साहित्य संमेलने ही त्या त्या भागाची प्रकाशाची बेट असतात. आपण आज तणाचं सौंदर्य वाढवण्यासाठी जेंट्स व लेडीज पार्लर पाहतो आहोत पण मनाच्या सौंदर्याचे काय? तर या मनाचं सौंदर्य वाढविण्याचे काम असी साहित्य संमेलन करतात.आज आपल्याकडे भौतिक सुख सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या आहेत. घरात आपल्याकडे टीसेट आहे, डिनर सेट आहे, सोफासेट, टी.व्ही.सेट आहे पण प्रत्येकाचे माईंड मात्र अपसेट आहे. हे अपसेट माईंड सेट करण्याचं काम असी साहित्य संमेलन करतात. जीवनाला नवी दिशा देण्याचं काम साहित्यातून घडतं. साहित्याचा विचार हा जीवनाचाच विचार असतो. साहित्य निर्मितीचा उद्देश केवळ मनोरंजन करणे नसून समाजात उच्च प्रतीचे चिंतन, स्वाधीनता व जीवनातील सत्याचे दर्शन घडविणे हे असतं.ते साहित्य सर्वश्रेष्ठ मानलं जातं जे झोपू देत नाही तर सतत जागविण्याचे काम करत.’मज निरंतर जागवीतीची’ भूमिका पार पाडतं. साहित्याची व्याख्या करताना आमचे हिंदीतील श्रेष्ठ कथाकार प्रेमचंद सांगतात की ‘साहित्य जीवन की आलोचना है l’ साहित्याच्या प्रत्येक प्रकारामधून जीवनाची (आलोचना) समिक्षा झाली पाहिजे. साहित्याद्वारे मानवी मूल्य रुजविण्याचे काम घडतं, प्राचीन काळी समाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम धर्मसंस्था करत होती.आता साहित्यद्वारे समाजमन घडविण्याचे काम घडतं. साहित्यकार हा वर्तमान परिस्थितीने प्रभावित होऊन लिहितो.तसं लिहिलं गेलं पाहिजे,साहित्याचा संबंध हृदयाशी आहे त्यामुळे साहित्य कधीच जुनं होत नाही उलट ते नूतन बनत जातं. साहित्यात बुद्धीपेक्षा भावनेला अधिक स्थान असतं.
या साहित्य संमेलनाच नांव जनसंवाद अस आहे.आज आपण पाहतोय की समाजा समाजातला आपला जनसंवाद मुका होताना दिसतो आहे. एवढेच नाही तर आपली घर मुकी होत चालली आहेत,घरात पुर्वीसारखा संवाद उरला नाही. घराच रेस्टहाऊस, धर्मशाळा,वेटिंग रूम बनली आहे.खरे तर प्रथमत: आपला आपल्यासी संवाद होणं महत्त्वाचं असतं.’आपुलाच संवाद आपणासी’ असे घडले पाहिजे. इथून संवादाची सुरुवात झाली पाहिजे व तो नंतर घरात नंतर समाजात घडला पाहिजे. त्याचे स्वरूप विश्वात्मकते पर्यंत गेलं पाहिजे. आज आपली स्थिती याउलट बनली आहे.
