नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात सध्या पोलीस प्रशासनात एक वेगळाच प्रेरणादायी अध्याय लिहिला जात आहे. नियंत्रण कक्षात सात-आठ पोलीस निरीक्षक आपली पाळी येण्याची संयमाने वाट पाहत असताना वाहतूक शाखेचा महत्त्वपूर्ण प्रभार मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान नागरगोजे यांच्या हाती सोपवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, एका वर्षा पूर्वी २३ जानेवारी २०२५ रोजी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना सहायक पोलीस निरीक्षक भागवत तुकाराम नागरगोजे यांनी वाळू वाहतूकदाराकडून १७ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर कारवाई केली होती. या प्रकरणात बिलोली येथील सत्र न्यायाधीश दिनेश कोठारी यांनी २४ जानेवारी २०२५ रोजी त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
मात्र, एवढ्या अनुभवसंपन्न पार्श्वभूमीनंतरही त्यांच्यावर दाखवलेला विश्वास खरोखरच अभ्यासाचा विषय ठरू शकतो. कदाचित प्रशासनाला त्यांच्या या ‘अनुभवा’चा उपयोग वाहतूक व्यवस्थापनात होईल, असा सकारात्मक दृष्टिकोन असावा!
दरम्यान, नांदेड शहर वाहतूक शाखेत पोलीस निरीक्षक साहेबराव गुट्टे कार्यरत होते. त्यांच्या सेवावृत्तीला अवघे तीन महिने शिल्लक असल्याने त्यांनी नियमानुसार तीन महिन्यांची रजा घेतली आहे. त्यामुळे त्या जागी नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती अपरिहार्य होती. नियंत्रण कक्षात उपलब्ध असलेल्या निरीक्षकांपैकी कुणालाही संधी न देता थेट सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्याकडे सूत्रे सोपविण्यात आली.
आज सकाळी नागरगोजे यांनी गुट्टे यांच्याकडून वजीराबाद वाहतूक शाखेचा प्रभार स्वीकारला. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ आणि पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. कालपर्यंत कोठडीचा अनुभव आणि आज पुष्पहारांचा सन्मान हीच कदाचित प्रशासनाची ‘विश्वासार्ह’ परंपरा असावी, अशी शहरात चर्चा रंगू लागली आहे.
