नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा म्हटलं की ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व डोळ्यासमोर येतं. पण सध्या नांदेडच्या पोलीस विभागाने मनुष्यबळ व्यवस्थापन या विषयात थेट हार्वर्ड विद्यापीठालाही लाजवेल असं एक अद्भूत आणि अवाढव्य मॉडेल विकसित केलं आहे! या नव्या मॉडेलचं नाव आहे,मुख्यालयात गर्दी, ठाण्यात वर्दीची बंदी! सध्या नांदेड पोलीस विभागातील मनुष्यबळाच्या संख्येत एवढा रंजक आणि मोठा गोंधळ सुरू आहे की, स्वतः विधाता जरी खाली आला तरी त्याला इथल्या नेमणुकांचं गणित सोडवता येणार नाही. एकीकडे नांदेड पोलीस मुख्यालयात तब्बल ८०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत. आता ही ८०० जणांची फौज मुख्यालयाच्या भिंती सुरक्षित ठेवतेय की तिथल्या चहाच्या किटल्या रिकाम्या करण्याचे रेकॉर्ड मोडीत काढतेय, हा संशोधनाचा विषय आहे. पण दुसरीकडे, संपूर्ण नांदेड शहराचं हृदय मानल्या जाणाऱ्या अत्यंत संवेदनशील वजीराबाद पोलीस ठाण्याला मात्र केवळ ७१ पोलिसांच्या भरवशावर रामभरोसे सोडण्यात आलं आहे ! मंजूर विरुद्ध प्रत्यक्ष: सरकारी गणिताची कमाल! कागदोपत्री पाहिलं तर वजीराबाद पोलीस ठाण्यासाठी एकूण १४३ पोलिसांची पदे मंजूर आहेत. पण कागदावरचे पोलीस प्रत्यक्षात आले तर गुन्हेगार घाबरतील कसे? या उदात्त हेतूने प्रत्यक्षात तिथे केवळ ७१ पोलिसांवरच संपूर्ण कारभार चालवला जात आहे. म्हणजे मंजुरीच्या अर्ध्या मनुष्यबळावर हे पोलीस ठाणे चालवले जात आहे. आता या ७१ पोलिसांच्या वाट्याला नेमकी कोणती क्षेत्रे येतात? जरा यावर नजर टाकूया. वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत काय नाही? जगप्रसिद्ध सचखंड श्री हजूर साहेब, मध्यवर्ती बस स्थानक, व्यस्त रेल्वे स्थानक, जिल्ह्याचं सर्वोच्च जिल्हाधिकारी कार्यालय, स्वतः पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसीलदार कार्यालय आणि इतर सर्व महत्त्वाचे सरकारी विभाग याच हद्दीत येतात.याच कार्यालयांवर मोर्चे नेहमीच येतात. एवढंच काय, गोदावरी नदीचा एक मोठा विस्तीर्ण भागही याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर, संपूर्ण नांदेड जिल्ह्याचा कारभार आणि कायदा व सुव्यवस्था ज्या वजीराबादच्या हद्दीतून चालते, तिथले प्रश्न सोडवण्यासाठी आणि बंदोबस्त ठेवण्यासाठी उपलब्ध आहेत अवघे ७१ शूर शिपाई ! पण मुख्यालयात ८०० जण बहुधा सुरक्षित आणि थंड वातावरणात बसून वजीराबादच्या पोलिसांना मानसिक पाठिंबा देत असावेत. संलग्न नावाचा जादुई मंत्र! या ७१ जणांमधूनही काही ‘भाग्यवान’ पोलिसांना एका जादुई मंत्राचा लाभ मिळाला आहे. तो मंत्र म्हणजे, संलग्न! या संलग्न या गोड शब्दाखाली अनेक पोलीस कागदावर वजीराबाद ठाण्यात नोंदवून प्रत्यक्षात मात्र दुसरीकडेच कुठे तरी अतिशय महत्त्वाची आणि वैयक्तिक सोयीची कामे करत आहेत. हा संलग्न प्रकार म्हणजे पगार एका बँकेतून घ्यायचा आणि काम दुसऱ्याच हद्दीत करायचे, असा काहीसा सुकर मार्ग आहे! यात आणखी एक मजेदार ट्विस्ट १५ ऑगस्टला आला. स्वातंत्र्यदिनी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी एक कडक आणि शिस्तप्रिय आदेश काढला. या आदेशानुसार, वजीराबादमधून दुसरीकडे बदली झालेल्या किंवा अन्यत्र संलग्न असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले . पोलीस निरीक्षकांनी आदेशाचे पालन करत तात्काळ सर्वांना कार्यमुक्त करून टाकले. पण गडबड अशी झाली की, गेलेले तर निघून गेले, पण त्यांच्या जागी येणारे नवे पोलीस कर्मचारी मात्र अद्याप वजीराबादच्या वेशीवर पोहोचलेलेच नाहीत [१]! आधीच वजीराबादमध्ये पोलिसांची उपासमार सुरू होती, त्यात या नवीन बदलामुळे आणखीनच भीषण टंचाई निर्माण झाली आहे. स्मार्ट पोलिसांची चांदी, सर्वसामान्यांची नांदी! पण असं समजू नका की या परिस्थितीमुळे सर्वच जण नाराज आहेत. पोलीस विभागातील काही अतिशय ‘समजदार’ आणि चतुर कर्मचाऱ्यांना मात्र ही संख्याबळाची कमतरता अतिशय मनापासून आवडली आहे ! पोलीस ठाण्यात जितकी गर्दी कमी, तितकी स्वतःची चालती जास्त, हे साधे अर्थशास्त्र त्यांना चांगलेच अवगत आहे. संख्या कमी असली की वरिष्ठांचे लक्ष प्रत्येक गोष्टीवर जात नाही, आणि हद्दीत आपले छोटे-मोठे व्यवहार चोखपणे पार पाडता येतात, असा या हुशार पोलिसांचा रास्त अंदाज आहे. पण या महा-नियोजनाचा अंतिम ताण मात्र प्रामाणिक पोलीस अंमलदार आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांवर येत आहे. एकाच पोलिसाला एकाच वेळी व्हीआयपी बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण, फाईल्सचा निपटारा आणि पोलीस स्टेशनची रखवाली अशी अष्टावधान कामगिरी करावी लागत आहे. साहजिकच यामुळे कामाच्या दर्जावर परिणाम होणार आणि चुकीच्या पद्धतीनेच कारभार चालणार, हे उघड आहे. पण नांदेडकरांना आता काळजी करण्याची गरज नाही. जर ७१ पोलीस पूर्ण जिल्ह्याचा महत्त्वाचा भाग सांभाळू शकतात, तर उद्या पोलीस संख्या आणखी कमी करून शून्य पोलीस मॉडेल राबवून नांदेड जिल्हा जागतिक पातळीवर नवा विक्रम प्रस्थापित करू शकतो! तोपर्यंत मुख्यालयातील ८०० सैनिकांनी चहाचा आस्वाद घ्यावा आणि वजीराबादच्या ७१ जणांनी आपली कंबर कसून ठेवावी, हीच सदिच्छा Kanthak Suryatal Post Views: 436 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation १०० रुपयांच्या कर्जाची परतफेड फक्त २६ पैसे! जाणून घ्या कसा चालतोय भारतीय बँकिंग क्षेत्रातील नेक्ससचा सिस्टिमॅटिक खेळ! नांदेड मंडलाच्या सघन तिकीट तपासणी मोहिमेत 943 प्रकरणे उघडकीस; ₹5.97 लाखांची वसुली