रविवारी होणार एकदिवसीय शिक्षण परिषद; प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन नांदेड – शिक्षणाचे वाढते खाजगीकरण आणि बाजारीकरण यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे बदल होत असून शिक्षण ही सेवा न राहता नफ्याचे साधन बनत चालले आहे. खाजगी शाळांमधील वाढत्या शुल्कामुळे सर्वसामान्यांना शिक्षण घेणे कठीण झाले असून यामुळे शैक्षणिक विषमता वाढत आहे. गुणवत्तेपेक्षा आर्थिक क्षमता महत्त्वाची ठरत असल्याने शिक्षण क्षेत्रात कॉर्पोरेट वर्चस्व वाढत असल्याची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. उच्च शिक्षणासमोरील प्रमुख आव्हानांमध्ये दर्जेदार शिक्षणाची कमतरता, वाढता खर्च, बाजाराधिष्ठित शिक्षण पद्धती, कालबाह्य अभ्यासक्रम, अंधश्रद्धांना चालना, संशोधनाचा अभाव, अपुऱ्या पायाभूत सुविधा तसेच ऑनलाईन शिक्षणातील डिजिटल दरी या बाबींचा समावेश होतो. या सर्व परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर चौथ्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन नांदेड येथे करण्यात आले आहे. भारतीय पिछडा शोषित संघटन, लसाकम, सप्तरंगी साहित्य मंडळ आणि बीसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील शिवाजीनगरस्थित हाॅटेल विसावा पॅलेसच्या कॉन्फरन्स हॉल, येथे रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६, रोजी सकाळी १०:०० वाजता चौथ्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे उद्घाटन होईल. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. गोविंद रामदिनेवार हे राहणार असून उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक नेते डी. एम. हनुमंते यांची उपस्थिती लाभणार आहे. ही परिषद तीन सत्रांमध्ये पार पडणार आहे. पहिल्या सत्रात “शिक्षणाचे बाजारीकरण आणि बहुजन समाजावर होणारे दुष्परिणाम” या विषयावर मा. फारूक अहमद मार्गदर्शन करतील. या सत्राचे अध्यक्ष मा. एस. जी. माचनवार असून प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अमोल काळे उपस्थित राहतील. दुसऱ्या सत्रात “उच्च शिक्षणासमोरील आव्हाने” या विषयावर प्रा. डॉ. दिलीप चव्हाण आपले विचार मांडतील. या सत्राचे अध्यक्ष मा. डॉ. हेमंत कार्ले असून प्रमुख उपस्थिती कॉ. उज्वला पडलवार व ऍड. एस. एम. गोरे यांची राहणार आहे. तिसरे सत्र प्रश्नोत्तर, चर्चा व संवाद यासाठी राखीव असून या सत्राचे अध्यक्ष बालाजी थोटवे हे असतील. प्रमुख उपस्थिती माजी गटशिक्षणाधिकारी डी. डी. सुपे यांची राहणार आहे. या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रज्ञाधर ढवळे, संजय मोरे, बाबाराव विश्वकर्मा, रणजीत गोणारकर, मारुती लुटे, मारोती कदम, माधव कांबळे, प्रा. डॉ. संजय कसाब, प्रा. डॉ. दिलीप कोठोडे, नागोराव डोंगरे आदी परिश्रम घेत आहेत. नांदेडमधील जास्तीत जास्त नागरिक, शिक्षणप्रेमी व विद्यार्थ्यांनी या परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 653 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation परकीय योगदान सुधारणा विधेयक म्हणजे अल्प संख्याक समाजाच्या संपत्तीवर दरोडा ! भारतीय अर्थव्यवस्थेचा सुपरहिट शो;१.१४ लाख कोटी गायब