नांदेड – आज मुलांना उत्तम पुस्तकांच्या वाचनाची आवड लावणे आणि त्यांच्यात उत्तम संस्कारांच्या विचारांची पेरणी करणे गरजेचे आहे. आणि ही दोन्ही कामे बालसाहित्यिक दत्ता डांगे यांनी लिहिलेले ‘शहाणी झाली प्रजा निवडू लागली राजा’ हे पुस्तक करते असे उद्गार प्रसिद्ध साहित्यिक आनंद पुपलवाड यांनी काढले.
इसाप प्रकाशनाने प्रकाशनासाठी सिद्ध केलेल्या वरील पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नांदेड येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद पुपलवाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध बालसाहित्यिक पंडित पाटील हे होते तर आनंदी स्वप्निल अंजनीकर या बालिकेच्या शुभहस्ते प्रकाशन आयोजित केले होते. प्रारंभी सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आनंदी अंजनीकरच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मनोगत लेखक दत्ता डांगे यांनी व्यक्त केले. आपल्या लिखाणाचा मौलिक ऐवज असलेला संदूक आपण आता अनेक वर्षांनंतर उघडला असून यापुढे आपली काही पुस्तके पुस्तकप्रेमींसाठी सादर करणार असल्याचे सांगितले. यानंतर आनंदी हिने अशी लहान लहान गोष्टींची व सुंदर चित्रे असलेली पुस्तके आम्हाला खूप आवडतात. लेखकाने अशी खूप पुस्तके लिहावीत अशी भावना व्यक्त केली. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पंडित पाटील यांनी म्हटले की, सुंदर आणि संपन्न अशी आणि सप्तरंगी वेधकपुस्तके असली की, बालकवर्ग त्याकडे आपोआप आकर्षिला जातो. आणि तोच नेमकेपणा दत्ता डांगे यांच्या कथालेखनात आणि प्रकाशनाच्या निर्मितीत आहे असे उद्गार त्यांनी काढले. अध्यक्षीय विचार मांडताना पुपलवाड पुढे म्हणाले की, दैववादाकडून वास्तवाकडे, अज्ञानाकडून सज्ञानाकडे, आणि अंधकारातून प्रकाशाकडे बालकात विचार पेरणारे हे पुस्तक बालकांसाठी महत्त्वाचे कार्य करील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कादंबरीकार अशोक कुबडे यांनी केले. कार्यक्रमास प्रा. जगदीश कदम, देवीदास फुलारी, प्रा. भगवान अंजनीकर, गिरीश कहाळेकर, विजयकुमार चित्तरवाड, सौ. संजीवनी डांगे, सौ. निर्मला मंदाडे, शंकर मंदाडे, बाबू मंदाडे आदी उपस्थित होते.
सुसंस्कारांच्या विचारांची पेरणी करणारे पुस्तक म्हणजे शहाणी झाली प्रजा…
साहित्यिक आनंद पुपलवाड यांचे उद्गार
