नांदेड (प्रतिनिधी)-पोलीस महा निरीक्षक शहाजी उमाप यांनी अवैध वाळू उपस्यावर,वाळू वाहतुकीवर कार्यवाही करण्यासाठी आपल्या विशेष पथकाची नेमणूक केली. त्या विशेष पथकाने जोरदार कामगिरी केल्यानंतर नांदेड जिल्हा पोलिसांनी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी अवैध्य वाळू उत्खनन वाळू वाहतूककरणाऱ्यावर कार्यवाही करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आम्ही सुद्धा काही कमी नाहीत असे दाखवण्याचा केलेला प्रयत्न आहे. एकंदरीत चार ठिकाणी केलेल्या कार्यवाहीचे सविस्तर विवरण पुढील प्रमाणे आहे. पहिली कार्यवाही – गोदावरी नदी पात्रात अवैधरीत्या रेती उपसा करून साठवणूक करणाऱ्या रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत 3 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदेड जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजता जुने गंगामटवाडी परिसरातील गोदावरी नदी पात्रात काही जण अवैधरीत्या रेती उपसा करून साठवणूक करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन कारवाई केली. या कारवाईत शंकर रत्ना माळवे (वय 35) याच्यासह लक्ष्मण बानवडे, गोपीनाथ शिवाजी बानवडे, विनोद बानवडे व बबिता शिवाजी बानवडे (रा. बोरगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळावरून पाच ठिकाणी साठवलेली सुमारे 10 ब्रास रेती (किंमत 50 हजार रुपये) तसेच रेती उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या पाच लोखंडी तराफ्यांची किंमत 2 लाख 65 हजार रुपये असा एकूण 3 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 206/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम 303(2)(3)(5) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 48(7), 48(8) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दुसरी कार्यवाही – अर्धापूर पोलिसांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर धडक कारवाई करत ट्रॅक्टरसह एकूण 12 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 6 मार्च 2026 रोजी रात्री 10.45 वाजताच्या सुमारास अर्धापूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, मेंढला जाणाऱ्या रोडवर महाराष्ट्र हॉटेलसमोर अवैधरीत्या रेती वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत प्रमोद बाळाजी आवारे (वय 31, रा. कासारखेडा, ता. जि. नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून MH-26-AD-2228 क्रमांकाचा ट्रॅक्टर (किंमत 12,00,000 रुपये) आणि 2 ब्रास रेती (किंमत 10,000 रुपये) असा एकूण 12,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 34/2026 नोंद करण्यात आला असून भा.दं.वि. कलम 379, 34 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 48(7), 48(8) आणि मोटार वाहन कायदा कलम 615 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तिसरी कार्यवाही – भोकर पोलिसांनी अवैधरीत्या गौण खनिज (रेती) वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई करत 7 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 9.50 वाजता भोकर शहरातील हुंडेकर कॉलनी ते बोरगाव जाणाऱ्या रस्त्यावर एक टिप्पर संशयास्पदरीत्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून MH-04 EY-0263 क्रमांकाचा टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान टिप्परमध्ये 3 ब्रास रेती (किंमत 15 हजार रुपये) आढळून आली. तसेच टिप्पर (किंमत 7 लाख रुपये) असा एकूण 7 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तनाजी सुभाष पाचाळ (वय 38, रा. सावरगाव ता. भोकर, जि. नांदेड) याच्याविरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 92/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. चौथी कार्यवाही – लोहमध्ये अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत सुमारे 10 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 7 मार्च 2026 रोजी पहाटे करण्यात आली. नांदेड जिल्हा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोहमध्ये अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईदरम्यान एमएच 20 ईजी 6444 क्रमांकाचा ट्रक पकडण्यात आला. ट्रकमध्ये अवैधरित्या रेती वाहतूक होत असल्याचे आढळून आले. या प्रकरणात 23 वर्षीय चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडून ट्रक (किंमत सुमारे 10 लाख रुपये) व 5 ब्रास रेती (किंमत 25 हजार रुपये) असा एकूण 10 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चार कार्यवाही करणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील,सूरज गुरव यांच्या सह त्या त्या विभागाचे पोलीस उप अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांनी कौतुक केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,014 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तुप्पा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद ७ लाख ६९ हजार कोटींचा अर्थसंकल्प; ११ लाख २ हजार ६५४ कोटीचे कर्ज; प्रत्येक मिनिटाला १५ लाख रुपये व्याजाचे द्यावे लागतात