संघर्षातून यशाकडे जाण्याचा प्रेरणादायी संदेश; बालकांना मिठाई, फटाक्यांचे वाटप नांदेड (प्रतिनिधी) – दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा, आपुलकीचा आणि माणुसकीचा सण! आपल्या आनंदात समाजातील वंचित आणि गरजू घटकांनाही सहभागी करून घेतल्यास या सणाचे महत्त्व अधिकच वाढते. याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आज दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३५ वाजता शासकीय निरीक्षणगृह (मुलांचे), नांदेड येथे विधीसंघर्षग्रस्त बालकांसमवेत दिवाळीचा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती विद्या संभाजी आळणे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, नांदेड. होत्या. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेडचे पॅनल अधिवक्ता ॲड. बाबू गावंडे अंजनीकर, ॲड. मनीषा पाठक आणि ॲड. कुसुमताई वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सर्वांत भावनिक आणि प्रेरणादायी वैशिष्ट्य म्हणजे ॲड. बाबू गावंडे अंजनीकर हे स्वतः याच शासकीय निरीक्षणगृहाचे माजी विद्यार्थी आहेत. ज्या वास्तूमध्ये त्यांचे बालपण गेले, जिथे त्यांनी जीवनातील संघर्षाचे धडे घेतले, त्याच वास्तूमध्ये आज ते अधिवक्ता म्हणून परतले आणि तेथील बालकांसोबत दिवाळी साजरी केली. एकेकाळी याच संस्थेचा विद्यार्थी असलेला मुलगा आज शिक्षणाच्या बळावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड येथे पॅनल अधिवक्ता म्हणून कार्यरत आहे, ही बाब उपस्थित बालकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरली. वडिलांसोबत चिरंजीवांचाही माणुसकीचा दिवाळी उत्सव! या उपक्रमात ॲड. बाबू गावंडे अंजनीकर यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव धनंजय आणि धनराज यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. आपल्या वडिलांसोबत त्यांनी विधीसंघर्षग्रस्त बालकांना मिठाई व फटाके देऊन त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद वाटून घेतला. आपल्या मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता माणुसकी, सामाजिक बांधिलकी, समता, सहकार्य आणि इतरांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचे संस्कार प्रत्यक्ष कृतीतून मिळावेत, या उदात्त भावनेतून त्यांनी आपल्या दोन्ही चिरंजीवांना या उपक्रमात सहभागी करून घेतले. वडिलांनी ज्या वास्तूमध्ये बालपणातील संघर्ष अनुभवला, त्याच वास्तूमध्ये आज आपल्या मुलांसह परत येऊन इतर बालकांसोबत आनंद साजरा करणे, हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक आणि संस्मरणीय ठरला. संघर्ष करा, शिका, अधिकारी बना; नाहीतर एक चांगला माणूस तरी बना! यावेळी बालकांशी संवाद साधताना ॲड. बाबू गावंडे यांनी आपल्या जीवनप्रवासातील अनुभव कथन केले. ते म्हणाले, मुलांनो, संघर्ष करा, शिका, अधिकारी बना; नाहीतर एक चांगला माणूस तरी बना. मीसुद्धा याच शासकीय निरीक्षणगृहात राहून शिक्षण घेतले आहे. आज मी वकील म्हणून समाजात कार्यरत आहे. माझ्याप्रमाणेच या संस्थेतून शिक्षण घेऊन अनेक माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत, विविध पदांवर कार्यरत आहेत. कोणी अधिकारी झाले, कोणी व्यापारी झाले, तर कोणी समाजसेवेच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देत आहेत. त्यामुळे तुम्हीसुद्धा इथेच थांबून राहू नका. शिक्षण घ्या आणि स्वतःचे भविष्य घडवा. पुढे मार्गदर्शन करताना ते म्हणाले, भूतकाळात जे घडून गेले, त्यातून धडा घ्या. यापुढे चुका होणार नाहीत, याची दक्षता घ्या. ठेच लागल्यानंतरच माणूस रस्त्यातील दगड बाजूला काढायला शिकतो. आयुष्यात आलेल्या अडचणी आणि अनुभव यांना आपल्या प्रगतीतील अडथळा न समजता पुढे जाण्याची संधी समजा. रस्त्यात आलेला दगड बाजूला काढून माणूस जसा पुढे जातो, तसेच आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करून पुढे चला.