नांदेड – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) मार्च–2026 ही परीक्षा कॉपीमुक्त, पारदर्शक, निर्भय व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्वंकष नियोजन व कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या स्पष्ट आदेशानुसार जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर विशेष भरारी पथके (Flying Squad) नियुक्त करण्यात आली आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विशेष भरारी पथकाने कंधार तालुक्यातील पेडवडज येथील संत नामदेव महाराज ज्युनिअर कॉलेज या उच्च माध्यमिक परीक्षा केंद्रावर आज अचानक भेट देऊन तपासणी केली.
तपासणीदरम्यान परीक्षा सुरू असताना संपूर्ण प्रक्रियेची बारकाईने पाहणी करण्यात आली. पर्यवेक्षकांची उपस्थिती, परीक्षार्थ्यांची बैठक व्यवस्था, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची सुरक्षितता तसेच परीक्षेतील शिस्त यांची सखोल तपासणी करण्यात आली. यावेळी दोन परीक्षार्थी कॉपी करत असल्याचे निदर्शनास आले. ही बाब महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नियमांचे गंभीर उल्लंघन असल्याने संबंधित परीक्षार्थींवर तत्काळ नियमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
सदर प्रकरणाचा सविस्तर अहवाल तयार करून सक्षम प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला असून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू आहे. परीक्षा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार, अनैतिक मार्ग किंवा शिस्तभंग खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी दिला आहे.
परीक्षा काळात सर्व परीक्षा केंद्र प्रमुख, केंद्र संचालक, पर्यवेक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्ण जबाबदारीने व दक्षतेने काम करणे बंधनकारक असून कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा किंवा नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता स्वतःच्या कष्टावर व प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी. पालक, शिक्षक व नागरिकांनीही विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून कॉपीमुक्त परीक्षा अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर अशा प्रकारच्या अचानक तपासण्या सुरू राहणार असून परीक्षा प्रक्रियेची पवित्रता, विश्वासार्हता व गुणवत्तेचे मूल्य जपण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे.

