नांदेड(प्रतिनिधी )-आंबेडकरी चळवळीचे युवा नेते आनंद उर्फ बंटीभाऊ लांडगे यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘महाराष्ट्र राज्य युवा समाजरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. दै. सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल बबन कांबळे यांच्या हस्ते रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी भदंत पाय्यबोधी महाथेरो, दै. सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी संभाजी कांबळे, भिक्खू महासंघाचे पदाधिकारी, डॉ. पूगारे, आंबेडकरी चळवळीचे नेते रमेश सोनाळे, प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार, सामाजिक कार्यकर्ते सुभाष कटकांबळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.
बंटीभाऊ लांडगे यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. गोरगरीब व गरजू रुग्णांना वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात जाता यावे, यासाठी त्यांनी मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली आहे. अनाथ व निराधार व्यक्तींना मदत करण्यासाठीही ते सातत्याने पुढाकार घेत आहेत.
नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी स्वखर्चातून शहरातील विविध भागांत बोअरवेल करून दिल्या आहेत. गोदावरी नदीकाठच्या परिसरात पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी तत्काळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेत अन्नदान तसेच धान्य किटचे वाटप केले. लॉकडाऊनच्या काळात मास्क व सॅनिटायझरचे वाटप करून नागरिकांना मदतीचा हात दिला.
रमजान ईदच्या निमित्ताने सर्व धर्मगुरूंना एकत्रित करून सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे विविध समाजोपयोगी कार्यक्रम त्यांच्या पुढाकारातून आयोजित केले जातात. सामाजिक सलोखा व एकोपा वाढविण्यासाठीही त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नेतृत्वाखाली विविध देखाव्यांसह भव्य व लक्षवेधी मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. सामाजिक बांधिलकी, गरजूंची मदत, सामाजिक सलोखा आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय योगदान दिल्याची दखल घेत बंटीभाऊ लांडगे यांना ‘युवा समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
या मानाच्या पुरस्काराने गौरव झाल्याबद्दल बंटीभाऊ लांडगे यांचे सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रांतील मित्र परिवार, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून अभिनंदन होत आहे.
बंटीभाऊ लांडगे यांचा ‘युवा समाजरत्न’ पुरस्काराने गौरव
