नाना पटोले यांचा मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर घणाघात; शेतकरी प्रश्नांवर काँग्रेस राज्यभर जनआंदोलन उभारणार नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला दोन वर्षे पूर्ण होत असताना लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. ‘नांदेड हा लोकशाहीच्या हत्येचा जिवंत पुरावा आहे. लोकसभेत काँग्रेसचा खासदार निवडून येतो आणि त्याच मतदारसंघात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार ४० ते ५० हजार मतांनी पराभूत होतात, हे कसे शक्य आहे?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी नांदेडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेबाबत अनेक गंभीर आरोप केले. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या चार महिन्यांत महाराष्ट्रात ४६ लाख मतदारांची वाढ कशी झाली, असा प्रश्न उपस्थित करत मतदारसंख्येतील बदलाबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी झाल्या होत्या. या निवडणुकीसंदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आपल्याशी केलेल्या कथित वक्तव्याचाही पटोले यांनी उल्लेख केला. लोकसभेत आणि विधानसभेत मतदानाच्या निकालात एवढी मोठी तफावत कशी निर्माण झाली, याचे उत्तर आयोगाने द्यायला हवे, असे ते म्हणाले. तसेच मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजल्यानंतर झालेल्या मतदानाचा हिशेब, मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित माहिती राजकीय पक्षांना का दिली जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आगामी निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, ही राहुल गांधी यांची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी? राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत पटोले यांनी शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. शेतकऱ्यांना जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत अद्याप बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. दिवाळी उलटूनही मदत मिळत नसेल, तर सरकारच्या आर्थिक आणि प्रशासकीय कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होतात, अशी टीका त्यांनी केली. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा आणि सिंचनासाठी पाणी मिळण्याची शाश्वती सरकारने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. इसापूर धरणात ६७ टक्के पाणीसाठा असल्याचा उल्लेख करत उपलब्ध पाण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांना पाणी कसे देणार, याचा आराखडा सरकारने जाहीर करावा, असेही ते म्हणाले. मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळी परिस्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून शेतकऱ्यांना पुन्हा आत्महत्येच्या उंबरठ्यावर ढकलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मायक्रो फायनान्स कंपन्यांची वसुली थांबवा खासगी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सर्वसामान्य नागरिकांची कर्जवसुली पठाणी पद्धतीने केली जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला. कर्जाचे प्रलोभन दाखवून गरीब कुटुंबांना आर्थिक संकटात ढकलले जात आहे. दुष्काळी परिस्थितीत अशा कंपन्यांची कर्जवसुली तातडीने थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली. सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी सातत्याने कमी केला जात असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. अधिवेशन केवळ अर्थसंकल्पीय तरतुदी आणि पुरवणी मागण्या मंजूर करण्यापुरते मर्यादित ठेवले जात असून जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यास सरकार तयार नसल्याची टीका त्यांनी केली. शेतकरीविरोधी धोरणे, बेरोजगारी, महागाई आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस अधिवेशनात आवाज उठवणार असून अधिवेशनानंतर राज्यभर जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही पटोले यांनी दिला. यावेळी खासदार रवींद्र चव्हाण, माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, यशपाल भिंगे, राजेश पावडे,ऍड सुरेंद्र घोडसकर, अब्दुल सत्तार, पप्पू कोंडेकर, विठ्ठल पावडे, नगरसेवक सत्यपाल सावंत, शेख पाशा आदींची उपस्थिती होती. Kanthak Suryatal Post Views: 16 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भावनिक साद की जागतिक अर्थशास्त्र? सोन्याचे भाव कोसळण्यामागे मास्टरस्ट्रोक की मजबुरी ? ५० कोटी लोक गरिबीतून बाहेर, मग ८० कोटींना मोफत धान्य का? मोदींच्या दाव्यातील मोठा झोल !