देगलूर (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत देगलूर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून जुगार खेळणाऱ्या एकूण १६ जणांवर कारवाई केली. या दोन्ही कारवायांमध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ३० हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पहिली कारवाई २० सप्टेंबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास मौजे देगाव पुनर्वसन, ता. देगलूर येथील हनुमान मंदिरासमोरील मोकळ्या जागेत करण्यात आली. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष अचानक छापा टाकला. यावेळी काही जण गोलाकार बसून पैशांवर ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळताना आढळून आले. या कारवाईत बालाजी थडके (वय ३०, रा. देगाव), हणमंत निवृत्ती डोंगळे (वय ३१, रा. देगाव पुनर्वसन), राजेश शिवाजी जाधव (वय २८) तसेच चंद्रकांत सुरेश शिंदे (वय ३३, रा. देगाव) यांच्यासह आरोपींवर कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून रोख रक्कम ११ हजार ८४० रुपये, मोबाईल फोन व जुगाराचे साहित्य असा एकूण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४६२/२०२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई मौजे गवंडगाव, ता. देगलूर येथील अंगणवाडीसमोरील मोकळ्या जागेत करण्यात आली. पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना काही इसम पैशांवर पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने छापा टाकून १२ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईतील आरोपींची नावे तुकाराम मारोती मरपळे (वय २४), रावबा सोनतोडे (वय ४७), सुरेश विठ्ठलराव नरमूलके (वय ५०), मारोती रावबा, गणेश माधवराव वरखंडे (वय ४०), ज्ञानेश्वर पंढरीनाथ साधु (वय ५४), दत्ता माधवराव वरखंडे (वय ४०), दिलीप गोविंद गोरे (वय २४), शहाजी यादव लुटे (वय ३५), प्रतिक बालाजी नरवाडे (वय २३), ज्ञानेश्वर गणपत नरमूलके (वय २०) आणि रमेश चंदर गुडलवार (वय ३२) अशी आहेत. या ठिकाणाहून पोलिसांनी पंचांसमक्ष ७ हजार ७६० रुपये रोख, विविध कंपन्यांचे ९ मोबाईल फोन व जुगाराचे साहित्य, असा एकूण १ लाख ८ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४६३/२०२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव तसेच परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी वैभव पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस अंमलदार संतोष बोकंलवार आणि गणेश बोदेमवाड (सर्व नियुक्ती देगलूर पोलीस ठाणे) यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. अवैध जुगार, मटका तसेच इतर बेकायदेशीर प्रकारांविरुद्ध पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू असून, नागरिकांनी अशा अवैध हालचालींची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 86 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हदगावात दोन दुकानांची कुलपे तोडून चोरी; रोख रकमेसह १ लाख ६० हजारांहून अधिकचा मुद्देमाल लांबविला