नगरसेवकांच्या निष्क्रियतेमुळे नागरिक हैराण!
अर्धापूर (प्रतिनिधी)- अर्धापूर शहरातील खुबा कॉलनी 132 के. व्ही. या परिसरातील वार्डात मतदारांनी निवडणुकीत भरघोस मतं देऊन नगरसेवक निवडून तर दिला, पण त्याने नंतर कामंच केली नाहीत तर दुसरा नगरसेवक निवडून देण्यासाठी पुढील निवडणुकीची वाट बघायची, कुणाकडे जायचं, कुठे तक्रार करायची? असा प्रश्न या वार्डातील मतदारांना पडला आहे
रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, अशा दैनंदिन नागरी प्रश्नांवर नागरिक थेट नगरसेवकाकडे अपेक्षा ठेवतात. वॉर्डमधील नागरिकांच्या समस्या मांडणं, नगरपंचायतच्या मासिक सभांमध्ये निर्णय प्रक्रियेत भाग घेणं, विकासकामांसाठी शिफारसी करणं प्रशासनावर लोकप्रतिनिधी म्हणून दबाव ठेवणं ही नगरसेवकांची मुख्य कामे असून नगरसेवक मात्र या आपल्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सध्या या वार्डात दिसत आहे. या नगरसेवकाने निवडणुकीत मतदारांचे उंबरठे झिजवताना आपल्या सगळ्या समस्या तात्काळ दूर करू, तुमच्या अडीअडचणीला रात्रंदिवस धावून येईन असे आश्वासन दिले होते. मात्र निवडणुकीत मते मागताना मतदारांना दिलेल्या पोकळ आश्वासनांचा या नगरसेवकाला विसर पडला आहे असे वार्डातील मतदार आता दबक्या आवाजात म्हणत आहेत.
या वार्डात या नगरसेवकाला साधी नालीचेही बांधकाम करण्यात अपयश आले आहे तर मतदारांनी नालीसाठी आग्रह धरल्यास हा नगरसेवक जेसीबी आणून तात्पुरता खड्डा खोदून त्यामध्ये सांडपाणी सोडायला सांगत आहे, हाच का विकास या वार्डातील नगरसेवक म्हणून आपण करत आहात का? असा प्रश्न या वार्डातील मतदार विचारू लागले आहेत.

प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
विशेष म्हणजे, या कामांसाठी नगरपंचायत कडून निधी मंजूर का होत नाही कामे का रखडली जात आहेत? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. वॉर्डातील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी चोरीच्या घटनांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. नगरसेवकांनी केवळ स्वतःच्या सोयीच्या कामांकडे लक्ष न देता, संपूर्ण वॉर्डातील मूलभूत सुविधांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. काम नाही तर मत नाही असा पवित्रा आता येथील मतदारांनी घेतला असून, आगामी निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.तर अशा अनेक समस्या असताना सुद्धा या नगरसेवकाचा तर जास्त विकास होत नाही ना? असा प्रश्न या वार्डातील मतदारांना पडला आहे.

निवडणुकीच्या वेळी आम्ही वॉर्डाचा कायापालट करू अशी मोठी आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी आता मतदारांना शोधूनही सापडत नसल्याचे चित्र अर्धापूर शहरातील खुबा कॉलनी 132 केव्ही परिसरामध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या भागातील रस्ते, कचरा आणि पथदिव्यांचे प्रश्न प्रलंबित असून, नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ठिकठिकाणी साचलेल्या सांडपाण्यामुळे पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. त्यातच कचरा उठाव वेळेवर होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आम्ही अनेकदा नगरसेवकांच्या मागे चकरा मारल्या, पण प्रत्येक वेळी लवकरच काम होईल असे आश्वासन देऊन आमची बोळवण केली जाते,अशी संतप्त प्रतिक्रिया शेख करीम, यांनी दिली आहे.
