नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये शिस्त, एकरूपता आणि सेवेची गुणवत्ता राखणे तसेच नागरिकांना जलद व कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देणे या उद्देशाने मनपा प्रशासनाने आज एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशान्वये करण्यात आलेल्या औचक तपासणीत कार्यालयीन वेळेत गैरहजर आढळलेल्या तब्बल 54 कर्मचार्यांना ’कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कार्यालयीन शिस्त व सेवेची गुणवत्ता राखण्यासाठी शासनाच्या नियमांनुसार कर्मचार्यांनी वेळेचे पालन करणे सक्तीचे आहे. ज्यामध्ये वर्ग-3 संवर्गातील कर्मचारी सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 या वेळेत कार्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे. तर वर्ग- संवर्गातील कर्मचारी सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे. याशिवाय, कर्तव्यावर असताना प्रत्येक कर्मचार्याकडे त्याचे अधिकृत ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. तसेच वर्ग-4 संवर्गातील सर्व कर्मचार्यांनी शासनाने निर्धारित केलेल्या राष्ट्रीय गणवेशातच उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रशासकीय कामकाजात गतिशीलता आणण्यासाठी आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अभिजित वायकोस यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष ’तपासणी पथक’ गठीत करण्यात आले आहे. या पथकाने सोमवार दिनांक 31 31ऑगस्ट 2026 रोजी सकाळी कार्यालयीन वेळेत महानगरपालिकेच्या विविध विभागांची औचक पाहणी केली. या तपासणी दरम्यान शासनाने ठरवून दिलेल्या वेळेचे उल्लंघन करून एकूण 54 कर्मचारी कार्यालयात वेळेवर हजर नसल्याचे आढळून आले. कार्यालयीन नियमांचे आणि शिस्तीचे उल्लंघन करणार्या या सर्व 54 कर्मचार्यांची गंभीर दखल घेत प्रशासनाने त्यांना तात्काळ ’कारणे दाखवा’ नोटीस जारी केली आहे. महानगरपालिका प्रशासनाने कर्मचार्यांच्या या गैरशिस्तीबद्दल आणि नियमांच्या उल्लंघनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तुमच्यावर शिस्तभंगाची व दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये? अशी विचारणा या नोटिसीद्वारे करण्यात आली आहे. नोटीस मिळाल्यापासून 24 तासांच्या आत संबंधित कर्मचार्यांनी यावर आपला लेखी खुलासा सादर करावा, असे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. विहित मुदतीत समाधानकारक खुलासा न आल्यास संबंधित कर्मचार्यांवर नियमानुसार कडक प्रशासकीय व दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. Kanthak Suryatal Post Views: 830 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड पोलिसांची गतिमान आणि आदरयुक्त सेवा: आधी शेख जाकिरला प्रेमाचा फोन, मग तक्रारदाराची दखल! नांदेड जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध