आठ महिन्यांपूर्वी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिला. त्या दिवसाचा घटनाक्रम आजही प्रश्नचिन्हांनी वेढलेला आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ते सत्ताधाऱ्यांसाठी विरोधकांशी भिडत होते, आणि साडेआठ वाजता अचानक राजीनामा! त्याआधी राजनाथ सिंह आणि किरण रीजीजू त्यांची भेट घेऊन गेले होते. त्यानंतर लगेच आरोग्य कारणांमुळे राजीनामा दिल्याचे गृहमंत्रालयाचे पत्रक धडधडीतपणे जाहीर झाले.
आरोग्य कारणे? की राजकीय कारणे? हा प्रश्न तेव्हा जसा अनुत्तरित होता, तसाच आजही आहे. धनखड हे राजकारणातील जुने, मुरलेले खेळाडू. अनेक पक्षांचा प्रवास करत त्यांनी उपराष्ट्रपतीपद गाठले. पण भारताच्या इतिहासात प्रथमच असा प्रसंग घडला की उपराष्ट्रपतींना निरोप समारंभाचाही मान न देता पद सोडावे लागले. हा केवळ योगायोग म्हणायचा का?
आता आठ महिन्यांनंतर त्यांनीच आपल्या राजीनाम्यामागील सत्य सांगितले, आणि पुन्हा चर्चेला उधाण आले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याभोवती सत्ता इतकी केंद्रीत झाली आहे की संवैधानिक पदांवरील व्यक्तीही त्यातून सुटत नाहीत, अशी कुजबुज उघडपणे व्हायला लागली आहे.
दरम्यान, राजस्थानमधील आपल्या मूळ गावी चुरु येथे गेलेल्या धनखड यांनी एका भेटीत दाढीवाल्यांपासून भीती वाटते असे विधान केले. योगायोग असा की तिथे उपस्थित असलेली व्यक्ती त्यांची ओळखीचीच होती; मुस्लिम समाजातील कोणी नव्हते. तरीही दाढी हा शब्द उच्चारताना त्यांनी कोणता संदेश द्यायचा प्रयत्न केला? आणि त्याचा अर्थ काय घ्यायचा? वाचकांनीच ठरवावे. विशेष म्हणजे, देशातील काही मोठे नेते स्वतःही दाढी ठेवतात मग भीती कोणाची आणि कोणाला?धनखड यांनी स्पष्ट केले की त्यांनी कधीच तब्येत बिघडल्याचे सांगितले नव्हते. उलट, राजीनाम्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते बॅडमिंटन खेळताना दिसले. मग आरोग्याचा मुद्दा नेमका कुठे होता? गृहमंत्रालयाचे पत्रक सत्य होते की केवळ धुरळा उडवण्याचा प्रयत्न?
राज्यसभेत त्यांच्या कारकिर्दीत घेतलेले काही निर्णय संविधानाच्या सीमारेषांवर चालणारे होते, असे टीकाकारांचे मत आहे. कदाचित त्यांना वाटले असेल की या धाडसी कृतींमुळे त्यांचा पुढचा प्रवास राष्ट्रपतीपदाकडे होईल. पण राजकारणात अपेक्षा आणि वास्तव यांच्यातील दरी किती खोल असते, हे त्यांनाही उमगले असावे.आज काही जण सांगतात की मोदी २०४७ पर्यंत पंतप्रधान राहतील. पण तेव्हा त्यांचे वय ७५ ओलांडलेले असेल. मग ही घोषणा वास्तव आहे की खुर्चीभोवती फिरणारी राजकीय स्तुतीपर भाषा? मोदीनंतर कोण? या स्पर्धेने आधीच पडद्यामागे वेग घेतल्याची चर्चा आहे.
एकंदरीत, धनखड यांच्या राजीनाम्याभोवतीचे धुके पूर्णपणे दूर झालेले नाही. मात्र त्यांनी उशिरा का होईना, जे संकेत दिले आहेत, त्याचा अर्थ जाणणाऱ्यांना कळलाच आहे. सत्ता, संवैधानिक पदे आणि राजकीय निष्ठा यांचा खेळ किती धारदार असतो, याची आठवण या प्रकरणाने पुन्हा एकदा करून दिली आहे.

