नांदेड – येथील भूमीकन्या, महाराष्ट्र भूषण आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास उलगडून दाखविणारा धडा बालभारती या इंग्रजी माध्यमाच्या ग्रेड थ्री या शालेय अभ्यासक्रमात यावर्षीपासून समाविष्ट करण्यात आला आहे.
अवघ्या अकरा वर्षाच्या क्रीडा प्रवासात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत गोळाफेक व भालाफेक या क्रीडा प्रकारात पदकांची लयलूट करून सर्वोच्च स्थान निर्माण करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवाशी असलेली भाग्यश्री माधवराव जाधव यांचा जीवन प्रवास संघर्षमय असून एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे आहे.
पॅरा ऑलिम्पिक व वर्ल्ड चॅम्पियन शिप स्पर्धेत महाराष्ट्र बरोबरच भारताचे प्रतिनिधित्व दोन वेळा भाग्यश्री जाधव यांनी केलेले आहे.नुकत्याच झालेल्या वर्ल्ड पॅरा ऑलम्पिक स्पर्धेत भारताची ध्वजवाहक होण्याचा बहुमान देखील त्यांना मिळालेला आहे.महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कामगिरीची दखल घेत शिवछत्रपती पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे.त्याचबरोबर मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी या पदी त्यांची नियुक्ती देखील केलेली आहे.
भाग्यश्री जाधव यांच्या संघर्षमय जीवन व यशोगाथा यांची दखल राज्य शासनाच्या बालभारती अभ्यासक्रम समितीने घेतली आहे. त्यांच्या जीवनावरील धडा इंग्रजी माध्यमाच्या ग्रेड थ्री या शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला आहे.
बालभारतीच्या पुस्तकातील पान क्रमांक 39 वर युनिट टू मध्ये स्ट्रगलर भाग्यश्री जाधव या शीर्षकाखाली त्यांच्या जीवनाचा प्रवास उलगडून दाखविण्यात आला आहे.त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी भाग्यश्री जाधव यांच्या बद्दल काही प्रश्न देखील विचारण्यात आले आहे.
विशेष म्हणजे भाग्यश्री जाधव यांच्या जीवनाला कलाटणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे त्यांचे प्रेरणास्थान ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे यांच्या मोलाच्या सहकार्याबद्दलची नोंद देखील सदरील धड्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्याच्या अखिल जगात डंका वाजविणाऱ्या महाराष्ट्र भूषण भाग्यश्री जाधव शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील पहिल्या खेळाडू आहेत. क्रीडा इतिहासात अजरामर ठरणाऱ्या भाग्यश्री जाधव यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
आपला जीवन प्रवास उलगडून दाखवून शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणात देण्यासाठी अमोल सहकार्य करणारे बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक, इंग्रजी अभ्यासक्रम समितीचे अध्यक्ष संजय पवार, सदस्य शिवाजी कराळे यांच्यासह सर्व सदस्य यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
