अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार : महासंचालक सुनील वारे
नांदेड – २८ फेब्रुवारी २०२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने आज नांदेडमध्ये अनुसूचित जातीच्या युवक-युवतींसाठी ‘बार्टी करिअर अँड एम्प्लॉयमेंट फेअर’ चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, राज्यातील विविध जिल्ह्यांसह शेजारील तेलंगणा (पूर्वीचा आंध्र प्रदेश भाग) राज्यातूनही विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उच्च शिक्षणासोबतच जागतिक संधींचे ध्येय यावेळी मार्गदर्शन करताना बार्टीचे महासंचालक सुनील वारे म्हणाले की, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून परदेशात उच्च शिक्षण घेतले. त्यांचा हा आदर्श आजच्या विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवायला हवा. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना या मेळाव्याच्या माध्यमातून आखाती देशांमध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बार्टी सर्वतोपरी प्रयत्न करेल.”
पायलट प्रोजेक्टला उत्स्फूर्त प्रतिसाद नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सुनील वारे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड म्हणाले की, मराठवाड्यातील तरुणांना आखाती राष्ट्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बार्टीने नांदेडमध्ये हा ‘पायलट प्रोजेक्ट’ राबवला आहे. या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहता, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. प्रशासकीय व तांत्रिक सहकार्य निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांना विदेशात जाण्यासाठी लागणारी प्रशासकीय कागदपत्रे व इतर मदत जिल्हा प्रशासनाकडून प्राधान्याने दिली जाईल, असे त्यांनी आश्वासित केले. तसेच, प्रेरणा कन्सलटन्सीचे अध्यक्ष प्रकाश बोडके यांनी परदेशातील नोकरीची प्रक्रिया आणि संधी याबाबत सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवर या मेळाव्याला जनरल मॅनेजर फैयाद गोली, रवींद्र दरेकर, लॉ कॉलेजचे प्राचार्य एम. बी. अली, बार्टीचे प्रकल्प व्यवस्थापक महेश गवई, प्रकल्प अधिकारी मनोज खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते. मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रकल्प अधिकारी मनोज खंदारे, मुंजाजी कांबळे, रामदास लोखंडे, अविनाश नाईक, मीना आरसे, यांच्यासह बार्टीच्या समतादूतांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांनी केले, तर आभार बार्टीचे प्रकल्प व्यवस्थापक महेश गवई यांनी मानले.

