नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात अधिकृत खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना खत विक्री करताना जबरदस्तीने इतर वस्तू घेण्यास भाग पाडले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या संदर्भात नांदेड जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे. संघाच्या निवेदनानुसार, जिल्ह्यात डीएपी व युरिया खतांची मागणी वाढलेली असताना काही अधिकृत घाऊक विक्रेते किरकोळ विक्रेत्यांवर लिंकिंग पद्धत लादत आहेत. म्हणजे खत देताना त्यासोबत इतर कंपन्यांच्या उत्पादनांची सक्ती केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे किरकोळ विक्रेत्यांवर आर्थिक ताण वाढत असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अनेक ठिकाणी खत उपलब्ध असूनही अनावश्यक अटी घालून पुरवठा केला जात आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संघाने प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत डीएपी व युरिया खत वितरणावर विशेष नियंत्रण ठेवावे जिल्हास्तरावर खत वाटप पारदर्शक पद्धतीने करावे लिंकिंग करणाऱ्या घाऊक खत विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी संबंधित कृषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कार्यपद्धतीची चौकशी करावी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, मोठ्या विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्याने किरकोळ विक्रेते दबावाखाली काम करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून शेतकरी व विक्रेते दोघांनाही दिलासा द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन संघटनेचे धनराज मंत्री यांनी दिले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन चौकशी करणार का याकडे जिल्ह्यातील शेतकरी व कृषी व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. Kanthak Suryatal Post Views: 870 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation वर्दीतील हैवानांना अखेर फाशी! मदुराई न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सोनू कल्याणकारच्या मारेकऱ्याच्या पायात यासाठी गोळी मारावी लागली