महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या ११ प्रतिज्ञांचा अन्वयार्थ आपण भाग एक मध्ये समजून घेतला आहे. दुसऱ्या भागात आपण बाकी ११ प्रतिज्ञांचा मतितार्थ समजून घेणार आहोत. बारावी प्रतिज्ञा आहे मी बुद्धाने सांगितलेल्या दहा पारमिता पाळीन. ११ व्या प्रतिज्ञेत बाबासाहेबांनी जगण्याचा मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला. १२ व्या प्रतिज्ञेत त्या मार्गावर चालताना स्वतःमध्ये कोणते गुण विकसित करायचे, ते सांगितले आहे. पारमिता म्हणजे परिपूर्णता किंवा पार होण्यासाठी लागणारे गुण. म्हणजे माणसाला दुःखाच्या किनाऱ्यावरून सुखाच्या किनाऱ्यावर घेऊन जाणारे १० सदगुण. बाबासाहेबांनी सांगितलेल्या बौद्ध धर्मातील त्या दहा पारमिता पुढीलप्रमाणे आहेत. शील पारमिता म्हणजे सदाचारी राहणे. हिंसा, चोरी, खोटे बोलणे यापासून दूर राहणे. हा पाया आहे. दान पारमिता – देण्याची वृत्ती. फक्त पैसा नव्हे, तर ज्ञान देणे, वेळ देणे, दुसऱ्याला मदत करणे. स्वार्थ सोडणे. उपेक्षा पारमिता – अलिप्तता आणि समता. सुख-दुःख, मान-अपमान, लाभ-हानी मध्ये मन डळमळीत न होऊ देणे. सर्वांबद्दल समान भाव ठेवणे. नैष्क्रम्य पारमिता – त्यागाची भावना. संसार सोडून जाणे नाही, तर लोभ, मोह, स्वार्थाचा त्याग करणे. माझे-माझे करणे सोडणे. वीर्य पारमिता – उत्साह आणि अथक प्रयत्न. चांगले काम करण्यासाठी आळस न करणे, सतत प्रयत्नशील राहणे. बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन हीच पारमिता आहे. शांती पारमिता – सहनशीलता आणि क्षमाशीलता. कोणी रागावले तरी शांत राहणे, बदला न घेणे, सहन करणे. सत्य पारमिता – खरे बोलणे आणि खरे वागणे. कोणत्याही परिस्थितीत सत्याची बाजू न सोडणे. अधिष्ठान पारमिता – दृढ निश्चय. मी हे चांगले काम करणारच, असा पक्का निर्धार करणे. ध्येयापासून विचलित न होणे. करुणा पारमिता – सर्व प्राणिमात्रांवर दया करणे. दुसऱ्याचे दुःख पाहून त्याला मदत करणे. मैत्री पारमिता – सर्वांवर प्रेम करणे. शत्रूवरही मैत्रीभाव ठेवणे. कोणाचाही द्वेष न करणे. बाबासाहेब सांगतात की, मी बौद्ध धम्म स्वीकारला म्हणजे फक्त पांढरे कपडे घालून वंदना म्हणणे नाही. तर मी माझ्या स्वभावातच बदल करेन. मी दानशूर, शीलवान, सत्यवादी, क्षमाशील, उत्साही, दयाळू आणि सर्वांवर प्रेम करणारा बनेन. हेच दहा गुण मी रोजच्या जीवनात पाळेन. अष्टांगिक मार्ग हा रस्ता आहे, तर दहा पारमिता हा त्या रस्त्यावर चालण्यासाठी लागणारा प्रकाश आहे. पुढची प्रतिज्ञा आहे- मी सर्व प्राणीमात्रांवर दया करीन व त्यांचे लालन पालन करीन. ही प्रतिज्ञा बौद्ध धम्माच्या सगळ्यात मोठ्या हृदयाची प्रतिज्ञा आहे. यातच हिंदू धर्म आणि बौद्ध धर्मातील सगळ्यात मोठा फरक बाबासाहेब दाखवतात. ज्या धर्मात आम्हाला माणूस म्हणूनही वागवले नाही, त्या धर्माचा त्याग करून मी अशा धर्मात आलो आहे, जिथे माणसालाच नाही, तर मुक्या प्राण्यालाही दया दाखवली जाते. बाबासाहेब इथे दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. एक म्हणजे मी कोणत्याही जीवाला दुखावणार नाही. मी त्याच्यावर हिंसा करणार नाही. मनातही त्याच्या वाईटाचा विचार करणार नाही. हिंदू धर्मात यज्ञात प्राण्यांचा बळी दिला जातो, पण बुद्धाने पहिल्यांदा सांगितले – यज्ञासाठी प्राण्याला मारू नका. बुद्ध हा भारतातला पहिला प्राणी-दया कार्यकर्ता होता. