अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई;६ रेती माफियांविरुद्ध गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत एक हायवा, एक जेसीबी, ७ इंजिने, २६ तराफे आणि ५२ ब्रास रेती असा एकूण १ कोटी १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, 20 जून रोजी सायंकाळी 4.10 वाजण्याच्या सुमारास कल्लाळ टी-पॉईंट ते कल्लाळ-पिंपळगाव निमजी शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक अमोलकांत चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकला. या कारवाईत रेती वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा हायवा, जेसीबी, ७ इंजिने, २६ तराफे तसेच ५२ ब्रास रेती जप्त करण्यात आली. जप्त मालाची एकूण किंमत १,०१,८५,००० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी हनुमान चांदू वाघमारे, साईनाथ टक्के, दत्ता लवांडे, बाबाराव शिरसागर, मुरली हिवंत आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या देखरेखीखाली पार पडली. कारवाईत नांदेड ग्रामीण पोलिसांसह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. अवैध रेती उत्खननाविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. Kanthak Suryatal Post Views: 895 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation करो योग रहो निरोगनियमीत योगा ही आरोग्यासाठी संजीवनी आहे – शहाजी उमाप नांदेडमध्ये घरफोडी; १.३० लाखांचा ऐवज लंपास