नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील विविध प्रभागांमधील अरुंद गल्ल्यांमध्ये घरगुती कचरा संकलनाची गंभीर समस्या निर्माण झाली असून, या भागांसाठी स्वतंत्रपणे लहान हातरिक्षा, पॅडल रिक्षा किंवा पॅडल ट्रायसायकलद्वारे कचरा संकलन सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रा. कैलाश भानुदास यादव यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील अनेक दाट वस्तीच्या आणि अरुंद गल्ल्यांमध्ये मोठी कचरा वाहने पोहोचू शकत नसल्याने नियमित कचरा उचलला जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत असून नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. प्रभाग क्रमांक १६ मध्ये पूर्वी लहान हातरिक्षांच्या माध्यमातून दररोज कचरा संकलन केले जात होते. त्यामुळे परिसर स्वच्छ राहत होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून ही सेवा बंद झाल्याने परिस्थिती बिघडली असून अनेक गल्ल्यांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे डास, माश्या आणि उंदरांचे प्रमाण वाढले असून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, टायफॉईड, अतिसार व कॉलरा यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. तसेच काही भागांमध्ये घरांवर QR कोड स्कॅन करून प्रत्यक्ष कचरा न उचलता केवळ नोंदी दाखवल्या जात असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या असून त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे डॉ. यादव यांनी म्हटले आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार घराघरांतून कचरा संकलन करणे बंधनकारक असल्याचे नमूद करत, लहान गल्ल्यांसाठी स्वतंत्र कचरा संकलन यंत्रणा उभारणे, साचलेला कचरा तातडीने हटविणे, विशेष स्वच्छता मोहीम राबविणे आणि जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. महानगरपालिकेने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 782 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शहाजी उमाप यांचा भ्रष्टाचारावर सर्जिकल स्ट्राईक: वर्दीला कलंक लावणाऱ्यांची आता खैर नाही!एलसीबी परभणीच्या पोलीस निरीक्षकांना नांदेड जिल्ह्याची जबाबदारी श्री गुरु हरगोविंद साहिब महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन