नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील शिवाजीनगर परिसरात वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना शिवाजीनगर पुलावर सुरू असलेल्या पार्किंगमुळे नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे या परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी असलेल्या वाहतूक शाखेचे या समस्येकडे दुर्लक्ष का होत आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शिवाजीनगर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या दिशेने जाण्यासाठी साधारणपणे तीन प्रमुख मार्ग उपलब्ध आहेत. यामध्ये शिवाजीनगर पुलावरील मार्ग, हनुमान मंदिराकडून जाणारा मार्ग तसेच शिवाजीनगरहून खा. अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानाच्या दिशेने जाणारा मार्ग यांचा समावेश आहे. मात्र, यापैकी एका मार्गावर सध्या काम सुरू असल्याने तो मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. परिणामी या परिसरातील वाहतुकीचा मोठा भार उर्वरित रस्त्यांवर पडला आहे. एक मार्ग बंद असल्यामुळे नागरिक आणि वाहनचालक पर्यायी मार्गांचा वापर करत आहेत. मात्र, शिवाजीनगर पुलावर करण्यात आलेल्या पार्किंगमुळे उपलब्ध रस्त्याची रुंदी आणखी कमी होत असून वाहनांची कोंडी निर्माण होत आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत दुचाकी, चारचाकी तसेच रिक्षांची मोठी वर्दळ असते. त्यात रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो आणि काही वेळा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. शहरातील महत्त्वाच्या वाहतूक मार्गांपैकी शिवाजीनगर परिसर हा एक असून येथे सातत्याने वाहतूक सुरळीत ठेवण्याची गरज आहे. एकीकडे रस्त्याचे काम सुरू असल्याने पर्यायी मार्गांवर वाहतुकीचा ताण वाढला आहे, तर दुसरीकडे पुलावरील पार्किंगमुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे. शिवाजीनगर पुलावरील पार्किंग नेमके कधी हटविण्यात येणार? वाहतूक शाखेकडून या ठिकाणी पार्किंगला परवानगी आहे का? पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असताना कारवाई का केली जात नाही? तसेच रस्त्याचे काम सुरू असताना वाहतूक व्यवस्थेसाठी पर्यायी नियोजन करण्यात आले आहे का, असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. वाहतूक शाखेने या समस्येची तातडीने दखल घेऊन शिवाजीनगर पुलावरील पार्किंग हटवावे, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी आणि रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक नियमनासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.शहरात वाहतूक शाखा कार्यरत असताना एवढ्या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष का केले जात आहे, हा प्रश्न मात्र सध्या अनुत्तरितच आहे. Kanthak Suryatal Post Views: 539 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation संपादक की जादूगार? रामललाच्या दर्शनासाठी लाचेचा रेट देणारी दैनिक भास्करची बातमी ४८ तासांत कशी गायब झाली? वाचा सविस्तर विश्लेषण! तुमच्या घामाचा पैसा मंत्र्यांच्या भिंतींवर: ९२.३५ कोटींच्या दुरुस्ती मागचे वास्तव