लातूर (प्रतिनिधी) – नागरिकांच्या अडचणी थेट जाणून घेत त्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे जिल्ह्यातील तक्रारदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. नागरिकांच्या तक्रारींचे तत्परतेने निराकरण करून पोलीस आणि जनता यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जनसंवाद उपक्रमाला लातूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये लोकाभिमुख पोलीस प्रशासन अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने उमाप यांनी ‘जनसंवाद’ उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून नागरिकांना आपल्या तक्रारी थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. लातूर जिल्ह्याच्या पोलीस कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक उमाप सकाळपासून पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित होते. याचवेळी दुपारी ३ ते ५ या वेळेत त्यांनी जिल्ह्यातील नागरिक व तक्रारदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या संवादादरम्यान एकूण २३ तक्रारदारांनी आपले लेखी अर्ज पोलीस उपमहानिरीक्षकांकडे सादर केले. प्राप्त तक्रारींमध्ये मालमत्तेचे वाद, मारहाण, दाखल गुन्ह्यांचा तपास, सायबर फसवणूक, पोलीस संरक्षण, कौटुंबिक वाद तसेच अवैध व्यवसाय यांसह विविध स्वरूपाच्या तक्रारींचा समावेश होता. प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेत उमाप यांनी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तक्रारींचे वेळेत आणि नियमानुसार निराकरण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. दरम्यान, तक्रारदारांच्या अर्जांवर जलदगतीने कार्यवाही व्हावी यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाकडून यापूर्वीच संवेदना तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. जनसंवाद उपक्रमादरम्यान प्राप्त झालेले सर्व २३ अर्ज संवेदना प्रणालीच्या माध्यमातून पुढील चौकशी व आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येणार आहेत. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रत्येक तक्रारीवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा नियमित आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील फीडबॅक टीममार्फत घेतला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी केवळ स्वीकारल्या न जाता त्यावर प्रत्यक्षात कोणती कार्यवाही झाली, याचीही वरिष्ठ पातळीवर पडताळणी केली जाणार आहे. जनसंवाद आणि संवेदना या दोन्ही उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे, त्यांचे तातडीने निराकरण करणे आणि पोलीस प्रशासनाबद्दलचा विश्वास अधिक बळकट करणे, हा लोकाभिमुख पोलीसिंगचा महत्त्वाचा भाग ठरत आहे. यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. Post Views: 106 Facebook WhatsApp Twitter LinkedIn Post navigation इंदरजितसिंग बावरी खून प्रकरणात दोन महिलांसह सहा जणांना मकोका पोलीस कोठडी