नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील सर्व घरगुती एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांनी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया १५ ऑगस्ट २०२६ पूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले आहे. गॅस पुरवठा नियमित व सुरळीत राहण्यासाठी ग्राहकांनी विहित मुदतीत ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.
गॅस एजन्सीवर ई-केवायसी कशी करावी?
ग्राहकांनी आपल्या संबंधित गॅस एजन्सीला आधार कार्ड व गॅस पासबुक घेऊन भेट द्यावी. एजन्सीवर बायोमेट्रिक अर्थात अंगठ्याच्या ठशाद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल.
मोबाईल ॲपद्वारेही ई-केवायसीची सुविधा
ग्राहकांना घरबसल्या संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत मोबाईल ॲपद्वारेही ई-केवायसी करता येणार आहे. यासाठी IndianOil One, Bharatgas किंवा HP Pay यांसारख्या अधिकृत ॲपचा वापर करून आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनद्वारे प्रक्रिया पूर्ण करता येईल. ई-केवायसीची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क देऊ नये. अंतिम मुदतीच्या वेळी होणारी गर्दी व धावपळ टाळण्यासाठी ग्राहकांनी १५ ऑगस्टपूर्वीच ई-केवायसी पूर्ण करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
