नांदेड – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2024-25 पासून महाराष्ट्र स्तरावर ऑनलाईन पद्धतीने राबवली जात असून अनुसूचित जातीतील जे विद्यार्थी 50 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत व ज्या विद्यार्थ्यांना समाज कल्याणच्या शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांकरिता स्वाधार योजना राबवली जात आहे. सदरील योजना ही जिल्हास्तर तसेच तालुकास्तरावर राबविण्यात येते.
नुकतेच 23 फेब्रुवारी 2026 रोजी सामाजिक न्याय भवन नांदेड या ठिकाणी एक दिवसीय महाविद्यालयांची मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेअंतर्गत कार्यक्रमाचे अध्यक्षपदी संतोष चव्हाण, सहय्यक लेखाअधिकारी समाज कल्याण कार्यालय नांदेड व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती लक्ष्मी गायके, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक तसेच कार्यालयीन अधीक्षक, स.क.नांदेड. व स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील जालिंदर गायकवाड तसेच तालुकास्तरीय वरील प्रमुख पाहुणे म्हणून राजश्री शाहू जुनियर कॉलेज लोहा प्राचार्य श्री.फाजगे, नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्य व कर्मचारी समतादूत हे कार्यक्रमास उपस्थित होते.
समाज कल्याण कार्यालय अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेमध्ये पीपीटी मार्फत शासन निर्णयातील नियम व अटी नुसार सविस्तर मार्गदर्शन उपस्थित सर्व महाविद्यालयाच्या प्रतिनिधींना देण्यात आले त्यामध्ये उपस्थितांचे प्रश्नांचे निरसन करून सदरील योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता शिवानंद मिनगिरे सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून नांदेड जिल्ह्यातील सर्व स्वाधार योजनेस पात्र विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्र महाविद्यालयांमार्फत विहित वेळेमध्ये व योग्यरीत्या पूर्तता करण्याकरिता सहकार्य करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. या कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन पांपटवार तालुका समन्वयक यांनी केले तर श्रीमती राणी गडगीळे समाजकल्याण निरीक्षक, स्वाधार विभाग प्रमुख यांनी सदर कार्यशाळा व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली व आनंद झंपलवाड कनिष्ठ लिपिक, स्वाधार विभाग, श्री बालाजी खूपसे तालुका समन्वयक यांनी अथक परिश्रम घेऊन सदर कार्यशाळेचे नियोजन केले तेव्हा नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय महाविद्यालयांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या व विद्यार्थ्यांच्या अडचणींचे निरसन होण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर मार्गदर्शनपर कार्यशाळा घेणेबाबत अवगत करण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील सर्व स्वाधार योजनेला पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेडच्या वतीने आवाहन करण्यात येते की, ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र झालेले आहेत त्यांनी बँक खाते तपशील ऑनलाइन भरून घ्यावे तसेच ज्या विद्यार्थ्यांना अर्ज सेंड बॅक आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपली त्रुटीची पूर्तता योग्यरित्या विहित वेळेत पूर्ण करावी आणि येणाऱ्या अडचणी बाबत आपल्या प्रवेशित महाविद्यालयातील समानसंधी केंद्र व संबंधित योजनेचे कामकाज पाहणारे कर्मचारी यांना संपर्क साधावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे समाज कल्याण नांदेड यांच्यामार्फत केले आहे.