आपल्या आयुष्यातील सर्वांत अनमोल धन म्हणजे पुस्तक आणि शिक्षण. तुमच्या अंगावरील कपडे, घरातील दागिने, शेती, संपत्ती कोणीही हिरावून घेऊ शकते; परंतु तुमच्या डोक्यातील ज्ञान कोणीही चोरून नेऊ शकत नाही. त्यामुळे ज्ञान मिळवा, स्वतःच्या पायावर उभे राहा. विद्या हीच तुमची खरी संपत्ती आहे. त्यांनी बालकांना चांगली संगत, शिस्त, सकारात्मक विचार आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच भविष्यात कोणत्याही अडचणी आल्यास योग्य मार्गदर्शनासाठी आपण सदैव सोबत असल्याचा विश्वास दिला. अडचणीच्या प्रसंगी मदतीसाठी वकील बांधवांची साथ अध्यक्षीय समारोपात श्रीमती विद्या संभाजी आळणे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, नांदेड.यांनी बालकांना चांगले वागण्याचा, नियमित शिक्षण घेण्याचा, स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडविण्याचा आणि उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश दिला. कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी योग्य मार्गदर्शन व मदत मिळवून देण्यासाठी उपस्थित अधिवक्ते आणि संबंधित यंत्रणा सहकार्य करतील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. बालकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य कायदेशीर मार्गदर्शन मिळावे, यासाठीही उपस्थितांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली. मिठाई, फटाके आणि आनंदाचा अविस्मरणीय क्षण! कार्यक्रमादरम्यान बालकांना मिठाई व फटाक्यांचे वाटप करण्यात आले. जुन्या आठवणींना उजाळा देत, बालकांशी मनमोकळा संवाद साधत सर्वांनी एकत्रितपणे दिवाळीचा आनंद घेतला. बालकांनी हातात फुलबाज्या घेऊन आनंदोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आनंदमय आणि आपुलकीच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मान्यवरांचे सहकार्य या उपक्रमासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेडचे सचिव श्री. शरद देशपांडे साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच शासकीय निरीक्षणगृहातील अधीक्षक श्री. एस. जे. हिवराळे, शिक्षिका श्रीमती ए. आर. हवेलीकर, शिक्षक श्री. एस. आर. शिंदे, नीलेश कुलकर्णी आणि क.का.वा. श्रीमती एम. जी. गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष सहकार्य केले. याशिवाय ॲड. मनीषा पाठक, ॲड. कुमूताई वाघमारे, विधी क्षेत्रातील सहकारी, समाजसेवक आणि हितचिंतकांनीही मदतीचा हात पुढे केला. सर्वांच्या सहकार्यामुळे हा दिवाळीचा उपक्रम आनंदात आणि उत्साहात पार पडला. एक प्रेरणादायी प्रवास… अनेकांसाठी आशेचा दीप! या कार्यक्रमातून केवळ मिठाई आणि फटाक्यांचे वाटप झाले नाही, तर एका माजी विद्यार्थ्याने आपल्या संघर्षमय जीवन प्रवासातून आजच्या बालकांसमोर आशेचा नवा मार्ग ठेवला. ज्या संस्थेने बालपणी आधार दिला, त्याच संस्थेत पुन्हा येऊन तेथील बालकांना प्रेरणा देणे, त्यांच्यासोबत आनंद वाटून घेणे आणि स्वतःच्या पुढील पिढीलाही माणुसकीचे संस्कार देणे, ही या उपक्रमाची खरी उपलब्धी ठरली. जिथे बालपण गेले, तिथेच आज प्रेरणेचा दीप प्रज्वलित झाला. आणि त्या प्रकाशात अनेक बालकांच्या उज्ज्वल भविष्याची नवी स्वप्ने उजळली! Kanthak Suryatal Post Views: 125 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गोदाकाठावर मंगळवारी रंगणार दिवाळी पाडवा पहाट पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यास नकार दिल्याने पतीचा संताप; ओढणीने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न