पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप पथकाची अवैद्य वाळूवर कार्यवाही;एक कोटी सात लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्हा विशेष पथकाने १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे विमानतळ हद्दीपूर्वी असलेल्या मौजे मुगट, ब्राह्मणवाडा आणि मुदखेड  शिवारातील हिरा घाट परिसरातील रेती धक्क्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत नदीपात्रातून बाहेर काढून साठवून ठेवलेली सुमारे ४० ब्रास वाळू, दोन टिप्पर आणि एक जेसीबी मशीन असा सुमारे ६१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यानंतर विशेष पथकाने मुदखेड हद्दीतील घाट परिसरात झटपट कारवाई करत आणखी एक टिप्पर, एक जेसीबी मशीन आणि सुमारे ३० ब्रास वाळू जप्त केली. या कारवाईत सुमारे ४६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही कारवायांमध्ये मिळून एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

१४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता हिरा घाटाजवळील कारवाईत मिळालेल्या साहित्याच्या आधारे पोलीस ठाणे विमानतळ येथे गुन्हा क्रमांक ३६/२०२६ दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार संतोष राणे करीत आहेत. तसेच मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार अंगद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

विमानतळ व मुदखेड परिसरातील मौजे ब्राह्मणवाडा व मुघट येथील घाटांवर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन, साठवणूक आणि वाहतूक सुरू असल्याचे या कारवायांतून स्पष्ट झाले आहे. एकूण तीन टिप्पर (अंदाजे ३४ लाख रुपये), दोन जेसीबी मशीन (सुमारे ७० लाख रुपये) आणि सुमारे ७० ब्रास वाळू (३ लाख ५० हजार रुपये) असा एकूण १ कोटी ७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम मातेवाड, पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांच्या पथकाने केली.या कार्यवाही साठी पथकातील अधिकारी आणि अमलदारांचे कौतूक करण्यात आले आहे.

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतुकीची  तसेच इतर अवैद्य धंद्यांची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात द्यावी किंवा पोलीस उप महानरीक्षक कार्यालयाच्या   nandedrange.mahapolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तसेच ९१५०१००१०० या खबर हेल्पलाईन क्रमांकावर कळवून अशा अवैध व्यवसायांविरुद्धच्या कारवाईला सहकार्य करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!