नायगाव तहसीलदार आणि दोन पोलीस ठाण्यांची संयुक्त कार्यवाही
नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर पोलीस व महसूल विभागाने संयुक्त कारवाई करत मोठी कारवाई केली असून तब्बल ९० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई इज्जतगाव (ता. नायगाव) परिसरात करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, उस्माननगर व कुंटूर पोलीस स्टेशन तसेच महसूल विभागाच्या पथकाने मौजे इज्जतगाव येथील गोदावरी नदीपात्रात फायबर बोटींच्या सहाय्याने बेकायदेशीररीत्या काळ्या रेतीचे उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर संयुक्त छापा टाकला.
कारवाईदरम्यान नायगावच्या तहसीलदार तृप्ती गायकवाड, कुंटूरचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल डी. भोसले, उस्मानगरचे सहायक पोलीस निरीक्षक संजय निलप्रेवार, मंडळ अधिकारी सचिन तारू, तलाठी गोविंद काळे, तलाठी बाबू डाकेवाड तसेच पोलीस अंमलदार माथच पल्लेवाड, गुलाब शिंदे, निळकंठ निम्मलवाड, अंगद आरे, अनिरुद्ध वाडे व इतर कर्मचारी सहभागी होते.
गुप्त माहितीवर छापा
दि. 28 मार्च 2026 रोजी सकाळी पेट्रोलिंगदरम्यान सहायक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इज्जतगाव येथील माधव बालाजी डोईफोडे यांच्या शेतालगत गोदावरी नदीपात्रात बोटींच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरू आहे. त्यानुसार महसूल विभागाला कळवून संयुक्त पथकाने दुपारी घटनास्थळी धाड टाकली. पथक घटनास्थळी पोहोचताच वाळू उत्खनन करणारे आरोपी बोटी नदीकाठावर सोडून पळून गेले. पंचासमक्ष पाहणी केली असता खालील मुद्देमाल आढळून आला :
- ३ लोखंडी फायबर बोटी
- ३ छोटे इंजिन लोखंडी बोटी
- अंदाजे ४ ब्रास काळी रेती
एकूण अंदाजित किंमत ९०,२०,००० रुपये इतकी आहे.
तहसीलदार नायगाव यांच्या आदेशानुसार पंचनामा करून बोटी जागेवर हलविणे अवघड असल्याने त्या जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या, तर जप्त केलेली काळी रेती ताब्यात घेण्यात आली.
आरोपींची माहिती
तपासात बोटींचे मालक पुढीलप्रमाणे असल्याचे निष्पन्न झाले :
- कैलास गंगाधर दगे, रा. येळी कोडगाव, ता. लोहा, जि. नांदेड
- राजू कोंडीबा पाकलवाड, रा. वाघाळा, ता. उमरी, जि. नांदेड
या प्रकरणी माधव यादवराव पल्लेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे कुंटूर येथे गुन्हा क्रमांक 61/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 35 तसेच खनिज व खनन अधिनियम 1957 चे कलम 4(21) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उप निरीक्षक आर. बी. ठाकूर करीत आहेत.
