नांदेड (प्रतिनिधी)- काल दुपारी शहरातील दूध डेअरी जवळ असलेल्या पेट्रोल पंपा जवळ खून झालेल्या प्रकरणात नितीन बिगानीया, किन्ना परदेशी, दिलीप डाकोरे, ज्योती बिगानीया, अंजली बिगानीया, कैलास बिगानीया यांच्यासह इतरांची नावे एफआय आर मध्ये लिहिलेली आहेत.यातील कैलास बिघानिया तर तुरुंगात आहेत. शहरातील के.बी. गँगच्या नावाने दहशत निर्माण केल्याचा आरोप असलेल्या टोळीशी संबंधित धक्कादायक खुनाची घटना समोर आली आहे. मोटारसायकल जप्त केल्याच्या वादातून २५ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याचा खून करण्यात आल्याची तक्रार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या घटनेत आणखी एक तरुण जखमी झाला आहे. घटनेप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा क्रमांक ९५१/२०२६ नोंदविला आहे. एफआयआरनुसार, मृत तरुणाचे नाव इंदरजितसिंघ बलजितसिंघ बावरी (वय २५) असे आहे. तो जुना कौठा, नांदेड येथील रहिवासी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तक्रारदाराच्या जबाबानुसार, काही दिवसांपूर्वी तक्रारदार आणि इंदरजितसिंघ यांनी हिंगोली गेट परिसरात विनानंबरची बजाज पल्सर-२२० मोटारसायकल तपासणीसाठी थांबवली होती. संबंधित वाहन एजन्सीच्या यार्डमध्ये जमा करण्यात आले. त्यानंतर या वाहनावरून धमक्या दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ७ ऑगस्ट रोजी तक्रारदार आणि इंदरजितसिंघ यांना काही व्यक्तींनी रस्त्यात अडवून मोटारसायकल सोडण्याची मागणी करत धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, ८ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १ वाजता धनेगाव परिसरातील पेट्रोल पंपाजवळ तक्रारदार आणि इंदरजितसिंघ मोटारसायकलवरून जात असताना नितीन बिगानीया आणि किन्ना परदेशी यांनी त्यांना अडवल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, नितीन बिगानीया याने तक्रारदाराच्या कपाळावर मारहाण केली, तर किन्ना परदेशी याने लाकडाने त्याच्या पायावर वार केला. यानंतर दिलीप डाकोरेसह अन्य व्यक्ती घटनास्थळी आल्याचे तक्रारीत नमूद आहे. इंदरजितसिंघवर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले, त्यामुळे तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाल्यानंतर जखमी इंदरजितसिंघला रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात मनजीतसिंग किशनसिंग बावरी यांच्या तक्रारीवरून नितीन बिगानीया, किन्ना परदेशी, दिलीप डाकोरे, ज्योती बिगानीया, अंजली बिगानीया, कैलास बिगानीया आणि इतर संशयितांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहितेतील १०३(१), १८९(२), १९०, १९१(३), ६१(२)(अ), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३५१(४) तसेच शस्त्र कायदा आणि इतर संबंधित कलमे लावण्यात आली आहेत.या गुन्ह्याचा क्रमांक ९५१/२०२६ असा आहेया प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील संजय साळुंके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मोटारसायकल जप्तीच्या वादातून सुरू झालेला वाद थेट खुनापर्यंत पोहोचल्याने नांदेड शहरात खळबळ उडाली असून, या प्रकरणातील सर्व आरोपींच्या अटकेकडे आता लक्ष लागले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,814 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation एलपीजी ग्राहकांनी १५ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी धनुष्यबाण प्रकरण; सत्ता हा असा चुंबक आहे जो लोकशाहीच्या तत्त्वांनाच खेचून घेतो! – सर्वोच्च न्यायालयात सिबल कडाडले