प्रा. सुग्राम पुल्ले स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

डॉ. संजय कळमकर यांचे व्याख्यान तर प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील यांना साहित्य पुरस्कार

नांदेड – प्रा. सुग्राम पुल्ले स्मृती प्रतिष्ठान नांदेड यांच्यावतीने दरवर्षी समाज जीवनातील अत्यंत महत्वाच्या विषयावर  ‘प्रा. सुग्राम पुल्ले व्याख्यानमाला’ आयोजित केली जाते. व्याख्यानमालेचे हे तिसरे वर्ष आहे. या व्याख्यानमालेत डॉ. राजशेखर सोलापुरे व डॉ. रामकृष्ण बदने यांनी आपले विचारमंथन मांडले आहे. यावर्षी सुप्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते  डॉ. संजय कळमकर, अहिल्यानगर यांचे ‘जगण्यातील आनंदाच्या वाटा’ या विषयावर बहुमोल व्याख्यान होणार आहे.

तसेच प्रा. सुग्राम पुल्ले स्मृती प्रतिष्ठान नांदेडच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट वाड्.मयनिर्मिती करणाऱ्या एका साहित्यिकाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. गतवर्ष हा पुरस्कार ‘उसवण’ या कादंबरीचे लेखक देवीदास सौदागर यांना प्रदान करण्यात आला होता. यावर्षीचा मराठी साहित्यविश्वातील हा अत्यंत महत्त्वाच्या ‘प्रा. सुग्राम पुल्ले राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारा’साठी डॉ. नागनाथ पाटील यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. नागनाथ पाटील यांचे लंबाडी, कोंडणातलं जिणं, हुतराणी या कादंबऱ्या आणि रानभूल, मॅपको हे कथासंग्रह तर खोल डोहातल्या सावल्या, सावली हरवलेले झाड हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. डॉ .नागनाथ पाटील यांना हा पुरस्कार (रोख रक्कम रु. 5001/-, मानपत्र व शाल इ.) सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. हा सोहळा रविवार 22 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वा. सायन्स कॉलेज नांदेड येथील स्व. पुरणमलजी लाहोटी सभागृहामध्ये होणार आहे.  या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. के. राजकुमार हे भूषविणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. सुग्राम पुल्ले स्मृती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. मनीषा जितेंद्र पुल्ले, सचिव डॉ. जितेंद्र सुग्राम पुल्ले व संजोयान समितीचे प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण, विजयकुमार बेंबडे, अनंत रेड्डी भुरकापल्ले, प्रा. डॉ. शिवसांब कापसे, लिंगराम हंडरगुळे, सुनील मुसने आदींनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!