नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात १ ते ३१ मे २०२६ दरम्यान सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरोधातील विशेष मोहिमेला वेग आला असून, मोहिमेच्या सहाव्या दिवशी मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवाईत एकूण ४९ गुन्हे दाखल करण्यात आले असून ६३ इसमांविरुद्ध विविध कायद्यांनुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच तब्बल ३२ लाख ४३ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुटखा विक्री व साठा प्रकरणात ४ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत ७ आरोपींकडून १६ लाख १४ हजार २१९ रुपयांचा गुटखा व इतर साहित्य जप्त करण्यात आले. संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले असून, या प्रकरणात दोषी आढळल्यास दहा वर्षांपर्यंत कारावास व दंडाची तरतूद आहे.
तसेच मटका-जुगार प्रकरणात २४ इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत १४ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून ४४ हजार २१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध दारू विक्री प्रकरणात २५ आरोपींविरुद्ध २५ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३२ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याशिवाय शस्त्र अधिनियमांतर्गत दोन कारवाया करून एक अग्निशस्त्र व दोन काडतुसे जप्त करण्यात आली. कोटा कायद्यांतर्गत पाच कारवाया करण्यात आल्या असून इतर विविध अधिनियमांखाली देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही मोहीम नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात येत आहे.
दरम्यान, अवैध व्यवसायांविषयी नागरिकांकडून थेट माहिती मिळावी यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने “खबर” हेल्पलाईन सुरू केली आहे. ९१ ५० १०० १०० या मोबाईल क्रमांकावर नागरिकांनी फोन किंवा व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे अवैध व्यवसायांविरोधातील मोहिमेला मोठी मदत होत असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सांगितले.