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त दया करून थांबायचे नाही. तर त्याचे पालन-पोषण करीन. म्हणजे त्याला जगायला मदत करीन. एखादा बैल, गाय, कुत्रा, पक्षी – त्याला भुकेले ठेवणार नाही, त्याला मारणार नाही, त्याची काळजी घेईन. ही या प्रतिज्ञेमागची भूमिका आहे. कारण बाबासाहेब म्हणतात, ज्या समाजात माणसामाणसातच दया नाही, जिथे माणसाला जनावरापेक्षा वाईट वागवले जाते, त्या समाजाने आधी प्राणिमात्रावर दया करायला शिकले पाहिजे. जो माणूस एखाद्या मुंगीलाही जपतो, तो माणसावर अत्याचार करु शकणार नाही. म्हणून ही प्रतिज्ञा म्हणजे मी आता हिंसक राहणार नाही. मी माझ्या मनातून क्रूरता काढून टाकेन. मी फक्त माणसांवरच नाही, तर या पृथ्वीवरील प्रत्येक जीवावर प्रेम करेन आणि त्याला जगण्यास मदत करेन. हा विचारच माणसाला खऱ्या अर्थाने बौद्ध बनवतो. पुढची प्रतिज्ञा खूप महत्वाची आहे, कारण त्यात बाबासाहेबांनी जातीचा अहंकार संपवला आहे. मी चोरी करणार नाही. वर वर पाहिलं तर ही खूप साधी प्रतिज्ञा वाटते – चोरी करू नये हे तर लहान मुलालाही कळतं. मग बाबासाहेबांनी २२ प्रतिज्ञांमध्ये याचा समावेश का केला? कारण बाबासाहेब इथे फक्त खिसा कापण्याबद्दल बोलत नाहीत, ते शीलाचा पाया सांगत आहेत. बौद्ध धर्मात याला अदिन्नादाना वेरमणी म्हणतात. म्हणजे न दिलेले काहीही न घेणे. दुसऱ्याच्या मालकीची वस्तू, पैसा, जमीन त्याच्या परवानगीशिवाय घेणार नाही. ही झाली साधी चोरी. बाबासाहेब सांगतात, दुसऱ्याच्या श्रमावर जगणे ही पण चोरीच आहे. एखाद्याकडून बिनपगारी काम करून घेणे, बेगार करून घेणे, त्याच्या मजबुरीचा फायदा घेणे – ही सर्वात मोठी चोरी आहे. ज्या जातीव्यवस्थेने हजारो वर्षे आमच्या श्रमाची चोरी केली, त्या व्यवस्थेला हे उत्तर आहे. दुसऱ्याच्या हक्कावर गदा आणणार नाही. लाच घेणे, भ्रष्टाचार करणे, दुसऱ्याला मिळणारे शिक्षण, नोकरी, मान-सन्मान हिरावून घेणे – ही सुद्धा चोरीच आहे. बाबासाहेब म्हणतात, तुम्ही बौद्ध झालात म्हणजे तुम्ही प्रामाणिक झाला पाहिजे. बुद्धाने सांगितलेले पंचशील आहे – त्यातील दुसरे शील हेच आहे. जर तुमचे शीलच शुद्ध नसेल, तर तुम्ही ध्यान कितीही केले तरी तुम्हाला निर्वाण मिळणार नाही. म्हणून ही प्रतिज्ञा म्हणजे – मी माझ्या पोटासाठी, माझ्या स्वार्थासाठी कोणालाही फसवणार नाही. जे माझे नाही, त्यावर मी हक्क सांगणार नाही. मी माझ्या घामाचे खाईन आणि प्रामाणिकपणे जगेन. जेव्हा सगळा समाज प्रामाणिकपणे वागेल, तेव्हाच गरिबी आणि शोषण संपेल. पंधरावी प्रतिज्ञा माणसाच्या चारित्र्याबद्दल आहे: ही सुद्धा बुद्धाच्या पंचशीलातील तिसरी आणि अत्यंत महत्वाची प्रतिज्ञा आहे. याला बौद्ध धम्मात कामेसु मिच्छाचारा वेरमणी म्हणतात. हिंदू धर्मात चारित्र्याचा संबंध पाप-पुण्याशी जोडला, पण बुद्धाने त्याचा संबंध शील, समता आणि स्त्रीच्या सन्मानाशी जोडला. याबाबत बाबासाहेब इथे पुन्हा दोन गोष्टी सांगतात. पहिली म्हणजे परस्त्री किंवा परपुरुषाशी अनैतिक संबंध ठेवणार नाही. केवळ वासनेसाठी दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळणार नाही. लग्न, नातं, कुटुंब याचा आदर करीन. दुसरी म्हणजे स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे. ज्या धर्मात स्त्रीला भोगाची वस्तू समजले गेले, जिथे देवदासी, सती, बालविवाह सारख्या प्रथा होत्या, त्या धर्मातून बाहेर येऊन मी आता स्त्रीकडे समानतेने पाहीन. