नांदेड पोलिसांची गतिमान आणि आदरयुक्त सेवा: आधी शेख जाकिरला प्रेमाचा फोन, मग तक्रारदाराची दखल!

​नांदेड (प्रतिनिधी) – कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजवण्यात अग्रेसर असणाऱ्या नांदेड पोलिसांच्या खाकीची एक अत्यंत कौतुकास्पद आणि तेवढीच गतिमान कार्यपद्धती नुकतीच समोर आली आहे. नांदेड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ च्या नगरसेविका आफिया नाज यांनी नुकतीच पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी बोलावलेल्या तक्रार निवारण कक्षात हजेरी लावली आणि पोलिसांच्या या अत्यंत सच्च्या आणि प्रामाणिक मैत्रीची पोलखोल केली.

तक्रार येताच आरोपीला खास व्हीआयपी ट्रीटमेंट!

नगरसेविका आफिया नाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा त्या विमानतळ पोलीस ठाण्यात तथाकथित समाजसेवक शेख जाकीर शेख सबीर याच्याविरुद्ध तक्रार घेऊन जातात, तेव्हा विमानतळ पोलीस ठाण्याचे अत्यंत कर्तव्यदक्ष प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे हे तक्रारदाराचे ऐकण्याऐवजी सर्वात आधी त्या तथाकथित समाजसेवकाला फोन फिरवतात. अहो जाकीरजी, तुमच्याविरुद्ध तक्रार आली आहे हं!  असा अत्यंत प्रेमाचा आणि सावधगिरीचा इशारा ते आधीच देऊन टाकतात. आता या पोलिसांच्या अनोख्या मित्रत्वाचा आणि अलिखित सहकार्याचा काय अर्थ काढावा, हा सामान्य जनतेसाठी खरोखरच मोठा प्रश्न आहे.असेच संदर्भ जोडूनच पोलीस आरोपीना पकडतात.

नावात काय आहे? संदर्भ समजायला काय अक्कल लागते?

शेख जाकीर शेख सगीरने वेगवेगळ्या सोशल मीडिया साइट्सवर नगरसेविका आफिया नाज, त्यांचे कुटुंब, आई-वडील आणि सासू-सासरे यांच्याबद्दल अत्यंत घाणेरड्या आणि वाईट भाषेत लिखाण केले आहे. पण आमचे पोलीस उप अधीक्षक रामेश्वर व्येंजने यांनी तर कहरच केला! त्यांनी थेट शहाजी उमाप यांना सांगितले की, यात त्यांचे थेट नाव कुठे आहे? आता पोलीस प्रशासनाला हे कोण समजावून सांगणार की, पूर्वीचा संदर्भ पाहिला की ते लिखाण कोणासाठी आहे हे अगदी स्पष्ट होते. पण कायदा आंधळा असतो म्हणतात, तसे आपले पोलीसही या संदर्भाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत तक्रार घेण्यास टाळाटाळ करत आहेत.

सुरक्षा पुरवण्यात पोलिसांची बुलेट ट्रेन पेक्षाही वेगवान तत्परता!

या तथाकथित समाजसेवकाचा इतिहास पाहिला तर त्याने केवळ नांदेडच नव्हे, तर इतरही अनेक ठिकाणी लोकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. पण तरीही नांदेड पोलिसांना त्याच्याबद्दल इतकी आपुलकी की, त्याला चक्क २४ तासांत सुरक्षा अहवाल तयार करून पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली! गुन्हेगाराला इतक्या वेगाने पोलीस संरक्षण कसे मिळते आणि २४ तासांत अहवाल कसा तयार होतो, याची चौकशी व्हायला हवी ना? उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून आणि माजी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार याना चुकीची माहिती सादर करायला लावून शेख जाकीर शेख सगीरने पोलीस सुरक्षा रक्षक मिळवलेला आहे. अशी संतप्त विचारणा आफिया नाज यांनी केली आहे. यापूर्वीही त्याने अनेकांना त्रास देऊन, त्यांच्यावर दबाव आणून तडजोडीच्या नावाखाली तक्रारी मागे घ्यायला घेण्याचा इतिहास आहे.

अहंकाराचा अंत ठरलेलाच!

या संपूर्ण भोंगळ कारभारावर संताप व्यक्त करताना आफिया नाज यांनी शेवटी एक अत्यंत खोचक आणि चपखल टोमणा मारला आहे. या जगात कंसाचे राज्य संपले, रावणाचे संपले, हिटलर आणि मुसोलिनीसारख्या हुकूमशहांचे साम्राज्यही धुळीस मिळाले; तर मग या तथाकथित समाजसेवकाचा आणि त्याला पाठिशी घालणाऱ्या यंत्रणेचा अंत कधीतरी निश्चितच होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.शेख जाकीर यांची एक मैत्रीण प्रभाग क्रमांक २ मध्ये सुद्धा असल्याची खात्रीलायक बातमी आहे. महिलांच्या संबंधाने अनेक गुन्हे दाखल असलेल्या एका वकिलाला सुद्धा शेख जाकिरने बंदूक मिळवून दिली आहे म्हणे. तो वकील सुद्धा त्याची दलाली करण्यात सध्या मग्न आहे,अशी खात्रीलायक माहिती आहे. आता प्रश्न उरतो तो एवढाच की, विमानतळ पोलीस ठाण्याचे दयाळू अधिकारी शेख जाकीरवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार की त्याला पुन्हा फोन करून नवीन तक्रारीची माहिती देत आपली मित्रसेवा सुरूच ठेवणार?

आजच एक बालक शहाजी उमाप यांच्या समक्ष रडत होता. त्याची सायकल चोरीला गेली होती. त्या संदर्भाने त्याने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अत्यंत कायदेशीर पणेअदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून त्याला न्यायालयात जाण्याची समज दिली.त्याने सायकल चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले.तर पोलीस त्याला उद्धट बोलतात. तेव्हा शहाजी उमाप यांनी त्या बालकाला पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे समोरच विचारले की तू या साहेबाना भेटला होता काय? तेव्हा तो बालक रडू लागला आणि म्हणाला ते साहेब तर जास्त जोरातच बोलतात. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!