दुसरों को फोन लगाने में हम त्रस्त है l
लेकिन खुद से मिलने की सभी लाईने व्यस्त है l
असी स्थिती निर्माण झाली आहे. साहित्यात पहिल्यांदा स्वतःशी संवाद घडतो.त्यालाच पुढे विश्वात्मक रूप प्राप्त होतं. लोकशाहीत जनसंवाद असणे महत्त्वाचं आहे त्यावरच लोकशाही टिकून राहते.पण आज हा संवाद जातीयतेचे विखारी स्वरूप घेतो आहे,धर्माची खरी व्याख्या जी साने गुरूजींनी करताना म्हटले होते –
खरा तो एकची धर्म l
जगाला प्रेम अर्पावे ll
हे विसरून स्वार्थासाठी अनेक पातळ्यांवर विद्वेश पसरविला जातो आहे,हे जनसंवादात आडसर बनत आहेत. जातीचे व धर्माचे अहंकार फुलताना दिसताहेत.त्याला फुंकर घालण्याचे काम काही लोक पध्दतशीरपणे करताना दिसताहेत.त्यातून अन्य जातींना हीन लेखणे,त्यांचा दु:श्वास करणे पासून माणसालाच एक अर्थाने हीन दृष्टिने पाहण्याची प्रवृत्ती वाढते आहे.अशा काळात निकोप संवाद घडणं आरोग्यदायी समाज व्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे. जनसंवाद हा लोककल्याणाचा पायाभूत भाग आहे.कुठलेही साहित्य हे जनसंवादामुळेच सशक्त व समृद्ध बनते.
त्यानंतर ग्रामीण साहित्य संमेलन म्हणून आपण याचा उल्लेख केला आहे.भारत हा मुळात खेड्यात वसतो असे आपण मानत गेलो पण आता ही व्याख्या हळुहळु बदलताना दिसते आहे.खेड्यातील लोक मोठ्या प्रमाणावर शहरांकडे स्थलांतरीत होत आहेत.हळुहळु खेडी ओस पडत आहेत.मी ज्या मुखेड तालुक्यात वास्तव्य करतो त्या तालुक्यातील सर्वाधिक लोक स्थलांतर करतात.ही चिंतेची बाब आहे.स्थलांतरामुळे शहरात वास्तव्य करतानाच आपल्या ग्रामीण संस्कृतिपासून ही लोक हळुहळु दुर जाताहेत.याचा ही विचार अस्या साहित्य संमेलनातुन व्हावा हा उद्येश ही ग्रामीण साहित्य संमेलन या नावात आहे.आज विविध सुविधा शहरात उपलब्ध आहेत पण ग्रामीण भागाकडे म्हणावे तेवढं कोणाचाच लक्ष नाही. त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात,त्याला वाचा फोडावी त्यावर उपाय शोधावेत असे फार कमी लोकांना वाटतं पण या साहित्य संमेलनाचा आत्माच ग्रामीण जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे हा आहे.ग्रामीण व्यवस्थेतील गुणदोषांची चर्चा इथे घडावी,ग्रामीण मातीत प्रतिभेच्या रूपान दडलेल अस्सल सोन शोधाव,उजळाव त्याला झळाळी प्राप्त करून द्यावी.ग्रामीण भागातील विविध कलाप्रकारांना,परंपरा, बोलीभाषा,कृषी संबंधाने येणारे शब्द भांडार,शेतीमाती संबंधिचे विचार यातुन मांडले जावेत. आज महानगरातील नवी पिढी ग्रामीण संस्कृतिपासून दुर जात आहे याचे चिंतन घडने महत्वाचे आहे.नव्या पिढीने अस्या साहित्य लेखनाकडे वळले पाहिजे.साहित्याचे केवळ वाचन किंवा अभ्यास करून भागणार नाही तर त्यातील प्रकट मूल्य आपणास आपल्या जीवनात उतरविणे महत्त्वाचे आहे.संत तुकारामांनी शब्दांचे महत्त्व विशद करताना म्हटलं होत…
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्नेl
शब्दची प्रयत्ने यत्न करू l शब्दची आमुच्या जीवीचे जीवन l शब्दे वाटु धन जनलोका l