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणून स्त्रीला घटस्फोटाचा, संपत्तीचा हक्क दिला, त्याचे मूळ या विचारात आहे. व्यभिचार म्हणजे फक्त शरीराचा संबंध नाही, तर मनाचा व्यभिचारही आहे – म्हणजे दुसऱ्या स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणे, तिचा अपमान करणे, तिला कमी लेखणे. कारण बाबासाहेब म्हणतात, जोपर्यंत समाजात स्त्री सुरक्षित नाही, तोपर्यंत तो समाज सुसंस्कृत होऊ शकत नाही. ज्या समाजात आमच्या आया-बहिणींना मंदिरातही जाऊ दिले नाही, त्याच समाजातील पुरुषांनी आता ठरवायचे की आम्ही आमच्या स्त्रियांचाच नाही, तर जगातील सर्व स्त्रियांचा आदर करू. म्हणून या प्रतिज्ञेचा अर्थ आहे की मी माझ्या मनात आणि शरीरात पवित्रता ठेवीन. मी कोणत्याही स्त्रीला माझ्या वासनेसाठी वापरणार नाही. मी एक पत्नी, एक कुटुंब आणि स्त्री-पुरुष समानता या तत्वावर जगेन. हाच खरा बौद्ध माणूस आहे. पुढची प्रतिज्ञा माणसाच्या वाणीवर आहे आणि ती आजच्या काळात सगळ्यात जास्त गरजेची आहे. मी खोटे बोलणार नाही. याला बौद्ध धम्मात मुसावादा वेरमणी म्हणतात – म्हणजे मिथ्या भाषणापासून दूर राहणे. हे पंचशीलातील चौथे शील आहे. बाबासाहेबांनी २२ प्रतिज्ञांमध्ये का ठेवले, याचा खोल विचार करा. कारण खोटे हेच सर्व शोषणाचे मूळ आहे. स्वार्थासाठी, भीतीपोटी किंवा दुसऱ्याला फसवण्यासाठी मी असत्य बोलणार नाही. मी जे पाहिले, जे अनुभवले, तेच बोलेन. बाबासाहेब इथे सम्यक वाचेचा नियम सांगतात. एखाद्याबद्दल मागे खोट्या गोष्टी पसरवणे, दोन लोकांमध्ये भांडण लावण्यासाठी चहाडी करणे, समाजात द्वेष पसरवणे – हे सुद्धा खोटे बोलण्याचाच प्रकार आहे. हा सर्वात मोठा अर्थ आहे. बाबासाहेब म्हणतात, मी आता बौद्ध झालो, तर मी आता कर्मकांड, नशीब, आत्मा, भूत-भविष्य याबद्दलचे खोटे लोकांना सांगणार नाही. हे केले तर पाप लागते, ते केले तर स्वर्ग मिळतो – अशा खोट्या गोष्टी सांगून लोकांना घाबरवणार नाही. मी बौद्ध झालोय असे म्हणून वरवर दिखावा करणार नाही. आतून एक आणि बाहेरून एक असे दुटप्पी वागणार नाही. हजारो वर्षे आम्हाला सांगितले गेले – तुम्ही मागच्या जन्मी पाप केले म्हणून तुम्ही अस्पृश्य आहात. हे सर्वात मोठे खोटे होते. या खोट्यावरच जातिव्यवस्था उभी होती. त्यामुळे बाबासाहेब म्हणतात, या खोट्याचा पाया तोडल्याशिवाय सत्याची इमारत उभी राहणार नाही. मी सत्याचा आग्रह धरीन. माझे शब्द, माझे विचार आणि माझे आचरण हे सत्यावर आधारित असेल. मी सत्य बोलेन, सत्य ऐकेन आणि सत्याचाच प्रचार करीन. कारण सत्याशिवाय मुक्ती नाही. पुढची प्रतिज्ञा ही या सगळ्या शीलाचा कळस आहे:. मी दारू पिणार नाही. याला बौद्ध धम्मात सुरा-मेरय-मज्ज-पमादट्ठाना वेरमणी म्हणतात – म्हणजे मनाला बेभान करणाऱ्या कोणत्याही नशेपासून दूर राहणे. हे