नांदेड (प्रतिनिधी) -विद्वत्ता आणि विचारांचा सामना विचाराने करायचे सोडून थेट पुतळ्याच्या हातातील पुस्तकांशी युद्ध पुकारणाऱ्या महाभागांचा हा देश आहे! ज्या महान साहित्यरत्नाने आपल्या क्रांतीकारी साहित्यातून शोषित आणि कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी लेखणी चालवली, त्यांच्याच पुतळ्याच्या हातातील पुस्तकावर राग काढणाऱ्यांच्या बौद्धिक क्षमतेवर हसावे की त्यांची कीव करावी, असा प्रश्न नांदेडच्या घटनेने निर्माण केला आहे. नांदेडमधील सिडको परिसरात घडलेला हा प्रकार म्हणजे केवळ एका पुतळ्याची विटंबना नसून, समाजातील विचारांची नंपुसकता उघडी पाडणारा आहे. रात्रीच्या अंधारातील बौद्धिक पराक्रम ११ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १:०० ते सकाळी ६:०० वाजेच्या सुमारास काही विकृत मानसिकतेच्या माणसांनी आपल्या अगाध शौर्याचे दर्शन घडवले. सिडको येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृह परिसरात बसवण्यात आलेल्या डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना करण्यात आली. अण्णाभाऊंच्या पुतळ्याच्या डाव्या हातात त्यांची अजरामर फकीरा कादंबरी आहे. या कादंबरीतील विचारांची इतकी प्रचंड भीती वाटली की, अज्ञाताने पांढऱ्या पट्टीचा वापर करून त्या पुस्तकाला थेट दोन चपला बांधून लटकवल्या. पुस्तकातील विचारांचा सामना करण्याची हिंमत किंवा लायकी नसलेलेच शेवटी चपलांचा आधार घेतात, हेच या घटनेने सिद्ध केले. सकाळी ६:०० वाजेच्या सुमारास आर. जे. वाघमारे यांच्या नजरेस हा प्रकार पडला आणि त्यांनी सिडको हाडको सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष अंकुश नागोराव गायकवाड यांना फोनवरून या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अध्यक्ष अंकुश गायकवाड, सचिव पप्पू गायकवाड, आनंदा वाघमारे, बंटी बसवते, केशव कांबळे आणि चंदू कांबळे हे समाजबांधव घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पुतळ्याला लटकवलेल्या चपला उतरवून तात्काळ नांदेड ग्रामीण पोलिसांना पाचारण केले. या निंदनीय कृत्यामुळे समाजभावना तीव्र प्रमाणात दुखावल्या जाऊन परिसरात संतापाची लाट पसरली व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. आरक्षणाचा ताप अन् मजुरांचा शौर्य पराक्रम सध्या समाजात आरक्षण वर्गीकरणाचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच तापलेल्या वातावरणात या विकृत कृत्याचा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाला होता. पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्ह्याचा छडा अत्यंत वेगाने लावला आणि दोन संशयितांना जेरबंद केले. अटक करण्यात आलेले दोन तरुण म्हणजे: शंकर किशनराव वनाळे – वय ३० वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. एन.डी. ३१, दत्त मंदिराच्या पाठीमागे, बसवेश्वर नगर, हडको, नांदेड. संदिप देवीदास मोरे – वय २४ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. एन.डी. ३१, दत्त मंदिराच्या पाठीमागे, बसवेश्वर नगर, हडको; ह.मु. मारोती मंदिरा जवळ, गुरुवार बाजार, सिडको, नांदेड. दिवसभर घाम गाळून मजुरी करणाऱ्या या २४ आणि ३० वर्षांच्या तरुणांना अण्णाभाऊंच्या साहित्याचा अन् पुस्तकाचा एवढा काय पोटशूळ उठला होता, हे समजायला मार्ग नाही. स्वतःचे आयुष्य गरिबी आणि मजुरीत जात असताना, कष्टकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या अण्णाभाऊंच्या पुतळ्यावर राग काढणे म्हणजे स्वतःच्याच तोंडाला काळे फासण्यासारखे आहे. पोलीस चाबूक आणि कायद्याचा बडगा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अंकुश गायकवाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एकनाथ भोसले यांनी प्राथमिक पाहणी करून तपास सुरू केला होता. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना पकडून न्यायालयाच्या दारात उभे केले असून, सध्या हे दोघेही न्यायालयीन कोठडीत गजाआड आहेत.यातल्या संदीप देवीदास मोरे याच्यावर तर ॲट्रॉसिटी कायद्याची गंभीर कलमे जोडण्यात आली आहेत. सध्या या संपूर्ण गुन्ह्याचा पुढील तपास इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे करत आहेत. पुतळा विटंबना प्रकरणात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा! प्रा. राजू सोनसळे यांची मागणी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा विटंबना प्रकरणातील आरोपींवर कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई करून राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी प्रा. राजू सोनसळे यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून पडद्यामागील सूत्रधारांचाही शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. पुतळा विटंबना घडली त्या कालावधीत सचिन साठे हे सलग तीन दिवस नांदेड शहरात तळ ठोकून होते, असा दावा प्रा. सोनसळे यांनी केला असून, या पार्श्वभूमीवर सचिन साठे यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.नांदेड येथील सभेत सचिन साठे यांनी केलेल्या “आमची जात गुन्हेगार होती” या वक्तव्याचाही संदर्भ देत प्रा. सोनसळे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या मते, नांदेड शहरात पुतळा विटंबना आणि तरुणीवरील बलात्कार अशा दोन गंभीर घटना घडल्या असून, या घटनांच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तींच्या वक्तव्यांची व हालचालींचीही चौकशी होणे आवश्यक आहे. केवळ आरोपी पकडून भागणार नाही; या प्रकरणामागे कोण आहे, कोणाची भूमिका आहे आणि नेमका सूत्रधार कोण, याचा छडा पोलिसांनी लावला पाहिजे, अशी मागणी प्रा. राजू सोनसळे यांनी केली. Kanthak Suryatal Post Views: 263 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आरक्षणाच्या आडून महिलांवर अश्लील भाष्य? माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंच्या बेताल वक्तव्यावरून नांदेडमध्ये संतापाचा उद्रेक!