माझ्या कवितेला सामाजिक परिवर्तनाचा ध्यास

विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांचे प्रतिपादन; विविध संघटनांच्या वतीने जागतिक कविता दिन साजरा
नांदेड- अनेक महामानवांनी, संत महात्म्यांनी विविध कालखंडात समाजप्रबोधनाचे मोठे कार्य केले आहे. त्यांच्याच विचारांचा वारसा घेऊन मी कविता लिहितो. माझी कविता स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी संविधान मूल्यांच्या दिशेने प्रवास करीत राहते. म्हणूनच माझ्या कवितेला सामाजिक परिवर्तनाचा ध्यास लागलेला आहे, असे प्रतिपादन विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी केले. ते जागतिक कविता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पँथर राहुल प्रधान, बालाजी थोटवे, एच. पी. कांबळे, प्रज्ञाधर ढवळे, सतिश शिंदे, नागोराव डोंगरे, अनुरत्न वाघमारे आदिंची उपस्थिती होती.
        सप्तरंगी साहित्य मंडळ, लसाकम, बिसेफ आणि बीपीएसएस या संघटनांच्या वतीने शहरातील महावीर सोसायटी लगतच्या डॉ. विजयकुमार माहुरे यांच्या निवासस्थानी संवाद सभागृहात कवी नितिन चंदनशिवे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पुष्प व दीपाने पुजन करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुलाखतीस प्रारंभ झाला. ज्येष्ठ विचारवंत बालाजी थोटवे यांनी ही मुलाखत घेतली. अनेक प्रश्नांना चंदनशिवे यांनी दिलखुलास उत्तरे दिली. सामाजिक दांभिकतेवर शाब्दिक हल्ला चढवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. प्रास्ताविक राहुल प्रधान तर आभार डॉ. विजयकुमार माहुरे यांनी मानले.
साहित्यिकांचे कळप चळवळीला मारक
        साहित्य चळवळ ही समाजप्रबोधनाचीही चळवळ आहे. माझ्या अनेक कवितांचे शब्द माझ्या जीवनातील संघर्ष अधोरेखित करतात. विविध संकल्पनांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या गटातटात साहित्यिक विभागलेले असतात. साहित्य संमेलने सुद्धा या पद्धतीने भरतात. त्यामुळे साहित्यिकांचे कळप निर्माण झाले आहेत. हे निकोप साहित्यवृत्तीस घातक आहे. आपण एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी झाले पाहिजे. जे येत नाहीत त्यांना आपल्या मंचावर बोलवले पाहिजे, त्यांच्याकडे आपण गेले पाहिजे. नवी मंचीय अस्पृश्यता नष्ट केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!