हे प्रत्यक्षात येण्यासाठी अशा साहित्य संमेलनातून शब्दांचा जागर घातला गेला पाहिजे. आपण महात्मा फुले,राजर्षी शाहू महाराज व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात राहतो तेंव्हा तो विचार जपला गेला पाहिजे आणि तो आपल्या आचरणात आला पाहिजे.यासाठीचे प्रयत्न अशा साहित्य संमेलनातून व्हावेत ही अपेक्षाही करणं चुकीचं नाही.साहित्यात दलित, आदिवासी,स्त्रीवादी,ग्रामीण व नागरी या व या सारखे विभाग जरी असले तरी त्याचा उद्देश मानव कल्याण हाच आहे.यात एकमेकांचा दु:श्वास असता कामा नये.संमेलनाध्यक्ष असणं म्हणजे एक निमित्य आहे.खरा उद्देश अशा संमेलनातून साहित्य प्रवाह अधिक गतीने प्रवाहित व्हावा हाच आहे.विज्ञानाचे बदल याचा ही उहापोह साहित्यात व्हावा.दुरीतांचे तिमिर जावं, अविवेकाची काजळी गळुन पडून परिपूर्ण मानव घडविण्याचा संकल्प आपण अशा संमेनातून केला पाहिजे.आता आपण विश्वाच नागरिकच नाही तर ब्रम्हांडनायक बनण्याचा दिशेने वाटचाल करतो आहोत.तेंव्हा स्वार्थापोटी जनसंवादात कुठल्याही भिंती उभ्या राहणार नाहीत याची काळजी माझ्यासह आपण सर्वांनी घेणे महत्त्वाचे आहे.
ग्रामीण भागात अनेक पद्धतीने शोषण केले जातय, ज्यात शेतीमालाला योग्य दरात न मिळणारे भाव यामुळे व्यापाऱ्यांकडून त्याचे शोषण होतं,कर्जाचा भार वाढत जातो, महिला व बालकामगारांचे शोषण मोठ्या प्रमाणावर होताना पण आपण पाहतो, अस्मानी व सुलतानी संकटांना त्याला सामोरे जावे लागत, शासकीय योजनांची नसलेली माहिती व त्या मिळवुन देताना मध्येच होत असलेला भ्रष्टाचार यामुळे ही त्याचं मोठ्या प्रमाणावर शोषण होत, शिक्षणाचा अभाव यामुळे त्याच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन ही शोषक मंडळी त्याचं शोषण करतात,अधून मधून उमटणारे जातीय फुत्कार याला ही वंचित समाजाला सामोरे जावे लागत,जमीनदार व सावकार यांच्याकडून विविध मार्गाने होणार शोषण या व या सारख्या अनेक माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेचं मोठ्या प्रमाणावर शोषण होतं. ते थांबवण्यासाठी प्रयत्न होणं महत्वाच आहे.
ग्रामीण भागाचा कणा असलेल्या शेतकऱ्याला विविध मार्गाने सशक्त करणे गरजेचे आहे,शासनाद्वारे सुलभ कर्जाची व्यवस्था प्राप्त करून देणे, त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे,त्यालाआधुनिक शेती विषयी जागृत करने.आज ही शेतकऱ्यांसमोर नापीकी, लहरी निसर्ग,ओला व कोरडा दुष्काळ,जागतिकीकरणाच्या भांडवली व्यवस्थेद्वारे शेतीवर होणारा परिणाम,अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या संख्येत होणारी वाढ,सुशिक्षित मुलांच्या नोकरीचा प्रश्न,आधुनिक व्यवस्था आणि जीवनशैलीचे फॅड या व यासारख्या अनेक समस्या त्याच्या समोर आ वासून उभ्या आहेत.माणसाचा बोजा सहन करणाऱ्या भूमातेला माणसांच्या गरजांचा भार न सोसणार आहे.शेती व शेतकऱ्यांवरील ताण वाढत्या महागाईमुळे आणखीनच वाढला आहे.आमचा शेतकरी व्याजात जन्म घेतो,लेकरांसाठी कर्ज ठेवूनच मरतो याचं वास्तव चित्र प्रेमचंद यांनी हिंदी साहित्यात ‘होरी’ कथेच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.मेहनत न करता ही माणसं मोठी कशी होतात हे एक कोडच आहे.म्हणूनच कवी म्हणतो-
