नांदेड -(डॉ. अभयकुमार दांडगे)- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे फोन करून शंभर कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी नागपूर सत्र न्यायालयाने जयेश पुजारी व अन्य दोन आरोपींना दोषी ठरवत पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. हे प्रकरण गेल्या ५७ दिवसांपासून न्यायालयात तपासले गेले. ६४ साक्षीदारांची तपासणी करून या प्रकरणातील आरोपींना शिक्षा सुनावणारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार शर्मा हे मूळचे नांदेडचे आहेत. उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अशा प्रकरणांचा निकाल लवकर लावावा लागतो. मूळचे नांदेडचे असलेले अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार शर्मा यांनी या प्रकरणात अतिशय बारकाईने व सर्वोच्च न्यायालयाच्या अन्य निकालानुसार आरोपींना शिक्षा सुनावली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे फोन करून शंभर कोटी रुपयांची खंडणी मागणारा जयेश उर्फ जयश्रीकांत उर्फ शाहीर उर्फ शकीर पुजारी आणि अफसर पाशा उर्फ बशिरुद्दीन उर्फ खूषिरुद्दीन मोहम्मद अशी दोषी ठरलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील तिसरा आरोपी मोहम्मद शकीर हा अद्याप फरार आहे. त्याच्या विरोधात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 299 अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. धंतोली पोलिसांनी 2023 मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तपासात आरोपींनी कर्नाटकमधील हिंडलगा केंद्रीय कारागृहातून विविध मोबाईलद्वारे गडकरी यांच्या कार्यालयात लँडलाईनवर धमकीचे फोन केले. आरोपींनी शंभर कोटी रुपयांची खंडणी मागत रक्कम न दिल्यास बॉम्बस्फोट घडवून आणण्याची आणि जीवे मारण्याची धमकीही दिली होती. मुख्य आरोपी जयेश पुजारी याने त्याच्या प्रेयसीच्या मदतीने गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा मोबाईल क्रमांक मिळवल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. याबरोबरच तांत्रिक पुरावे, कॉल डिटेल रेकॉर्ड, इलेक्ट्रॉनिक पुरावे, बँक व्यवहार आणि साक्षीदारांच्या जवाबआधारे सरकार पक्षाने आरोप सिद्ध केल्याने न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार शर्मा हे मूळचे नांदेड येथील रहिवासी आहेत. सन २००० मध्ये त्यांनी विधी शाखेची पदवी नांदेड मधून मिळविली. त्यानंतर न्यायाधीश पदाच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. आजपर्यंत अनेक प्रकरणात त्यांनी आरोपींना शिक्षा सुनावलेली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संबंधित या प्रकरणात देशभरातील अनेक विधीज्ञ तसेच न्यायालयीन क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागून होते. हा निकाल जाहीर झाल्यानंतर अनिलकुमार शर्मा यांच्या नांदेड येथील वर्गमित्रांनी, तसेच ज्येष्ठ विधीज्ञ यांनी त्यांचे अभिनंदन करत कौतुक केले. Kanthak Suryatal Post Views: 943 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation किनवटमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीचा बिगुल; नांदेडसह १६ जागांसाठी १८ जूनला मतदान