नांदेड – मराठवाड्यात महिलांच्या आरोग्य, शिक्षण व सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या नांदेडच्या शुभंकरोती फाऊंडेशनला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई येथे आयोजित विशेष कार्यक्रमात शनिवारी (ता. ७) हा सन्मान प्रदान करण्यात आला. मुंबई येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते शुभंकरोती फाऊंडेशनचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार मनीषा कायंदे, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी व सामाजिक क्षेत्रात सातत्याने केलेल्या कामाची दखल घेत हा राज्यस्तरीय पुरस्कार संस्थेला प्रदान करण्यात आला. मराठवाडा विभागात मागील १४ वर्षांपासून शुभंकरोती फाऊंडेशन विविध सामाजिक प्रश्नांवर प्रत्यक्ष गावपातळीवर काम करत आहे. विशेषतः महिलांच्या मासिक पाळीतील आरोग्याबाबत जनजागृती, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, लैंगिकता शिक्षण, विवाहपूर्व समुपदेशन, युवक प्रशिक्षण कार्यक्रम, लैंगिक व पुनरुत्पादन आरोग्य आणि अधिकार यांसारख्या विषयांवर संस्थेने अनेक उपक्रम राबविले आहेत. ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून नियमित शिबिरे व प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात. याशिवाय कौटुंबिक हिंसाचारावरील समुपदेशन, महिलांसाठी रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण, युवकांसाठी कौशल्यविकास कार्यक्रम, तसेच आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी कार्डियाक अॅम्ब्युलन्स सेवा यांसारख्या विविध उपक्रमांद्वारेही संस्था सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. ग्रामीण व वंचित घटकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून सातत्याने केला जात आहे. शुभंकरोती फाऊंडेशनच्या प्रशिक्षण केंद्र व विविध सामाजिक उपक्रमांद्वारे नांदेड, परभणी आणि जालना जिल्ह्यातील आतापर्यंत सुमारे सात लाख ३८ हजार ८२९ महिला, मुली आणि युवकांना लाभ मिळाला आहे. संस्थेच्या प्रशिक्षणातून अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसह मुलांच्या शिक्षण व आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यास मदत होत असल्याचे सांगितले जाते. महिलांच्या क्षेत्रात उल्लेखनीय व समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्कार दिला जातो. यंदा मराठवाडा विभागात महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याची दखल घेत शुभंकरोती फाऊंडेशनची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्यानुसार मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल नांदेडसह मराठवाड्यातील सामाजिक क्षेत्रातून समाधान व्यक्त करण्यात येत असून, संस्थेच्या कार्याला पुढील काळात अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Kanthak Suryatal Post Views: 653 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ७ लाख ६९ हजार कोटींचा अर्थसंकल्प; ११ लाख २ हजार ६५४ कोटीचे कर्ज; प्रत्येक मिनिटाला १५ लाख रुपये व्याजाचे द्यावे लागतात अमेरिकेचा इराणविरुद्धचा युद्धडाव अपयशी ठरणार? एनआयसीचा धक्कादायक अहवाल