मेहनत न करता याचं रान कसं पिकलं l
सांगा ज्योतिबा गणित कुठं चुकलं ll
या सर्व पार्श्वभूमीवर साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची आहे.शेतकऱ्यांच्या संदर्भात पहिला प्रयत्न राजे छत्रपती शिवरायांनी केला. त्यांनी शेतकऱ्यांत आत्मविश्वास निर्माण केला.आपल्या सैनिकांना सतत ताकिद दिली की शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागणार नाही याची काळजी घ्या.सैन्याला सांगितले की रात्रीला लावलेला दिवा झोपताना मालवुन झोपा अन्यथा उंदीर दिव्याच्या वातीच्या निमीत्ताने पेटता दिवा घेवुन जातील व शेतकऱ्यांचे घर या पीक जळेल असी काळजी करणारा हा राजा होता. तदनंतर महात्मा फुलेंनी या कामी काम केलं,महर्षी विठ्ठल रामजी शिंदे,कृष्णराव भालेराव, दिनकरराव जवळकर, यशवंतराव चव्हाण,शरद जोशी आदिंनी प्रयत्न केले.आपण ही विविध साहित्य संमेलनातून शेतकऱ्यांच्या समस्या मांडणाऱ्या रचना सादर केल्या पाहिजेत.शेतकऱ्यांप्रती आपली प्रामाणिक संवेदनशीलता,सूक्ष्म डोळसदृष्टी साऱ्यांसमोर ठेवून भावी दिशा अधिक उज्वल कराव्या लागतील.आपणास या चळवळीला अधिक ऊर्जा देण्यासाठी आपला नेमका संघर्ष कुणाशी ? हे लक्षात घेऊन साहित्य निर्मिती करावी लागेल.शेतकऱ्यांच्या मनाला अनेक तडे गेले आहेत,त्यांचे हे मन सांधण्याचे काम आत्मिक शक्ती शिवाय दुसरं कोणीही करू शकणार नाही.ती आत्मिक शक्ती आपणास जागृत करावी लागणार आहे.शेतीची व शेतकऱ्यांची अवस्था सुधारली पाहिजे परंतु शेती जाळून किंवा शेतकऱ्यांना जाळणारी मानसिकता तयार करून हे होणार नाही.त्याला सर्व माती उलथून टाकणारी मशागतच करावी लागेल.आपणास माणूस म्हणून आता प्रसंगी लढे ही द्यावे लागतील.लिहून बाजूला होईल ही भूमिका बदलावी लागेल असे केले तर शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फुटेल,अन्यथा आत्महत्या थांबणार नाहीत. महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना स्वतःच्या हक्काची जाणीव करून देणे, बालकामगारांचे शोषन थांबवुन त्यांना शिक्षण प्रवाहाकडे वळविणे,शासकीय योजनांना अधिक लोकाभिमुख बनवणे, त्या योजनांचा परिचय करून देणे,विना भ्रष्टाचार त्या राबविने,कौशल्याधारित शिक्षणाकडे त्यांना वळविणे.या साठी आपण सर्व साहित्यिक, शिक्षण क्षेत्रातील व्यक्तिमत्व, स्वयंसेवी संस्थांनी पुढे येवुन काम करणे गरजेच आहे. त्यासाठी माझ्यासह आपण सर्व साहित्यिकांनी या कामी निश्चितपणे प्रयत्न करूयात.
मोडलेल्या माणसांचे दुख ओले झेलतांना l
त्या अनाथांच्या उशाला दिप लावू झोपताना l
कोणती ना जात ज्यांची कोणता ना धर्म ज्यांना l
दुःख ओले दोन अश्रू माणसांचे माणसांना ll
यासाठी लिहीत व जगत राहू. या अपेक्षेसह माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो.
– प्रा. डाॅ. रामकृष्ण बदने
संमेलनाध्यक्ष
