नांदेड (प्रतिनिधी)- शहरात कायदा-सुव्यवस्थेचा घड्याळाचा काटा जणू गुन्हेगारांच्या टाइमटेबलवर चालतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अवघ्या ७० तासांत पाच खून म्हणजे शहरात गुन्हेगारांनी फास्टट्रॅक सेवा सुरू केली की काय, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. परवा रात्री तीन खून, काल सकाळी चौथ्याची बातमी आणि आज पहाटे पाचव्या खुनाने तर पोलिसांच्या बैठकीलाच जणू पुष्टीपत्र दिले.
या पार्श्वभूमीवर काल दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात नांदेड शहरातील सहा पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकांसह स्थानिक गुन्हा शाखेची तातडीची बैठक बोलावण्यात आली. बैठकीचा सूर मात्र गुन्हेगारांपेक्षा आपलेच लोक जास्त धोकादायक असा असल्याची खात्रीलायक चर्चा पोलीस वर्तुळात रंगली. एलसीबीमुळेच गुन्हेगारांची हिंमत वाढली असल्याचा टोला देत, इच्छुकांनी स्वतः अर्ज करून तालुका पोलीस स्टेशन किंवा शांत जिल्हा हिंगोलीकडे बदली करून घ्यावी, असा सल्ला दिल्याचे सांगितले जाते.
शहरातील पोलिसिंग हे सेवा नसून जणू आपल्या रोजी रोटी सोबत बेईमानी चालू असल्यासारखे वाटते, त्यामुळे आता कडक उपाययोजना करावी लागतील, असा दम अधीक्षकांनी भरल्याचे कर्मचाऱ्यांचे सूत्रांचे म्हणणे आहे. काही शाखांतील कर्मचारी दिवसभर काय करतात यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. रात्री आठ नंतर फोन उचलणे हा जणू ऐच्छिक विषय असल्याने नॉट रिचेबल पोलिसिंग हा नवा प्रयोग सुरू आहे का, अशी उपरोधिक चर्चा ऐकू आली.
दरम्यान, नोव्हेंबर २०२४ पासून स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलीस निरीक्षकांचा कार्यकाळ संपूनही छोटा रिचार्ज प्लॅन वापरून सेवा वाढवल्याच्या कुजबुजीलाही उधाण आले आहे. आता पुन्हा रिचार्जसाठी नाथनगरीत संपर्क साधावा लागेल, अशीही हसत-हसत चर्चा दलात सुरू आहे.
बैठक संपली, नाराजी व्यक्त झाली, धडेही दिले गेले… आणि आज सकाळी पुन्हा एक खून. म्हणजे बैठकीतील चर्चा ही समस्या सोडवण्यापेक्षा गुन्हेगारांना तुमचा वेग कायम ठेवा असा अप्रत्यक्ष संदेश ठरली की काय, असा टोमणा आता नागरिक मारताना दिसत आहेत.
