नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार अमरनाथ राजूरकर सलग तिसऱ्यांदा विजयी होत हॅट्रिक साधल्याबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक आणि हितचिंतक यांच्याकडून शुभेच्छांच्या जाहिराती प्रसिद्ध होणे ही राजकारणातील नेहमीची बाब आहे. मात्र यावेळी एका अभिनंदन जाहिरातीने वेगळ्याच चर्चेला तोंड फोडले आहे. स्वीय सहाय्यक अनिल पाटील शेळके यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत राजूरकर यांच्यासोबत त्यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त असलेल्या पोलीस गायकवाड यांचा फोटोही झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एखाद्या व्यक्तीबद्दल आदर, जिव्हाळा किंवा आत्मीयता असणे यात काही गैर नाही. अखेर पंधरा वर्षे एखाद्या व्यक्तीसोबत काम केल्यानंतर भावनिक नाते निर्माण होणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे गायकवाड यांनी राजूरकर यांचे अभिनंदन केले असते, तर त्यात कुणालाही आक्षेप नसता. परंतु प्रश्न अभिनंदनाचा नसून, एका कार्यरत पोलीस कर्मचाऱ्याचा फोटो राजकीय स्वरूपाच्या जाहिरातीत झळकण्याचा आहे. पोलीस दल हे तटस्थतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे अशा जाहिरातीत पोलीस कर्मचाऱ्याची उपस्थिती ही केवळ योगायोग आहे की नव्या परंपरेची सुरुवात, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. राजकारणात गेल्या काही वर्षांत अनेक नवे पायंडे पडले. कार्यकर्त्यांपासून समर्थकांपर्यंत अनेकांनी साहेबांप्रती निष्ठा व्यक्त करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले. मात्र आता सुरक्षारक्षकही जाहिरातीतून शुभेच्छुकांच्या रांगेत दिसू लागले, तर हा निष्ठेचा नवा अध्याय म्हणावा लागेल. लोकांमध्ये चर्चा अशी आहे की, उद्या चालक, शिपाई, अंगरक्षक आणि इतर शासकीय कर्मचारीही आपल्या आवडत्या लोकप्रतिनिधींच्या अभिनंदन जाहिरातीत झळकू लागले, तर तटस्थतेच्या सीमारेषा नेमक्या कुठे राहतील? त्यामुळे हा विषय केवळ एका जाहिरातीपुरता मर्यादित नसून शासकीय सेवकांच्या आचारसंहितेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरतो. अभिनंदन करणे चुकीचे नाही; पण अभिनंदनाच्या उत्साहात शासकीय पदाची मर्यादा ओलांडली जात नाही ना, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो. आणि म्हणूनच नांदेडमध्ये सध्या चर्चा आहे साहेबांच्या सावलीत राहणे वेगळे आणि जाहिरातीत झळकणे वेगळे! नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शाहजी उमाप असतांना सुद्धा गायकवाड यांनी दाखवलेली हिम्मत मात्र वाखाणण्या सारखी नक्कीच आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,336 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन : आकाशाएवढी दृष्टी, शिखराएवढी झेप! दारूसाठी पैशांची मागणी फेटाळल्याने मारहाण; १६ हजारांचा ऐवज हिसकावला