पूर्णा (प्रतिनिधी)- 24 फेब्रुवारी रोजी दुपारी पूर्णा रेल्वे स्थानक येथील फलाट क्रमांक 2 वर एक हृदयद्रावक पण प्रेरणादायी घटना घडली. नांदेडहून सुटणारी गाडी क्रमांक 17614 पनवेल एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेनुसार पुढील प्रवासासाठी निघत असताना एक 75 वर्षीय प्रवासी चुकीच्या पद्धतीने गाडीत चढण्याचा प्रयत्न करत होता.
गाडी सुरू असतानाच त्या प्रवाशाचा एक पाय पायरीवर अडकला आणि ते चालत्या गाडीखाली ओढले जात होते. हा थरारक प्रसंग पाहून फलाटावरील सर्व प्रवाशांचे हृदय क्षणभर थांबले. काही प्रवासी रेल्वे थांबवा, रेल्वे थांबवा अशी आर्त हाक देत होते.
याच वेळी रेल्वे संरक्षण दलातील (RPF) महिला पोलीस शिपाई रमा शर्मा (खंडेलवाल) यांनी अत्यंत प्रसंगावधान, धाडस आणि चपळाई दाखवत तत्काळ धाव घेतली. त्यांनी क्षणार्धात त्या प्रवाशाचा हात पकडून त्यांना बाहेर ओढले. या धाडसी प्रयत्नात प्रवासी रमेश पटणे यांनीही तत्परतेने मदत केली. दरम्यान, गाडीतील एका सजग प्रवाशाने आपत्कालीन साखळी ओढल्यामुळे रेल्वे थांबली आणि पुढील अनर्थ टळला.
काही क्षणांसाठी फलाटावर उपस्थित सर्वांचे जीव टांगणीला लागले होते; मात्र रमा शर्मा (खंडेलवाल) आणि उपस्थित प्रवाशांनी दाखवलेल्या साहस, सतर्कता आणि मानवी मूल्यांमुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचला. हा संपूर्ण घटनाक्रम रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.
या शौर्यपूर्ण आणि संवेदनशील कृतीबद्दल रमा शर्मा (खंडेलवाल) यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या धाडसाचे अभिनंदन केले जात आहे. वास्तव न्यूज लाईव्ह तर्फेही त्यांच्या या कर्तव्यदक्ष, जिगरबाज आणि मानवतेच्या भावनेतून केलेल्या कार्यासाठी मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
ऑपरेशन “जीवन रक्षा” अंतर्गत केलेल्या या शौर्यपूर्ण कृतीमुळे मोठा अपघात टळला असून आरपीएफच्या सतर्कता, कर्तव्यनिष्ठा व मानवतावादी सेवाभावाचे उत्कृष्ट उदाहरण समोर आले आहे. संबंधित प्रवाशाने व त्यांच्या कुटुंबीयांनी आरपीएफ कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. रेल्वे सुरक्षा दलाकडून सर्व प्रवाशांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात येते की, धावत्या गाडीत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये व स्वतःच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