पंचशीलातील पाचवे आणि शेवटचे शील आहे. बाबासाहेबांनी ही प्रतिज्ञा शेवटी नाही, तर मुद्दामून ठेवली आहे, कारण त्यांना माहित होते – दारूमुळेच आपला समाज गुलाम झाला आहे. बाबासाहेब फक्त दारूबद्दल बोलत नाहीत, तर गांजा, अफू, ताडी, आजच्या भाषेत सांगायचे तर ड्रग्ज – जे जे पदार्थ पिल्याने किंवा घेतल्याने बुद्धी भ्रष्ट होते, ते सर्व वर्ज्य. कारण बुद्ध म्हणतो, तुमचे मन हेच सर्व काही आहे. आणि नशा तुमच्या मनालाच मारून टाकते. बाबासाहेब नेहमी म्हणायचे, महार-मांगांच्या वस्तीत दारूचे दुकान सरकार मुद्दामून उघडते. माणूस दिवसभर राबतो, संध्याकाळी मिळालेले १० रुपये तो दारूत घालवतो. मग घरी बायको-मुले उपाशी, भांडण, मारहाण देखील करतो. दारूमुळे पैसाच नाही तर अब्रूही जाते. म्हणून तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर आधी दारू सोडली पाहिजे. दारूमुळे अष्टांगिक मार्ग आणि दहा पारमिता नष्ट होतात. विचार करा – तुम्ही दारू पिलात तर.सम्यक दृष्टी राहणार नाही. सम्यक स्मृतीचे भान राहणार नाही. शील, सत्य, शांती पारमिता राहील का? नाही. म्हणजे एका दारूने बुद्धाने सांगितलेले सगळे १७ नियम तुटतात. म्हणून बुद्धाने याला प्रमादाचे स्थान, म्हटले आहे. म्हणून या प्रतिज्ञेचा अर्थ आहे. मी माझी बुद्धी गहाण ठेवणार नाही. मी माझ्या कष्टाच्या पैशातून स्वतःच्या कुटुंबाचा नाश करणार नाही. मी नशेपासून दूर राहून, जागरूक आणि शहाणा राहीन. कारण जागरूक माणूसच क्रांती करू शकतो, दारुड्या नाही. याच कारणासाठी बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना सांगितले होते तुम्हाला मंदिरापेक्षा शाळा महत्वाची वाटली पाहिजे पुढच्या ५ प्रतिज्ञा या बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानाचा गाभा आहेत, ज्यात बाबासाहेबांनी हिंदू धर्मातील आत्मा, अवतार, कर्मकांड पूर्णपणे नाकारले आहे. मी बुद्ध धम्माच्या तीन तत्वांप्रमाणे प्रज्ञा, शील, करुणा यांप्रमाणे वागेन. आतापर्यंतच्या ११ ते १७ प्रतिज्ञा या तीन शब्दांचाच विस्तार होत्या. आता बाबासाहेब या तीन शब्दांत संपूर्ण बौद्ध धम्म सांगतात. याला बौद्ध धम्माचा त्रिसूत्री मार्ग म्हणतात. बाबासाहेब म्हणतात, हिंदू धर्मात त्रिमूर्ती आहेत ते म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश. पण माझ्या धम्मातही त्रिमूर्ती आहे, पण ती माणसाला माणूस बनवणारी आहे. प्रज्ञा – म्हणजे शहाणपण, बुद्धी. अंधश्रद्धा नको, बुद्धी हवी. कोणीतरी सांगितले म्हणून मानायचे नाही. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या बुद्धीने तपासून पाहणे. प्रज्ञा म्हणजे प्रश्न विचारणे. हे खरे आहे का? याचा पुरावा काय? याने माणसाचे कल्याण होते का? बाबासाहेब म्हणतात, ज्या धर्मात प्रज्ञा नाही, तो धर्म नसून गुलामगिरी आहे. म्हणून मी माझी बुद्धी जागी ठेवेन. मी शिकेन, वाचेन, विचार करेन. शील – म्हणजे सदाचार, चांगले वागणे. फक्त हुशार असून उपयोग नाही, तर चांगलेही असले पाहिजे. शील म्हणजे पंचशील – मी हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटे बोलणार नाही, दारू पिणार नाही. प्रज्ञा जर डोके असेल, तर शील हे हात आहेत. जे चांगले समजले, ते प्रत्यक्ष