील नांदेड शहर हे आज उपचाराचे केंद्र उरले नसून, खाजगी डॉक्टर आणि औषध कंपन्यांसाठी केवळ आर्थिक मळणीचे यंत्र बनले आहे. महाराष्ट्रातील विदर्भ असो की शेजारचे तेलंगणा, आंध्र प्रदेश अन् कर्नाटक; उपचाराच्या आशेने धावून येणाऱ्या हजारो असहाय रुग्णांच्या गर्दीचा फायदा उठवत इथे कोट्यवधींची शिस्तबद्ध लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. डॉक्टरांचा नवा PCD गेम: औषध असो नसो, कमिशन पक्के! नांदेडातील नामवंत गायनॅकॉलॉजिस्ट, डरमटलॉजिस्ट, डायबेटोलॉजिस्ट, कार्डिआक, ऑर्थोपेडिक आणि एमडी मेडिसिन डॉक्टरांनी आता उपचारांसोबतच व्यापारात पदवी मिळवलेली दिसते. या डॉक्टरांनी स्वतःच्या पैशाने PCD फार्मा कंपन्या थाटल्या आहेत किंवा खाजगी कंपन्यांना कोट्यवधी रुपये मोजून बाजारात अजिबात नसलेले अन् अप्रूव्ह नसलेले ब्रँड्स स्वतःच्या नावे तयार करून घेतले आहेत. आता या औषधांचा रुग्णाच्या आजारावर काही फरक पडो अथवा न पडो, तीच महागडी औषधे रुग्णांच्या माथी मारली जातात. यामागे असणारा हेतू म्हणजे अफाट कमिशन, फुकटच्या परदेश वारी आणि महागड्या भेटवस्तूंचे आमिष! इतकेच नाही तर ऑपरेशन्स आणि संसर्गजन्य आजारांसाठी लागणारे इन्जेक्शन, क्रेप बँडेज व सर्जिकल साहित्यावर हजारो पट नफा उकळला जात आहे. या नफेखोरीवर नियंत्रण ठेवणारे कोणतेही नियम वा अटी नावालाही उरलेल्या नाहीत. फॅमिली सिंडिकेट: औषधांपासून स्कॅनपर्यंत सगळं आपलंच! रुग्णाचा खिसा कसा रिकामा करायचा, याचा एक अत्यंत उत्तम इकोसिस्टम पॅटर्न इथे पाहायला मिळतो. शहरातील जवळपास प्रत्येक मोठ्या डॉक्टरचे स्वतःचे मेडिकल स्टोअर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, सिटीस्कॅन आणि एमआरआय सेंटर सज्ज आहे. हे सर्व कारखाने एकतर पार्टनरशिपमध्ये चालतात किंवा थेट नातेवाईकांच्या नावावर चालवले जातात.त्यामुळे रुग्णाला बाहेरून स्वस्त आणि गुणकारी जेनेरिक औषध आणण्याचे धाडस करता येत नाही. डॉक्टरांच्या या घराणेशाहीच्या साखळीमुळे रुग्णाला इतरत्र जाण्याची कोणतीही मुभा दिली जात नाही. बॉण्ड पेपरवरील हॉस्पिटल दुकानदारी जिल्ह्यात जागोजागी टोलेजंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स उभी राहिली आहेत. या हॉस्पिटल्समध्ये औषध क्षेत्राचा कोणताही अनुभव नसलेले लोक केवळ १ ते ५ कोटी रुपयांचे डिपॉझिट आणि लाखो रुपये भाडे देऊन मेडिकल दुकाने चालवत आहेत. शासनाच्या आणि प्रशासनाच्या डोळ्यात उघडउघड धूळफेक करत बॉण्ड पेपरवर हे सर्व अवैध व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे प्रत्येक औषधावर एक बेसिक मार्जिन ठरवून देण्याची आणि या अनागोंदी कारभाराला चाप लावण्याची वेळ आली आहे. मुंडे साहेब, जरा इकडेही लक्ष द्या! – संयुक्त धाडींची मागणी या सर्व सावट आणि शोषणाने गांजलेले सामान्य रुग्ण आणि नातेवाईक आता आयुक्त डॉ. तुकाराम मुंडे साहेबांना साद घालत आहेत. ज्याप्रमाणे मुंडे साहेबांनी आयव्ही सेटच्या लुटीवर थेट कारवाई करून दणका दिला होता, तसाच मोर्चा आता नांदेडकडे वळवावा. एफडीए, जीएसटी आणि इन्कम टॅक्स या तिन्ही यंत्रणांनी एकत्र येत संयुक्तपणे धाडी टाकाव्यात आणि या फार्मा-डॉक्टर सिंडिकेटचा भांडाफोड करावा, अशी संतप्त मागणी होत आहे. तरच लाखो गरजू रुग्णांना योग्य दरात उपचार मिळतील आणि सर्वसामान्यांचे प्राण वाचू शकतील. Kanthak Suryatal Post Views: 23 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation काय आहे इतिहास? मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास? कुणी सुरुवात केली शासकीय ध्वजारोहणाची परंपरा? पहिला कार्यक्रम कुठे झाला?वाचा..