वागून दाखवणे, याचे नाव शील. बाबासाहेब म्हणतात, हुशार माणूस धोकादायक असू शकतो, पण शीलवान माणूस कधीही धोकादायक नसतो. करुणा म्हणजे सर्वांवर प्रेम, दया. मी फक्त स्वतःपुरते शहाणे आणि चांगले राहून उपयोग नाही. तर दुसऱ्याच्या दुःखाने माझे हृदय पाघळले पाहिजे. करुणा म्हणजे दुसऱ्याचे दुःख दूर करण्याची इच्छा. हिंदू धर्मात दया फक्त स्वतःच्या जातीपुरती होती. बौद्ध धम्मातील करुणा ही सर्व प्राणीमात्रांसाठी आहे – मग तो ब्राह्मण असो की महार, माणूस असो की प्राणी. प्रज्ञा आणि शील स्वतःला सुखी करतात, पण करुणा सगळ्या जगाला सुखी करते. बाबासाहेब हे खूप सुंदर पद्धतीने सांगतात. प्रज्ञा नसेल तर शील आंधळे आहे. तुम्हाला चांगले-वाईटच कळणार नाही. शील नसेल तर प्रज्ञा पंगू आहे. तुम्हाला कळेल पण तुम्ही वागणार नाहीत आणि करुणा नसेल तर प्रज्ञा आणि शील दोन्ही स्वार्थी आहेत. तुम्ही फक्त स्वतःसाठी जगाल. म्हणून या प्रतिज्ञेचा अर्थ आहे की मी फक्त हुशार बनणार नाही, मी चांगला बनेन. आणि फक्त चांगला बनून थांबणार नाही, तर दुसऱ्यासाठी चांगला बनेन. मी बुद्धीने विचार करेन, शीलाने वागेन आणि करुणेने जगेन. या पुढची म्हणजे एकोणाविसावी प्रतिज्ञा ही बाबासाहेबांनी केलेली सर्वात मोठी क्रांती आहे. मी माझ्या जुन्या हिंदू धर्माचा त्याग करून आजपासून बौद्ध धम्माचा स्वीकार करीत आहे. ही प्रतिज्ञा नाही, हा एक जाहीरनामा आहे. इतिहासातला सर्वात मोठा धर्मांतराचा जाहीरनामा. बाबासाहेबांनी या एका वाक्यात ३००० वर्षांची गुलामगिरी जाळून टाकली. या प्रतिज्ञेचा मतितार्थ असा की, मी तो धर्म सोडत आहे ज्याने मला माणूस मानले नाही. मी तो धर्म सोडत आहे जिथे माझी सावलीही विटाळ होती, जिथे मला मंदिर, पाणी, शिक्षण नाकारले. मी तो धर्म सोडत आहे जिथे माझा जन्मच माझा गुन्हा ठरवला होता. हा त्याग फक्त देव बदलण्याचा नाही, तर गुलामगिरीचा त्याग आहे. मी भीतीने नाही, तर बुद्धीने धर्म स्वीकारत आहे. मी स्वर्गाच्या आमिषाने नाही, तर या जन्मात सुखी होण्यासाठी धम्म स्वीकारत आहे. बाबासाहेब म्हणतात, धम्म म्हणजे धर्म नाही. धर्म म्हणजे देव, आत्मा, कर्मकांड. धम्म म्हणजे जीवन जगण्याचा शुद्ध मार्ग – प्रज्ञा, शील आणि करुणा होय. बाबासाहेब म्हणाले होते की, आजपर्यंत मी हिंदू होतो म्हणून अस्पृश्य होतो. आजपासून मी बौद्ध झालो, मी अस्पृश्य राहिलो नाही. १४ ऑक्टोबर १९५६, नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी स्वतः भदंत चंद्रमणी महाथेरो यांच्याकडून दीक्षा घेतली आणि मग लाखो लोकांना दिली. तेव्हा ते जोराने म्हणाले होते – आजपासून मी हिंदू म्हणून मरणार नाही. ही वेळ फार बाका होती धर्मांतर म्हणजे घर बदलणे नाही, तर नाव बदलणे नाही, तर मन बदलणे आहे. ही प्रतिज्ञा आम्हाला सांगते, मी आज माझा जुना अपमानास्पद भूतकाळ जाळत आहे आणि एका नव्या, समानतेच्या, स्वाभिमानाच्या आयुष्याला सुरुवात करत आहे. मी आता कोणत्याही देवाचा गुलाम नाही, मी स्वतःचा मालक आहे. मी बौद्ध आहे. फक्त बौद्ध आहे. – प्रज्ञाधर ढवळे , नांदेड. मो. 9890247953. Kanthak Suryatal Post Views: 46 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचा अन्वयार्थ : भाग एक